क्रिकेटमधील अजब गजब घटना! जेव्हा समालोचक आणि पत्रकार उतरले न्यूझीलंडसाठी फिल्डींग करायला...

क्रिकेटला १५० वर्षांपेक्षाही अधिकचा इतिहास आहे. यादरम्यान एकापेक्षा एक रोमांचक सामने पाहायला मिळाले आहेत. असाच एक सामना आजच्याच दिवशी म्हणजे १७ नोव्हेंबर रोजी पार पडला होता. भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये कसोटी सामना पार पडला होता. बेंगलोरच्या मैदानावर पार पडलेल्या या सामन्यात न्यूझीलंड संघाला १७२ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला होता. मात्र हा पराभव हा सामना रोमांचक असण्याचे कारण नव्हते. तर कारण काहीतरी वेगळे होते. चला जाणून घेऊया.

हा सामना १२ नोव्हेंबर १९८८ रोजी सुरू झाला आणि १७ नोव्हेंबर रोजी समाप्त झाला होता. त्यावेळी कसोटी सामन्यात रेस्ट डे देखील असायचा. भारतीय संघाने या सामन्यातील पहिल्या डावात ९ गडी बाद ३८४ धावा करत आपला डाव घोषित केला होता. प्रत्युत्तर देण्यासाठी आलेल्या न्यूझीलंड संघाचा डाव अवघ्या १८९ धावांवर संपुष्टात आला होता. त्यानंतर दुसऱ्या डावात फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाने १४१ धावा करत दुसरा डाव देखील घोषित केला होता. न्यूझीलंड संघाला हा सामना जिंकण्यासाठी ३३७ धावांचे आव्हान मिळाले होते. मात्र न्यूझीलंड संघाला या डावात अवघ्या १६४ धावा करता आल्या होत्या.

न्यूझीलंड संघातील खेळाडू झाले बाहेर...

क्रिकेटमध्ये कोणता तरी एक संघ जिंकतो तर दुसऱ्या संघाला पराभवाचा सामना करावा लागतो. मात्र या सामन्यात न्यूझीलंड संघाची चिंता वाढण्याचं कारण काहीतरी वेगळं होतं. या सामन्यात न्यूझीलंड संघाला खेळाडूंची कमतरता जाणवली होती. त्यावेळी समालोचक आणि पत्रकाराला क्षेत्ररक्षण करण्यासाठी मैदानावर यावं लागलं होतं. 

या सामन्यात समालोचन करत असलेले जेरेमी कोनी क्षेत्ररक्षण करण्यासाठी मैदानावर आले होते. जेरेमी कोनी न्यूझीलंड संघाचे माजी कर्णधार होते. ही स्थिती तेव्हा निर्माण झाली होती, जेव्हा न्यूझीलंड संघातील ५ खेळाडू आजारी असल्यामुळे क्षेत्ररक्षण करण्यासाठी मैदानावर येऊ शकत नव्हते. त्यामुळे न्यूझीलंड संघाला पाच अतिरिक्त खेळाडूंना मैदानात उतरण्याची वेळ आली होती. ज्यामध्ये एक पत्रकार आणि एका समालोचकाचा समावेश होता.

हेडलीने बोथमला सोडलं मागे...

या सामन्यातील पहिल्या डावात न्यूझीलंड संघातील दिग्गज अष्टपैलू खेळाडू रिचर्ड हेडली यांनी सलामीवीर फलंदाज अरुण लाल यांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला होता. यासह त्यांनी कसोटी क्रिकेटमध्ये ३७४ वा गडी बाद केला होता. यासह त्यांनी इंग्लडचे अष्टपैलू खेळाडू इयान बोथम यांना मागे टाकले होते.

सबस्क्राईब करा

* indicates required