computer

पैसे नसतानाही भारताने १९८७चा क्रिकेट वर्ल्डकप कसा आयोजित केला याचा किस्सा!!!

१९८३ साली भारताने क्रिकेटचा वर्ल्डकप जिंकला. त्यावेळी भल्याभल्या मातब्बरांचा भरणा असलेल्या संघांना लोळवून भारताने आपण जगज्जेते असल्याचे सिद्ध केले होते. या वर्ल्डकप विजयाने भारतीय क्रिकेट संघाचा आत्मविश्वास दुणावला होता. याच आत्मविश्वासामुळे भारताने त्याचा पुढचा म्हणजे १९८७ झालेला वर्ल्डकप भारतात आयोजित केला होता. आता तुम्हाला इतके माहीत आहे. पण १९८७ सालचा हा वर्ल्डकप आयोजित करताना मात्र बीसीसीआयची चांगलीच दमछाक झाली होती.

१९८३ साली आपण वर्ल्डकप जिंकल्याने आता भारतीय क्रिकेटला नव्या शिखरावर घेऊन जाण्यासाठी १९८७ चा वर्ल्डकप कुठल्याही परिस्थितीत आयोजित करायचाच असा चंग बीसीसीआयने बांधला होता. पण त्यावेळी एकटा भारत वर्ल्डकप आयोजित करू शकेल अशी आर्थिक परिस्थिती नव्हती. त्यासाठी पाकिस्तानला सोबत घेण्यात आले. दोन्ही देश मिळून वर्ल्डकप आयोजित करतील असे ठरले.

इंग्लंडच्या मानाने पाचपट जास्त किंमत देत भारताने हा वर्ल्डकप आयोजित करण्याचे निश्चित करून टाकले. पाकिस्तान आधीच कफल्लक म्हणून भारताने या डीलचा २/३ वाटा उचलला होता. सर्व करून भारताला २० कोटी रुपयांचा खर्च येणार होता. यासाठी या वर्ल्डकपला धीरूभाई अंबानींची रिलायन्स स्पॉन्सर करणार असल्याचेही ठरले होते.
 

पण १९८४ साली देशाच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा दुर्दैवी खून झाला आणि देशाची सूत्रे राजीव गांधी यांच्या हातात आली. या काळात राजीव गांधी यांनी इन्कम टॅक्स विभागाला रिलायन्स कंपनीवर नजर ठेवायला सांगितले होते. यामुळे रिलायन्स कंपनी आणि भारत सरकार यांच्यात थोडा दुरावा आला होता.

आता धीरूभाई अंबानी यांनी वर्ल्डकपला स्पॉन्सर करण्यास नकार दिला. बीसीसीआय मात्र चांगल्याच पेचात अडकली होती. स्पर्धा भरवायची तर पैसे लागणार आणि पैसे आणायचे कुठून हा सवाल समोर उभा होता. डिसेंबर १९८४ पूर्वी बीसीसीआयने वर्ल्डकपमध्ये सहभागी होणाऱ्या ८ देशांना ४ कोटी द्यायचे होते. म्हणून जे काही करायचे ते तातडीने करावे लागणार होते. शेवटी बीसीसीआय परत धीरूभाईंकडे गेली.

धीरुभाई यावेळी वेगळ्या मूडमध्ये होते, त्यांनी काही अटी ठेवल्या. त्या पुढीलप्रमाणे होत्या. आपण भारत पाकिस्तान सामना जो नेहमीच देशाचे आणि जगाचे लक्ष वेधून घेत असतो, या सामन्यावेळी पंतप्रधानांच्या बाजूला बसून सामना बघणार. दुसरी गोष्ट म्हणजे या कपचे नामकरण हे रिलायन्स कप म्हणून करण्यात यावे.

बीसीसीआयपुढे ही अट मान्य करण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. या डीलमागे धीरूभाईंचे व्यापारी डोके काम करत होते हे लवकरच दिसून आले. त्यांनी ५.५ कोटी स्पॉन्सर फी दिले आणि अजून २.६ कोटी देऊन पूर्ण ग्राउंडवरील जाहिरातीचे हक्क विकत घेऊन टाकले. याउप्पर रिलायन्सने बिहाइंड द सीन्स नावाची एक डॉक्युमेंटरी बनवली.

या डॉक्युमेंटरीमध्ये खेळाडूंच्या मुलाखती, काही हलकेफुलके सीन्स असे काही होते. आता या सर्वांतून बीसीसीआय भारतात चांगल्या पद्धतीने वर्ल्डकप आयोजित करू शकला. तर दुसरीकडे धीरूभाई अंबानी यांनी देखील या वर्ल्डकपचा फायदा करून घेत रिलायन्सला जागतिक स्तरावर ओळख मिळवून दिली.

भारताने १९८७ चा वर्ल्डकप जिंकला नसला तरी अतिशय चांगल्या आयोजनामुळे भारतीय क्रिकेटचे देखील जगात नाव झाले. अशापद्धतीने बीसीसीआय आणि धीरूभाई अंबानी यांच्यासाठी हा वर्ल्डकप म्हणजे विन विन परिस्थिती ठरला होता.

उदय पाटील

सबस्क्राईब करा

* indicates required