या मराठमोळ्या क्रिकेटपटूला मिळाला होता,भारतासाठी कसोटी क्रिकेटमध्ये पहिला चेंडू खेळण्याचा मान

सध्या सर्वत्र आयपीएल स्पर्धेची चर्चा सुरू आहे. २०-२० षटकांचा सामना आणि प्रेक्षकांना ३ तासात चौकार आणि षटकारांचा पाऊस पाहायला मिळत असतो. हल्ली क्रिकेट चाहत्यांचा कल हा टी२० क्रिकेटकडे वाढत चालल्याचे पाहायला मिळत आहे. क्रिकेट चाहतेच नव्हे तर अनेक असे खेळाडू देखील आहेत ज्यांना टी२० क्रिकेट खेळण्यात जास्त रस आहे. याचं कारण म्हणजे झटपट पैसा आणि प्रसिद्धी. परंतु काही प्रेक्षक अजूनही आहेत जे पाच दिवस चालणारा कसोटी सामना पाहण्यासाठी तिकिटाचे पैसे खर्च करून मैदानात जात असतात. अशा मंडळींना कसोटी सामन्यांना सुरुवात कधी झाली? भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये पहिला चेंडू खेळणारा फलंदाज कोण होता? असे असंख्य प्रश्न पडत असतील. तुम्हाला ही असे प्रश्न पडलेच असतील. चला तर जाणून घेऊया याबाबत अधिक माहिती.

भारतीय क्रिकेटला मोठं करण्यात अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी मोलाचं योगदान दिलं आहे. सुनील गावस्कर, कपिल देव, सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड यांचा वारसा आता चेतेश्वर पुजारा,रोहित शर्मा आणि विराट कोहली सारखे फलंदाज पुढे घेऊन जात आहेत. मात्र कसोटी क्रिकेटमध्ये भारतासाठी पहिला चेंडू खेळण्याचा मान मिळवला तो, जनार्दन ज्ञानोबा नवले (Janardan Gyanoba Navle) यांनी.

भारतीय संघाने (Indian team)१९३२ मध्ये लॉर्ड्सच्या मैदानावर इंग्लंड संघाविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळला होता. याच सामन्यात जनार्दन ज्ञानोबा नवले यांनी भारतीय संघाकडून कसोटी क्रिकेटमध्ये पहिला चेंडू खेळला होता. ते भारतीय कसोटी संघाचे पहिले यष्टिरक्षक होते. परंतु त्यांना केवळ दोनच कसोटी सामने खेळता आले.

जनार्दन ज्ञानोबा नवले यांचा जन्म ७ डिसेंबर १९०२ रोजी महराष्ट्रातील फुलगाव येथे झाला होता. त्यांनी वयाच्या १६ व्या वर्षी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. ५ फूट ४ इंच उंच असलेले जनार्दन ज्ञानोबा नवले उत्तम यष्टिरक्षक होते. त्यांना पहिला कसोटी सामना खेळण्याची संधी इंग्लंडमध्येच मिळाली होती. या सामन्यातील पहिल्या डावात त्यांना १२ तर दुसऱ्या डावात अवघ्या १३ धावा करता आल्या होत्या. त्यानंतर त्यांना संघाबाहेर काढण्यात आले होते. तसेच कारकिर्दीतील दुसरा कसोटी सामना त्यांनी मुंबईमध्ये इंग्लंड संघाविरुद्ध खेळला होता. दोन्ही सामन्यात त्यांना अवघ्या ४२ धावा करता आल्या होत्या.

 तसेच त्यांच्या प्रथम श्रेणी क्रिकेटमधील कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर त्यांनी ६५ सामन्यात १९७६ धावा केल्या होत्या. तसेच १५ जून १९३३ रोजी त्यांची क्रिकेट कारकीर्द संपुष्टात आली होती. केवळ २ कसोटी सामने खेळणाऱ्या जनार्दन ज्ञानोबा नवले यांची इतिहासात नोंद झाली आहे. तसेच ७ सप्टेंबर १९७९ रोजी वयाच्या ७६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

सबस्क्राईब करा

* indicates required