IPL 2022चे लिलाव संपले पण या लिलावात विकल्या गेलेल्या खेळाडूंपेक्षा दिल्लीचे मालक चर्चेत का आहेत?

लिलाव होत असताना तेव्हा त्या ठिकाणी एखादा असा नमुना असतोच जो लिलावाचे भाव वाढवून स्वतः बाजूला होतो आणि दुसऱ्यांच्या गळ्यात तो लिलाव महागात टाकतो. सध्या आयपीएल लिलावात पण अशाच एका गृहस्थांची चर्चा आहे. दिल्ली कॅपिटल्सकडून बोली लावणारे किरण कुमार ग्रांधी मीम्सपासून पोस्ट्सपर्यंत सगळीकडेच दिसत आहेत ते त्यांच्या याच स्ट्रॅटेजीमुळे. म्हणून या किरण कुमारांची बोभाटाच्या वाचकांना ओळख करून देणे गरजेचे वाटले.

किरण कुमार ग्रांधीनी दिल्ली कॅपिटल्सला हव्या असलेल्या खेळाडूंवर बोली लावली. पण ज्या खेळाडूंना दिल्ली कॅपिटल्स घेऊ इच्छित नव्हते, त्यांच्यावरही त्यांनी बोली लावली. साहजिकच या खेळाडूंच्या किंमती वाढल्या. असे हे चढ्या किंमतीचे खेळाडू दुसऱ्या संघाच्या गळ्यात मारून स्वतः मात्र चांगले खेळाडू घेऊन ग्रांधी फायद्यात राहिले. पण हे काही इतके सोपे काम नसते. त्यासाठी दांडगा अनुभव आणि अभ्यास लागतो आणि किरण कुमार ग्रांधी हे या गेमचे असली खिलाडी मानले जातात.

दिल्ली कॅपिटल्स या संघाची मालकी जीएमआर ग्रुप आणि जेडब्ल्यूएस ग्रुप यांच्याकडे आहे. किरण कुमार हे यातल्या जीएमआर ग्रुपचे सीईओ, एमडी आणि डायरेक्टर आहेत. तसे बघायला गेले तर किरण कुमार दरवेळी बोली लावायला स्वतः हजर असतात. मात्र यावेळी त्यांचा फॉर्मच वेगळा होता.

गेले काही सिजन ग्रांधी हे दिल्ली कॅपिटल्सला एक चांगला संघ बनविण्याचा प्रयत्न करत आहेत. यावेळी त्यांचा प्रयत्न चांगलाच यशस्वी झालेला बघायला मिळाला आहे. दिल्ली कॅपिटल्सचे सहमालक असल्याने या संघाचा पूर्ण कारभार तेच बघतात.

जीएमआर ग्रुप हा किरण कुमार यांचे वडील ग्रांधी मल्लिकार्जुन राव यांनी स्थापन केला होता. सध्या या ग्रुपचा पसारा सात देशांमध्ये पसरला आहे. ऊर्जा, हायवे, एअरपोर्ट अशा क्षेत्रांमध्ये त्यांचा व्यवसाय आहे. वारसेने आलेली कंपनी किरण कुमार मोठ्या हुशारीने पुढे नेऊन जात आहेत, हे तुम्हाला समजले असेलच.

पण शेरास सव्वाशेर या म्हणीप्रमाणे लिलाव सुरू असताना मुंबई इंडियन्सने ग्रांधी यांना एकदा चांगलेच फसवले. खलील अहमदवर लिलाव सुरू असताना दरवेळीप्रमाणे ग्रांधी बोली लावायला लागले. बोली ५.२ कोटींवर गेली आणि मुंबईने खलीलवरची बोली मागे घेत त्याला ग्रांधी यांच्या गळी मारले.

या सर्व प्रकारावर मात्र नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे.

उदय पाटील

सबस्क्राईब करा

* indicates required