मित्रप्रेम!! जेव्हा जिवलग मित्राचे प्राण वाचवण्यासाठी धोनीने पाठवले होते हेलिकॉप्टर, वाचा तो किस्सा....
क्रिकेट विश्वात जेव्हा जेव्हा सर्वोत्तम खेळाडूंचा उल्लेख केला जातो, त्यामध्ये एमएस धोनी (Ms Dhoni) हे नाव सर्वोच्च स्थानी असते. धोनीने आपल्या क्रिकेट कारकिर्दीत केवळ फलंदाजीनेच नव्हे तर आपल्या अप्रतिम नेतृत्वाने देखील अनेक सामने जिंकून दिले. कुठल्या क्षणी डीआरएसचा वापर करावा हे एमएस धोनीला चांगलेच माहीत आहे. त्यामुळे डीआरएसला धोनी रिव्ह्यू सिस्टम असे देखील म्हटले जाते. तसेच तो एकमात्र भारतीय कर्णधार आहे, ज्याने आयसीसीच्या तीनही मानाच्या स्पर्धा जिंकल्या आहेत. ज्यात आयसीसी टी -२० विश्वचषक, आयसीसी वनडे विश्वचषक आणि आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचा समावेश आहे.
एमएस धोनी मैदानात आणि मैदानाच्या बाहेर नेहमी शांत दिसून येतो. असे खूप कमी वेळेस पाहायला मिळाले आहे जेव्हा एमएस धोनी संताप व्यक्त करताना दिसून आला आहे. क्रिकेटच्या मैदानात उत्कृष्ट खेळाडू असलेला एमएस धोनी माणूस म्हणून देखील खूप चांगला आहे. आजवर याची अनेक उदाहरणं तुम्ही पाहिली असतील. परंतु आज आम्ही तुम्हाला असा किस्सा सांगणार आहोत जो खूप कमी लोकांना माहीत आहे.
एमएस धोनी हे नाव जेव्हा जेव्हा समोर येतं, तेव्हा धोनीचा हेलीकॉप्टर शॉट तुम्हाला नक्कीच आठवत असेल. जिथे यॉर्कर चेंडूवर फलंदाज बाद व्हायचे, त्याच यॉर्कर चेंडूवर एमएस धोनी षटकार मारायचा. हाच शॉट मारून त्याने भारताला २०११ विश्वचषक स्पर्धेत विजय मिळवून दिला होता. हा शॉट शिकवण्यात धोनीचा बालपणीचा मित्र संतोष लालचा (Santosh lal) मोलाचा वाटा होता. संतोष या शॉटला थप्पड शॉट म्हणायचा. ज्याचा खुलासा एमएस धोनीने आपल्या बायोपिक एमएस धोनी द अन्टोल्ड स्टोरीमध्ये केला होता. (Ms dhoni and Santosh lal)
तुम्हालाही या मित्राबद्दल अधिक माहिती जाणून घेण्याची उत्सुकता असेल. दुर्दैवाने संतोष लालने २०१३ मध्ये जगाचा निरोप घेतला होता. त्याला एक गंभीर आजार झाला होता. त्यावेळी एमएस धोनी परदेशात होता. परदेशात असताना देखील धोनीने आपली जबाबदारी पार पाडली होती.
संतोष आजारी असल्याची माहिती मिळताच, धोनीने संभव होईल तितकी मदत करायला सुरुवात केली. त्याने हेलीकॉप्टरच्या साहाय्याने संतोषला दिल्लीतील एम्स रुग्णालयात भरती केले होते. परंतु धोनीच्या प्रयत्नांना अपयश आले. ओरपेनक्रियाज इन्फेक्शनने त्रस्त असलेल्या संतोष लालने जगाचा निरोप घेतला.




