computer

कलेक्टर ते बॅडमिंटन खेळाडू... पॅरालिम्पिकमध्ये सहभागी होणारा आयएएस अधिकारी!!

कधीकाळी क्रिकेटर असणाऱ्या आणि नंतर यूपीएससी पास होऊन अधिकारी झालेल्या क्रिकेटरची गोष्ट तुम्ही बोभाटावर नुकतीच वाचली असेल. मात्र २४ ऑगस्ट पासून टोक्योत सुरू होत असलेल्या पॅरालिम्पिकमध्ये चक्क नोएडाचे कलेक्टर सहभागी होणार आहेत.

प्रशासन आणि खेळ या दोन्ही गोष्टी प्रचंड व्यस्तता असणाऱ्या आहेत. अशावेळी एकाच वेळी दोन्ही गोष्टीत प्रतिभावंत असणे तसे दुर्मिळच!! मात्र सुहास यतीराज यांनी हे शक्य करून दाखवले आहे. पॅरालिम्पिकमध्ये ते भारताकडून बॅटमिंटन खेळातून सहभागी होणार आहेत.

सुहास यांच्यामते खेळात चांगला असणारी व्यक्ती प्रशासनात सातत्याने येणारा ताण चांगल्या पद्धतीने हाताळू शकते. पुढे ते असेही सांगतात की प्रत्येक खेळाडूकडून अपेक्षा असते आणि तो आपले पूर्ण प्रयत्न टाकत असतो म्हणून शांतचित्ताने आल्या परिस्थितीला सामोरे जाणे गरजेचे असते.

पॅरालिम्पिक हे दिव्यांग खेळाडूंसाठी आयोजित केले जात असतात. सुहास यांनी आपली शारीरिक कमतरता आपल्या यशाच्या आड कधी येऊ दिली नाही. यूपीएससी पास करत त्यांनी २००७ सालापासून उत्तर प्रदेश केडरमध्ये आपल्या प्रशासनिक कौशल्याचे उदाहरण दिले आणि नंतर खेळातही चमक दाखवत ते पॅरालिम्पिकसाठी पात्र ठरणारे पहिले आयएएस अधिकारी ठरले आहेत.

सुहास यांनी आपल्या सहकाऱ्याना आणि स्वतःला देखील दबाव झुगारून खेळण्याचा दिलेला सल्ला महत्वाचा आहे. सुहास यांनी प्रशासन आणि खेळाची योग्य सांगड घालत देशातल्या तरुणांना पण मोठा संदेश दिला आहे. येणाऱ्या स्पर्धेत पदक मिळवून त्यांनी देशाचे नाव गौरवीत करावे याच बोभाटाकडून त्यांना शुभेच्छा...

सबस्क्राईब करा

* indicates required