ही आहेत भारतीय संघाच्या पराभवाची ५ प्रमुख कारणे...

आयसीसी टी -२० विश्वचषक २०२२ स्पर्धेतील दुसऱ्या सेमी फायनलच्या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. इंग्लंड संघाने १० गडी राखून विजय मिळवत अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. यासह पुन्हा एकदा भारतीय संघाचे आयसीसी टी -२० विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न तुटले आहे. यापूर्वी २०१४ मध्ये झालेल्या आयसीसी टी -२० विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. येत्या १३ नोव्हेंबर रोजी पाकिस्तान आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये जेतेपदाची लढत पार पडणार आहे. मात्र संपूर्ण स्पर्धेत चांगली कामगिरी करणाऱ्या भारतीय संघाकडून नेमकी सेमी फायनलमध्ये काय चूक झाली? भारतीय संघ कुठे कमी पडला? चला जाणून घेऊया.

सलामीवीर फलंदाजांची खराब सुरुवात...

इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात पुन्हा एकदा भारतीय सलामीवीर फलंदाज फ्लॉप ठरले. एकीकडे केएल राहुल ५ तर रोहित शर्मा केवळ २७ धावा करत माघारी परतला. दोन्ही फलंदाजांचा स्ट्राइक रेट १०० आणि त्यापेक्षा कमीच होता. टी -२० क्रिकेटमध्ये जर संघाला मजबूत स्थितीत पोहचायचे असेल तर,सुरुवातीच्या ६ षटकांमध्ये चांगली फलंदाजी करणं गरजेचं आहे. मात्र भारतीय संघाला सुरुवातीच्या ६ षटकांमध्ये केवळ ३८ धावा करता आल्या. तर इंग्लंडने याउलट ६३ धावा जोडल्या.

महत्वाच्या सामन्यात सूर्यकुमार यादव फेल..

सूर्यकुमार यादव या स्पर्धेत भारतीय संघासाठी अतिशय महत्वाचा खेळाडू ठरला आहे. मात्र महत्वाच्या सामन्यात त्याला मोठी खेळी करता आली नाहीये. तो केवळ १४ धावा करत माघारी परतला. सूर्यकुमार यादव साठी जोस बटलरने विशेष रणनिती आखली होती. त्याच्यासमोर गोलंदाजी करताना इंग्लिश गोलंदाज मध्यमगती चेंडूचा अधिक वापर करत होते. त्यामुळे सूर्यकुमार यादवला मोठे फटके खेळताना अडचणीचा सामना करावा लागत होता.

भारताची फ्लॉप गोलंदाजी ..

हार्दिक पंड्याच्या ६३ आणि विराटच्या ५० धावांच्या खेळीच्या जोरावर भारतीय संघाने १६८ धावांपर्यंत मजल मारली होती. मात्र या धावांचा बचाव करण्यात भारतीय गोलंदाज अपयशी ठरले. भुवनेश्वर कुमार आणि अर्शदीप सिंग पावरप्लेच्या षटकात एकही फलंदाजाला बाद करू शकले नाही. तर अक्षर पटेल आणि आर अश्विन यांची जोडी देखील काही खास कामगिरी करू शकली नाही.

बटलर - हेल्सची तुफान फटकेबाजी..

भारतीय संघाने दिलेल्या १६९ धावांचा पाठलाग करताना इंग्लिश फलंदाजांनी सुरुवातीपासूनच जोरदार आक्रमण करायला सुरुवात केली. त्यांनी चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडत भारतीय गोलंदाजांवर दबाव बनवला. शेवटपर्यंत भारतीय गोलंदाज या दबावातून बाहेर पडू शकले नाहीत.

इंग्लंडची अप्रतिम गोलंदाजी..

नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी साठी आलेल्या इंग्लिश गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच भारतीय फलंदाजांना शॉट खेळण्याची संधी दिली नाही. त्यामुळे धावांचा शोधात भारतीय फलंदाजांना आपली विकेट टाकावी लागली. ख्रिस जॉर्डन आणि सॅम करण यांना वगळले तर इतर गोलंदाजांनी खूप कंजूस गोलंदाजी केली.

अंतिम सामन्यात इंग्लंड आणि पाकिस्तान हे दोन संघ आमने सामने येणार आहेत. हा सामना १३ नोव्हेंबर रोजी पार पडणार आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required