धोनीमुळे लवकर संपली या ५ भारतीय यष्टिरक्षकांची कारकीर्द!

क्रिकेटमध्ये असा एक काळ देखील होता, जेव्हा यष्टिरक्षकाची निवड त्याची फलंदाजी पाहून नव्हे तर केवळ त्याचे यष्टीरक्षण पाहून केली जायची. मात्र जसजसा काळ पुढे सरकत गेला, तसे विचारात देखील बदल होत गेले. आता यष्टिरक्षक म्हटलं की, तो उत्तम फलंदाज असायलाच हवा. भारतीय क्रिकेटमध्ये एमएस धोनीच्या एन्ट्री नंतर अनेकांना असे वाटले असेल की,यष्टिरक्षक उत्तम फलंदाज देखील असू शकतो. मात्र एमएस धोनीच्या पदर्पणानंतर अनेक असे यष्टिरक्षक फलंदाज होऊन गेले ज्यांना संघात स्थान टिकवून ठेवता आले नाही. आज या लेखातून आम्ही तुम्हाला ५ अशा क्रिकेटपटूंबद्दल माहिती देणार आहोत, ज्यांना एमएस धोनीमुळे खेळण्याची संधी मिळाली नाही.

वृद्धिमान साहा :

भारतीय संघातील यष्टिरक्षक फलंदाज वृद्धिमान साहा अनेकदा खेळाडूंना पाणी पाजताना दिसून आला आहे. एमएस धोनीने २०१४ मध्ये कसोटी क्रिकेटला राम राम केले त्यानंतर वृद्धिमान साहाला संधी मिळायला सुरुवात झाली. मात्र त्यानंतर देखील त्याच्या अडचणी कमी झाल्या नाही. एमएस धोनीनंतर रिषभ पंतमुळे वृद्धिमान साहाला संघात स्थान मिळाले नाही. ३८ वर्षीय वृद्धिमान साहाने भारतीय संघासाठी ४० कसोटी आणि ९ वनडे सामने खेळले आहेत

नमन ओझा:

उत्तम यष्टिरक्षण आणि आक्रमक फलंदाजी साठी ओळखल्या जाणाऱ्या नमन ओझाला देखील भारतीय संघात खेळण्याची खूप कमी संधी मिळाली. त्याची क्रिकेट कारकीर्द देशांतर्गत क्रिकेट खेळण्यात संपून गेली. नमन ओझाला २०१० मध्ये टी -२० क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली होती. त्यावेळी एमएस धोनीला विश्रांती देण्यात आली होती. तर २०१५ मध्ये त्याला आपल्या कारकिर्दीतील पहिला आणि शेवटचा कसोटी सामना खेळण्याची संधी मिळाली होती.

पार्थिव पटेल:

भारतीय संघाचा माजी यष्टिरक्षक फलंदाज पार्थिव पटेल याने वयाच्या १७ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवले होते. एमएस धोनी येण्यापूर्वी पार्थिव पटेल भारतीय संघात होता. मात्र धोनीच्या येण्याने पार्थिव पटेलला संधी मिळणं कमी झालं. एमएस धोनीकडे कुठल्याही क्षणी फलंदाजीला येऊन तुफान फटकेबाजी करण्याची क्षमता होती. त्यामुळे पार्थिव पटेल ऐवजी एमएस धोनीला अधिक संधी दिली गेली. पार्थिव पटेलने भारतीय संघासाठी २५ कसोटी, ३८ वनडे आणि २ टी -२० सामने खेळले.

दिनेश कार्तिक:

ज्या वयात क्रिकेटपटू निवृत्त होण्याचा विचार करतात. त्याच वयात टी -२० क्रिकेटमध्ये फिनिशर म्हणून नावारूपाला आलेला क्रिकेटपटू म्हणजे दिनेश कार्तिक. दिनेश कार्तिकला देखील एमएस धोनीमुळे कमी सामने खेळण्याची संधी मिळाली. त्याला भारतीय संघासाठी एकूण २६ कसोटी, ९४ वनडे आणि ५९ टी -२० सामने खेळण्याची संधी मिळाली. टी -२० विश्वचषक २०२२ स्पर्धेत भारतीय संघ पराभूत झाल्यानंतर आता दिनेश कार्तिक टी -२० क्रिकेटला राम राम करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

रॉबिन उथप्पा

फलंदाजीसह फिटनेसच्या बाबतीत देखील रॉबिन उथप्पा हा सरस होता. मात्र भारतीय संघात त्याला कधीच भविष्यातील यष्टिरक्षक फलंदाज म्हणून पाहिलं गेलं नाही. त्याने आयपीएल स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्स संघासाठी खेळताना यष्टिरक्षक फलंदाजाची भूमिका योग्यरित्या पार पाडली होती. मात्र तरीदेखील त्याला भारतीय संघासाठी जास्त सामने खेळण्याची संधी मिळाली नाही. त्याने भारतीय संघासाठी एकूण ४६ कसोटी आणि १३ टी -२० सामने खेळले आहेत.

काय वाटतं? असा कुठला खेळाडू आहे जो भविष्यात एमएस धोनीची जागा घेऊ शकतो? कमेंट करून नक्की कळवा.

सबस्क्राईब करा

* indicates required