FIFA विश्र्वचषक २०२२ स्पर्धेत मोठा फेरबदल!! मेस्सीचा अर्जेंटिना संघ सौदी अरेबिया संघाकडून पराभूत...

फिफा विश्वचषक २०२२ (FIFA World Cup 2022) स्पर्धेत मंगळवारी (२२ नोव्हेंबर) एक मोठा फेरबदल पाहायला मिळाला आहे. स्टार खेळाडूंनी सजलेल्या  लिओनेल मेस्सीच्या अर्जेंटिना संघाला सौदी अरेबिया संघाने २-१ ने पराभूत केले आहे. मेस्सीला अजूनपर्यंत एकदाही विश्वचषक स्पर्धा जिंकता आली नाहीये. त्यामुळे यावेळी तो जोरदार कामगिरी करून आपल्या संघाला विश्वचषक जिंकून देईल अशी फुटबॉल चाहत्यांची इच्छा आहे. मात्र कतारमध्ये सुरू असलेल्या फिफा विश्वचषक स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात त्याला आपल्या संघाला हवी तशी सुरुवात करून देता आलेली नाहीये.

लिओनेल मेस्सीने सामन्यातील १० व्या मिनिटात आपल्या संघासाठी गोल केला होता. मात्र सामन्यातील दुसऱ्या हाफमध्ये सौदी अरेबिया संघाने जोरदार पुनरागमन केले आणि अर्जेंटिना संघाला पूर्णपणे बॅकफूटवर टाकले. त्यांनी दुसऱ्या हाफमध्ये २ गोल केले. अर्जेंटिना संघाला या सामन्यात सौदी अरेबिया संघाची बरोबरी देखील करता आली नाही. शेवटी अर्जेंटिना संघाला स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. 

सुरुवातीला अर्जेंटिना संघाने आपल्या आक्रमक खेळामुळे सौदी अरेबिया संघाला पूर्णपणे बॅकफूटवर टाकले होते. दुसऱ्याच मिनिटाला लिओनेल मेस्सीला गोल करण्याची संधी मिळाली होती. मात्र ओवेसने त्याला गोल करू दिला नाही. त्यानंतर १० व्या मिनिटाला त्याला गोल करण्याची पुन्हा एकदा संधी मिळाली. यावेळी त्याने कुठलीही चूक केली नाही. त्याने गोल करत अर्जेंटिना संघाला १-० ची आघाडी मिळवून दिली.

सामन्यातील दुसऱ्या हाफमध्ये सौदी अरेबिया संघाला बरोबरी करायची होती. त्यामुळे सौदी अरेबिया संघातील खेळाडूंनी आक्रमण करायला सुरुवात केली. ४८ व्या मिनिटात सौदी अरेबिया संघातील खेळाडूंना यश आले. अल सेहरीने गोल करत सामना १-१ च्या बरोबरी आणला.

त्यानंतर ५५ व्या मिनिटाला सौदी अरेबिया संघाकडून दुसरा गोल करण्यात आला. यावेळी सलेम अल दवसरीने गोल करण्याचा पराक्रम केला. या गोलमुळे सौदी अरेबिया संघाने २-१ ची आघाडी घेतली. हा गोल झाल्यानंतर,अर्जेंटिना संघ पूर्णपणे बॅकफूटवर गेला होता. त्यांनी पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. मात्र अर्जेंटिना संघातील खेळाडू पुनरागमन करण्यात अपयशी ठरले.

सबस्क्राईब करा

* indicates required