computer

धोनीची बॅट गिनीज वर्ल रेकॉर्डमध्ये काय करत आहे? २०११ च्या वर्ल्डकपविषयी ही गोष्ट माहित आहे का?

२०११ च्या क्रिकेट वर्ल्ड कपची फायनल आठवते?   कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने खणखणीत सिक्स मारला आणि भारताने वर्ल्डकप जिंकला. संपूर्ण भारतात त्या दिवशी झालेला जल्लोष कोणीही विसरू शकत नाही. क्रिकेटप्रेमी असो वा नसो, लहान-मोठे स्त्री पुरुष सर्वजण त्यावेळी भावनिक झाले होते. सर्वांच्या लाडक्या सचिन तेंडूलकरचं स्वप्न सर्व संघांने मिळून पूर्ण केलं होतं.

आज ही आठवण काढायचे कारण म्हणजे ज्या बॅटने धोनीने तो विजयी षटकार मारला ती आजपर्यंत जगातली सर्वात महागडी बॅट ठरली आहे. लंडनमध्ये लिलावात त्या बॅटची किंमत वाचून तुम्ही अवाक व्हाल. जगातील सर्वात महागडी बॅट म्हणून तिची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बुकमध्येसुद्धा झाली आहे.

२ एप्रिल २०११ ला भारताने वर्ल्ड कप उंचावला. त्या दिवसाला नुकतेच दहा वर्ष पूर्ण झाले आहेत. अंतिम फेरीत श्रीलंकेला २७४ धावांमध्ये रोखून भारताने फलंदाजी केली. लसिथ मलिंगाने टीम इंडियाला सुरूवातीलाच धक्के दिले, पण गौतम गंभीरने ९७ धावांची महत्त्वाची खेळी केली. तो बाद झाल्यावर पाचव्या क्रमांकावर धोनी स्वतः फलंदाजीला आला. धोनीने कर्णधारपदाला शोभेल अशी खेळी करत ७९ चेंडूत तब्बल ९१ धावा केल्या. ४९ व्या शतकाच्या दुसऱ्या चेंडूवर त्याने सिक्स मारला आणि भारताने दुसऱ्यांदा वर्ल्डकप जिंकला. त्या संपूर्ण खेळीत शेवटी मारलेला सिक्स अजूनही क्रिकेटप्रेमींच्या डोळ्यांसमोरून गेला नसेल.

धोनीच्या त्या बॅटचा लिलाव १८ जुलै २०११ मध्ये लंडनमध्ये करण्यात आला. ईस्ट मिट्स वेस्ट या चॅरिटीत त्याच बॅटला विक्रमी किंमत मिळाली होती. आर के ग्लोबल शेअर अँड सिक्युरिटीज लिमिटेड या कंपनीने या बॅटसाठी तब्बल १,००,००० पाउंड म्हणजे जवळपास १ कोटी रुपये मोजले. यानंतर जगातली सर्वात महागडी बॅट म्हणून तिची गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंदही झाली आहे.

आजपर्यंत अनेक देश वर्ल्ड कप जिंकले आहेत, पण असा विक्रम कोणाच्याच नावावर झाला नव्हता. हा विक्रम एका भारतीय क्रिकेटपटूच्या नावावर नोंदवला गेला ही खरंच अभिमानाची गोष्ट आहे.

 

लेखिका: शीतल दरंदळे

सबस्क्राईब करा

* indicates required