computer

जेव्हा धोनीचा सिक्स भारताला वर्ल्डकप जिंकवतो...

२०१७ सालच्या सुरुवातीला धोनीने कॅप्टनपद सोडले आणि विराट कोहलीकडे संघाची सगळी सूत्रे दिली. त्याआधी त्याने भारतीय संघाला एका नव्या उंचीवर नेऊन ठेवले. अनेक वर्षांपासून कुठल्याच प्रकारचा वर्ल्डकप भारताला मिळत नव्हता. पण धोनी आला आणि त्याने भारताच्या क्रिकेट विश्वाला नवी दिशा दिली. मंडळी,  हा गडी म्हणजे काहीतरी जादूची कांडी फिरवावी तसा सुरवातीला धुवांधार बॅटिंग करायचा. त्याकाळी तडाखेबंद बॅटिंगसाठी प्रसिद्ध असलेले शाहिद आफ्रिदी आणि रिकी पॉटिंगसारखे प्लेयरसुद्धा त्याच्या बॅटिंगचे चाहते झाले होते. भाऊ मैदानात उतरला म्हणजे छक्क्या-चौक्यांची बरसात ठरलेललीच असायची.

अनेक खेळाडूंनी स्वतःचे रेकॉर्ड केले.  पण या पठ्ठयाने सगळ्या प्रकारच्या स्पर्धा जिंकून टीमचे रेकॉर्डस् केले. २००७ साली पहिलाच टी-२० वर्ल्डकप खेळला जात होता. नवख्या टीमला घेऊन गेलेला धोनी आला तो जगज्जेता बनूनच! जगातला सर्वात मोठा मॅच फिनिशर म्हणून त्याची ओळख अशी सहजासहजी निर्माण झाली नाही मंडळी!! कॅप्टनशिप करत असतात कूल असणारा हा गडी बॅटिंग करताना मात्र बॉलर्सवर तुटून पडत असतो. त्याच्याच नेतृत्वाखाली टी-२० वर्ल्डकप भारताने जिंकला, टेस्टमध्ये भारत नंबर १ वर पोचला, आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली, पण सर्वात मोठा सुवर्णक्षण तेव्हा आला जेव्हा त्याच्या नेतृत्वाखाली भारताने तब्बल २८ वर्षांनंतर वर्ल्डकप जिंकला.१९८३ साली कपिलदेवच्या नेतृत्वाखाली वर्ल्डकप जिंकल्यावर भारत कित्येकदा वर्ल्डकप जिंकण्याच्या उंबरठ्यावर पोहोचला होता. पण ऐनवेळी यशाने आपल्याला हुलकावणी दिली होती. पण आपला धोनीभाऊ २०११ ला जिंकू किंवा मरू या निश्चयाने उतरला होता. मंडळी, धोनीने प्रत्येक मॅचची रणनीती थंड डोक्याने ठरवली. प्रत्येक मॅच एक आव्हान होते.  एक-एक आव्हान पार करत टीम फायनलपर्यंत पोहोचली. पण खरा कस लागला तो फायनलमध्ये. ज्यांनी ती मॅच पाहिली, त्यांना आजही तो दिवस आठवला कि रोमांचित व्हायला होते. मंडळी, त्यादिवशी आपण मॅच बघत असताना इतक्या दबावाखाली होतो, तर विचार करा प्रत्यक्ष मैदानावर असलेले आपले प्लेयर्स किती दबावाखाली असतील.

एकापाठोपाठ एक प्लेयर्स आऊट होत असताना धोनी आणि गंभीर क्रिझवर ठाण मांडून बसले होते. मंडळी, तुम्ही आजही त्या मॅचमधला गंभीरचा फोटो बघा, त्याचा टी शर्ट चिखलाने पूर्ण माखलेला आहे. हा पठठ्या दोन तासापेक्षा जास्त काळ क्रिझवर उभा होता. घामाने चिंब झालेल्या गंभीरने श्रीलंकन प्लेयर्स अक्षरशः जेरीस आणले होते. ही अटीतटीची मॅच असल्याने तो पेटून उठला होता. सगळ्या देशाच्या नजरा आपल्यावर टिकून आहेत, आणि त्यांच्या अपेक्षेवर आज खरे नाही उतरलो तर आपण स्वतःला माफ करू शकणार नाही ही भावना गंभीरच्या मनात होती. तो जीव तोडून बॅटिंग करत होता. पण मध्येच काही ओव्हर्स त्याच्यासाठी कठीण केले. त्याने बरेच बॉल्स खाल्ले आणि धोनीने त्याला जोरात बॅटिंग करण्याचा सल्ला दिला. जम बसलेल्या गंभीरचे तोपर्यंत ९७ रन्स झाले होते. जर तो सांभाळून खेळला असता तर त्याला शतक पूर्ण करता आले असते. पण ही वेळ सांभाळून खेळण्याची नाही हे त्याने ओळखले आणि त्याने पुढे येऊन बॅटिंग करायचा प्रयत्न केला आणि याच नादात तो आऊट झाला. तो ९७ रन्सवर आऊट झाला. शतक होण्यासाठी त्याला अवघ्या ३ रन्सची आवश्यकता होती. गंभीर आऊट झाला तरी विजयाची पायाभरणी तो करून गेला होता.

गंभीर नंतर मैदानावर उतरला तो युवराज सिंग!! मंडळी २०११ चा वर्ल्डकप जिंकणे खास का आहे याचे उत्तर या खेळाडूंच्या त्यागात दडलेले आहे. जसा गंभीर पूर्ण थकल्यावर सुद्धा खेळत होता,  जसे अनेक प्लेयर्स जिंकण्यासाठी प्रचंड मेहनत घेत होते, तसाच युवराज सिंगसुद्धा दोनच महिन्यांपूर्वी कॅन्सरसारख्या आजारातून बाहेर येऊनसुद्धा, त्याला डॉक्टरांनी आराम करायला सांगितल्यावरसुद्धा वर्ल्डकप जिंकणाऱ्या टीमचा भाग व्हावा म्हणून खेळत होता. त्याने पूर्ण सिरीजमध्ये सर्वात चांगली बॅटिंग केली. म्हणूनच त्याला मॅन ऑफ द सीरिज म्हणून गौरविण्यात आले. युवराज मैदानावर आला तेव्हा धोनी सेट झालेला होता. म्हणून स्वतः सेट व्हायला वेळ न घेता युवराजने धोनीला स्ट्राईक द्यायला सुरवात केली. आपल्या टीमच्या या नियोजित टीमवर्कमुळे भारत विजयाच्या जवळ येऊन पोचला. अपेक्षेप्रमाणे गौतम गंभीरच्या संयमीत ९७ रन्स आणि धोनीच्या तड़ाखेबाज ९१ रन्सच्या जोरावर  ती मॅच आणि वर्ल्डकप जिंकला, आणि पुन्हा एकदा आपण जगज्जेते आहोत हे भारतीय टीमने सिद्ध केले. मॅच संपली तेव्हा गंभीर आऊट झाला होता. मैदानावर धोनीसोबत युवराज होता.

विनिंग सिक्स

मॅच शेवटच्या ओव्हरपर्यंत एका बाजूला झुकली नव्हती. जगभरात प्रेक्षकांच्या नजरा वानखेडेवर टिकून होत्या. भारतात लोक टिव्हीसमोरून हलत सुद्धा नव्हते. मॅच पुढे सरकेल तशी भारतीयांच्या जीवाची घालमेल होत होती. एवढ्या वर्षांनी विश्वविजेता बनण्याची संधी चालून आली होती. ती हातातून नको जायला असे प्रत्येकाला वाटत होते.  ४९व्या ओव्हरपर्यन्त उत्कंठा ताणून धरलेल्या या मॅचचे कधी पारडे कुठल्या बाजूला झुकेल काहीच सांगता येत नव्हते. जम बसलेला गंभीर जसा अचानक आऊट झाला तसा अचानक धोनी गेला तर काय? या विचाराने प्रेक्षक टेन्शनमध्ये आले होते. आणि शेवटची ओव्हर टाकायला श्रीलंकेचा नुवान कुलशेखरा आला. या ओव्हरमध्ये आपल्याला जिंकण्यासाठी ६रन्स हवे होते. कुलशेखराने त्या ओव्हरमधला दुसरा बॉल टाकला आणि धोनीने आपला नेहमीचा हेलीकॉप्टर शॉट फिरवला. बॉल हवेत गेला, कॉमेंट्री करत असलेला रवी शास्त्री ओरडला, 'और ये बॉल सीधा बॉंड्रीके उस पार' आणि मैदानात एकच जल्लोष सुरु झाला. भारत जगज्जेता झाला होता. धोनीच्या विनिंग सिक्समुळे भारताचे अनेक वर्षांचे स्पप्न साकार झाले होते. आपल्या प्लेयर्सनी या एका क्षणासाठी वर्षानुवर्षं मेहनत केली होती. सचिनचे निवृत्त होण्याआधी वर्ल्डकप जिंकण्याचे स्वप्न साकार झाले होते. देशभरात दिवाळी साजरी होत होती.

 

मंडळी, क्रिकेट असा खेळ आहे जिथे सगळे जात-पात-धर्म विसरून एकत्र येतात. तो दिवस भारतासाठी ऐतिहासिक होता. धोनीच्या एका सिक्सने देशात एक नवी ऊर्जा भरली होती म्हणून तो सिक्स इतिहासात अमर झाला आहे. जेव्हा पण भारताच्या वर्ल्डकप विजयाचा विषय निघेल,  तो धोनीच्या विनिंग सिक्सशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. ते दृश्य आजपण भारतीयांच्या हृदयात घर करुन आहे.

 

मंडळी,  धोनीच्या या विनिंग सिक्सची गोष्ट तुमच्या मित्रांसोबत पण शेयर करा आणि आपल्या सुवर्णपर्वाच्या आठवणी जाग्या करा...

 

आणखी वाचा :

जेव्हा मॅच हरल्यावर पाकिस्तानी कोचचा मृत्यू होतो....हा खून होता की नैसर्गिक मृत्यू ??

जेव्हा १३ बॉल २२ वरून १ बॉल २२ ला टार्गेट येते...काय घडलं होतं १९९२ च्या वर्ल्डकप सेमीफायनल मध्ये ??

कपिल देवने हे केले नसते तर भारताने १९८३ चा वर्ल्डकप जिंकलाच नसता !!

१९९६ च्या वर्ल्डकप मध्ये ऐन सामन्यात विनोद कांबळी का रडला होता ??

भारताचा क्रिकेटमधला विजय जेव्हा एका ब्रिटिश संपादकाला त्याचा लेख चक्क खायला भाग पाडतो, माहिती आहे का हा भन्नाट किस्सा ??

सबस्क्राईब करा

* indicates required