computer

वर्ल्ड कप १९९९ : वडिलांच्या मृत्यूचे दुःख बाजूला सारून सचिन मैदानात उतरतो.

१९९९ साली होणाऱ्या वर्ल्डकपसाठी भारतात खूप उत्साह होता. कारण यावेळी पण वर्ल्डकप इंग्लंडमध्ये होत होता. कपिलदेवच्या नेतृत्वाखाली भारताने इंग्लंडमध्ये पहिल्यांदाच वर्ल्डकप जिंकला होता. तोच इतिहास पुन्हा  रिपीट होईल असे सगळ्यांना वाटत होते. आपले मेन इन ब्लू पुन्हा एका जेतेपदासाठी सज्ज झाले होते.

यावेळचा वर्ल्डकप थोडा वेगळा होता मित्रांनो! भारतात जागतिकीकरणामुळे आता क्रिकेटर्ससुद्धा मालामाल व्हायला लागले होते. कोऱ्या जर्सीऐवजी विविध ब्रांड्सच्या जाहिराती जर्सीवर दिसायला लागल्या होत्या. या सगळ्यात मीडिया पण आता भारताच्या कानाकोपऱ्यात पोहोचायला सुरुवात झाली होती.  वर्ल्डकपसाठी सगळ्याच मोठ्या मिडीया समूहांनी विशेषांक काढले होते. मंडळी, आपले मीडियावाले किती हौशी आहेत हे जगजाहीर आहे. त्यांनी वातावरण भारतच्या बाजूने तापवून ठेवले होते. एका मीडिया हाऊसने तर भारत का वर्ल्डकप जिंकेल याची ११ कारणे छापली होती. त्यावेळी आपल्या टीममध्ये एकापेक्षा एक भारी प्लेयर्स होते. मोहम्मद अझहरुद्दीन धावांचा पाऊस पाडत होता. कॅप्टन म्हणून तो खूप यशस्वी होत होता. मंडळी, लोभ माणसाला कसा बरबाद करतो याचे हा गडी एक मोठे उदाहरण आहे. फिक्सिंगमध्ये सापडला नसता तर अझरुद्दिन भारताचा सर्वात यशस्वी कॅप्टन झाला असता. फिक्सिंगमुळे करियर संपलेला आणखी एक प्लेयर- अजय जडेजा पण टीममध्ये होता. सौरव गांगुली जोरात पुढे आलेला होता. राहुल द्रविडने कमी काळात आपला जलवा दाखवून दिला होता. या सगळ्या जमेच्या बाजू पाहता, भारताला पुन्हा एकदा वर्ल्डकप जिंकणं काहीच अवघड नव्हतं.

सचिन तर रेकॉर्डवर रेकॉर्ड करत होता. मंडळी, खरं तर त्या वर्ल्डकपच्या वेळी सचिन फिट नव्हता. पण हा भाऊ म्हणजे काहीही झाले तरी वर्ल्डकप चुकवणार नाही असे म्हणत होता. मग काय, पठ्ठ्याने ट्रेनिंग सुरु केली. पाठदुखी व्हायला नको म्हणून सचिन जमिनीवर झोपायला लागला. तो फक्त वर्ल्डकपमध्ये नाही या एका बातमीने त्याच्या चाहत्यांचा हिरमोड झाला असता. भारताच्या प्लेयर्सनासुद्धा तो प्रेरणा द्यायचा. वर्ल्डकपचा संग्राम सुरु झाल्याझाल्या भारताला पहिल्याच मॅचमध्ये मार खावा लागला. साऊथ आफ्रिकेने आपला पराभव केला. दुसरी मॅच झिम्बाब्वेविरुद्ध होती. ही मॅच आपण सहज जिंकणार असे वाटत होते. तितक्यात एक धक्कादायक घटना घडली. झिम्बाब्वेविरुद्ध मॅचच्या आदल्या दिवशी सचिन त्याचा मित्र अतुल रानडेसोबत आपल्या रूमवर आराम करत होता. तेवढ्यात त्याच्या रूमची बेल वाजली. सचिनने दरवाजा उघडला, दरवाज्यात सचिनची बायको अंजली उभी होती. अंजलीसोबत अजय जडेजा आणि रॉबिन सिंगपण होते. ते लंडनहून लेस्टरला म्हणजे इंडिया आणि झिम्बाब्वेची मॅच होणार होती, तिथे एक दु:खद बातमी घेऊन आले होते. सचिनचे वडील- प्रोफेसर आणि कवि रमेश तेंडुलकर यांचे निधन झाले होते. गेल्या काही काळापासून त्यांची तब्येत चांगली नव्हती. पण असा अचानक निरोप येईल हा विचार सचिनने स्वप्नातसुद्धा केला नव्हता. आजारी असताना ते सचिनकडेच राहत होते. अंजली त्यांची सगळी काळजी घेत होती. त्यांची तब्येत हळूहळू सुधारत होती. सचिन पण म्हणूनच निश्चित होता. पण या अचानक आलेल्या बातमीने तो हादरून गेला. सकाळी सचिन मुंबईत परतला.

 

सचिनचे सांत्वन करण्यासाठी त्याचे मित्र, सहकारी आणि नातेवाईक उपस्थित होते. मंडळी, पिता हा माणसासाठी सर्वकाही असतो. असे म्हणतात की जेव्हा बाप नावाची चादर जीवनातून निघून जाते,  तेव्हा खऱ्या जबाबदारीची जाणीव होते. स्वतः प्रोफेसर असूनसुद्धा त्यांनी सचिनला क्रिकेटमध्ये करिअर करण्याची परवानगी दिली होती. एवढेच नव्हे, तर त्याच्या संघर्षाच्या काळात त्याच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहिले होते. वडील गेल्याने सचिनच्या आयुष्यात मोठी पोकळी निर्माण झाली होती. सचिन वर्ल्डकप सोडून परत आल्याने भारतीय टीमचा उत्साह कमी झाला होता. मंडळी, सचिन नसताना झिम्बाब्वेसारख्या टीमने सुद्धा आपल्याला हरवलं होतं.  यावरून सचिनचे काय महत्व असेल याचा अंदाज येईल. त्याचे वडील गेले असल्याने खुद्द बीसीसीआय पण त्याला बोलवायचा विचार करत नव्हती. सेमी फायनलमध्ये जायचं असेल, तर येणारी मॅच जिंकणे भारतासाठी गरजेचे होते. अशा परिस्थितीत सचिनच्या आईने पुढाकार घेतला. स्वतःचा नवरा गेल्यानंतर मुलाने जवळ असावे ही इच्छा प्रत्येक आईची असते, पण त्यांनी स्वतःपेक्षा देशाला महत्व दिले आणि आपल्या मुलाला पुन्हा खेळण्यासाठी परत लंडनला जायला सांगितले.

आईने सांगितले आणि सचिनने ऐकले असेही झाले नसते.  पण त्याच्या मनातदेखील देशासाठी खूप प्रेम होतं आणि क्रिकेट म्हणजे त्याचा जीव की प्राण!  त्यापासून तो दूर कसा राहू शकला असता? केनियाविरुद्ध ब्रिस्टनला झालेल्या मॅचमध्ये जेव्हा सचिन बॅटिंगसाठी आला तेव्हा मैदानावर असलेल्या प्रेक्षकांनी त्याला उभे राहून मानवंदना दिली. वडिलांच्या मृत्यूनंतर खेळायला उतरलेल्या सचिनने त्यादिवशी मुसळधार बॅटिंग केली. अवघ्या १०४ बॉल्समध्ये त्याने १४० रन केले. त्यात त्याने १२ चौकार आणि ३ सिक्सरचा पाऊस पाडला. सोबत उतरलेल्या राहुल द्रविडने पण शानदार बॅटिंग करत १०४ रन केले. सचिनने शतक केल्यावर मैदानात एकच जल्लोष झाला!! भारताने या मॅचमध्ये सचिनच्या खेळीच्या जीवावर ३२९ धावांचा डोंगर उभा केला. भारताने ही मॅच ९४ धावांनी जिंकली. याच मॅचमध्ये सौरव गांगुलीने पण केनियाच्या टीमची जबरदस्त धुलाई केली.

 

मंडळी,  सचिनसारखे प्लेयर मोठे होतात ते त्यांच्या अशा त्यागामुळे. त्याच्या याच गुणांमुळे तो भारतरत्न आहे.  सचिनकडून प्रेरणा घेण्यासारखं बरंच काही आहे मंडळी!!

आणखी वाचा :

जेव्हा मॅच हरल्यावर पाकिस्तानी कोचचा मृत्यू होतो....हा खून होता की नैसर्गिक मृत्यू ??

जेव्हा १३ बॉल २२ वरून १ बॉल २२ ला टार्गेट येते...काय घडलं होतं १९९२ च्या वर्ल्डकप सेमीफायनल मध्ये ??

कपिल देवने हे केले नसते तर भारताने १९८३ चा वर्ल्डकप जिंकलाच नसता !!

१९९६ च्या वर्ल्डकप मध्ये ऐन सामन्यात विनोद कांबळी का रडला होता ??

भारताचा क्रिकेटमधला विजय जेव्हा एका ब्रिटिश संपादकाला त्याचा लेख चक्क खायला भाग पाडतो, माहिती आहे का हा भन्नाट किस्सा ??

सबस्क्राईब करा

* indicates required