ज्याच्या नेतृत्वाखाली भारतीय १९ वर्षाखालील संघाने विश्वचषक स्पर्धेत विजय मिळवला होता त्या यश धूलची ओळख करून घ्या
संपूर्ण नाव - यश विजय धूल
जन्म तारीख - ११ नोव्हेंबर, २००२
जन्मस्थळ - दिल्ली
मुख्य संघ - भारतीय १९ वर्षाखालील संघ, दिल्ली १९ वर्षाखालील संघ, दिल्ली १६ वर्षाखालील संघ
फलंदाजी शैली - उजव्या हाताचा फलंदाज
गोलंदाजी शैली - उजव्या हाताचा गोलंदाज
प्रथम श्रेणी पदार्पण - दिल्ली विरुद्ध तामिळनाडू, १७ फेब्रुवारी ते २० फेब्रुवारी, २०२२
अशी राहिली आहे कारकीर्द
यश धूलने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये १ सामना खेळला आहे, ज्यामध्ये त्याने २२६ च्या सरासरीने २२६ धावा केल्या आहेत. यामध्ये नाबाद ११३ धावा ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे.
थोडक्यात माहिती -
यश धूलचा जन्म दिल्ली स्थित जनकपुरी येथे सामान्य कुटुंबात झाला होता. त्याचे आजोबा जगत सिंग धूल भारतीय सैन्यात होते. तर वडील विजय धूल खाजगी नोकरी करतात. तसेच आई नीलम धूल गृहिणी आहे.
सामान्य कुटुंबात जन्मलेल्या यश धूलला लहानपणापासूनच क्रिकेटची आवड होती. सुरुवातीला तो घरच्या अंगणात क्रिकेट खेळायचा. वयाच्या १२ व्या वर्षी त्याला दिल्लीच्या १६ वर्षाखालील संघात स्थान मिळाले होते. आपल्या मुलाचे भविष्य उज्वल व्हावे म्हणून त्याच्या वडिलांनी सेल्समनची नोकरी देखील सोडून दिली होती. त्यानंतर ते पार्ट टाईम काम करू लागले होते.
यश धूलच्या नेतृत्वाखाली भारतीय १९ वर्षाखालील संघाने १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेत विजय मिळवला होता. तसेच विनू मांकड स्पर्धेत त्याने दिल्ली संघाचे प्रतिनिधित्व करताना ५ सामन्यात ७५.५० च्या सरासरीने ३०२ धावा केल्या होत्या. याच कामगिरीच्या जोरावर त्याला भारतीय १९ वर्षाखालील संघाचे कर्णधारपद देण्यात आले होते. त्याने या स्पर्धेतील ४ सामन्यात ७६.३३ च्या सरासरीने २२९ धावा केल्या होत्या. यादरम्यान त्याने एक शतक आणि एक अर्धशतक झळकावले होते.




