computer

रिलीज होऊ न शकलेले ११ हिंदी सिनेमे...यातला कोणता सिनेमा रिलीज व्हावा असं वाटतं ?

भारतात हजारो फिल्म्स तयार होत असतात. त्यातल्या अनेक फिल्म्स आपटतात, तर काही फिल्म्स १०० कोटीचा आकडा पार करतात. ६०, ७०, किंवा ८० च्या दशकात सिल्व्हर ज्युबिली आणि गोल्डन ज्युबिलीवरून फिल्म हिट झाली की फ्लॉप हे समजायचं. फिल्म्समधून कोटींची उलाढाल होत असते. निर्माता, दिग्दर्शक आणि लेखकाचा वेळ आणि पैसे फिल्ममध्ये लागलेले असतात. एवढ्या मेहनती नंतरही काहीवेळा फिल्म रिलीज होत नाही. अशावेळी मोठा तोटा होतो राव!! अशा फिल्म्सची बॉलीवूडमध्ये कमी नाही राव. छोट्या तर जाऊदेत, मोठमोठ्या कलाकारांच्यासुद्धा फिल्म्स रिलीजच झालेल्या नाहीत. याचं सगळ्यात चांगलं उदाहरण म्हणजे मुन्नाभाई पार्ट ३. ट्रेलर रिलीज होऊनही फिल्म रिलीज झाली नाही. अशाच आणखी काही फिल्म्स आहेत. 

चला तर आज अशा १० फिल्म बद्दल जाणून घेऊया ज्यांना रिलीज होण्याचा मुहूर्तच अजून लाभला नाही.

१. कुची कुची होता है

‘कुची कुची होता है’ हा धर्मा प्रोडक्शन्सच्या ‘कुछ कुछ होता है’ चा एनिमेटेड व्हर्जन होता. या फिल्ममध्ये कुत्र्यांची कथा सांगण्यात येणार होती. अर्थातच शाहरुख, काजोल, राणीच्या रुपात डॉगी होते. या फिल्मचा तर ट्रेलरसुद्धा आला होता. २०११ साली फिल्म रिलीजसाठी सज्ज झाली होती, पण ती २०१२ मध्ये रिलीज होणार असं सांगण्यात आलं. पुढे २०१२ ही गेलं आणि आजवर “कुची कुची होता है” रिलीज झालेली नाही. 

२. तलीस्मान

विधू विनोद चोप्रासारखा बडा निर्माता, अमिताभसारखे दिग्गज स्टार आणि नंदन खत्री यांची ‘चंद्रकांता’ कथा. या सगळ्यांची मिळून तलीस्मान तयार होणार होती. सिनेमात अमिताभ आजोबा सुपरहिरोच्या रुपात होते. पण काय झालं ना, कमजोर स्क्रिप्टमुळे फिल्म बनू शकली नाही. तब्बल १४ वेळा ड्राफ्ट लिहूनही मनासारखी स्क्रिप्ट तयार न झाल्याने तलीस्मान केराच्या टोपलीत गेली.

३. मुन्ना भाई चले अमेरिका

मुन्नाभाई एमबीबीएस झाले आणि मग रेडीओ जॉकीसुद्धा झाले.  पण त्यानंतर मुन्नाभाई अमेरिकेला जाऊन काय कमाल करतायत हे बघण्याची सगळ्यांनाच उत्सुकता होती. झालं असं की, अमेरिकेच्या जागी संजू बाबा गेले जेलमध्ये आणि सगळंच बारगळलं. या सिनेमाचा ट्रेलर तुम्हीसुद्धा बघितला असणार. आता अशी बातमी येत आहे की राजकुमार हिरानी आणि लेखक अभिजात जोशी मिळून नवीन स्क्रिप्टवर काम करत आहेत. कदाचित २०२० पर्यंत मुन्नाभाई पुन्हा एकदा भेटीला येतील. 

४. फिर से

छोट्या पडद्यावर गाजलेली जेनिफर विंगेट ‘फिर से’ सिनेमातून भेटीला येणार होती. पण सिनेमा रिलीज होऊ शकला नाही. २०१५ रोजी रिलीज होणारी फिल्म शेवटी रडतखडत यावर्षी नेटफ्लिक्सवर रिलीज झाली. 

५. पांच

साल २००३ : अनुराग कश्यपचा पहिला सिनेमा. सेन्सॉर बोर्डच्या कात्रीत अडकल्याने थियेटर पर्यंत पोहोचू शकला नाही. अत्यंत बालिश कारणांनी या फिल्मला सर्टिफिकेट नाकारण्यात आलं. पुढे ही फिल्म युट्युबवर आल्यानंतर अनुराग कश्यपचं कौतुक झालं. आजही तुम्ही युट्युब वर पांच बघू शकता.

६. कामसूत्र 3D

कान्स फिल्म फेस्टिव्हल आणि चक्क ऑस्कर अवार्ड्समध्ये जाऊन सुद्धा कामसूत्र 3D भारतात रिलीज होऊ शकली नाही. कारण अर्थातच तुम्ही समजू शकता. या सिनेमात प्रमुख भूमिकेत आपले ‘भटकंती’वाले मिलिंद गुणाजी होते राव. 

७. लेडीज ओन्ली

या सिनेमात ‘रणधीर कपूर’ प्रमुख भूमिकेत होते. सिनेमात एका सीन मध्ये डेड बॉडीच्या रुपात चक्क कमल हसन असणार होते. १९९७ मध्ये फिल्म बनून तयार होती. पण फिल्म रिलीज का नाही झाली हे आजवरचं गूढ आहे. 

८. टाईम मशीन

‘टाईम मशीन’ मिस्टर परफेक्शनीस्ट आमिर खानची फिल्म होती. आमिरसोबतच भलीमोठी स्टारकस्ट होती राव. नसिरुद्दीन शहा, रविना टंडन, गुलशन ग्रोवर, रेखा, विजय आनंद. आर्थिक कारणांनी  फिल्मचं अर्ध्यापेक्षा जास्त शुटींग होऊनही फिल्म बनू शकली नाही. पुढे फिल्मचे दिग्दर्शक शेखर कपूर यांनी नवीन स्टारकस्ट सोबत फिल्म तयार करण्याची घोषणा केली होती, पण तेही कधी शक्य झालं नाही.

९. दस

सल्लू मिया आणि संजू बाबा या दोघांची जोडी असलेला दस सिनेमा १९९६ साली येणार होता. पण दिग्दर्शक मुकुल आनंद यांच्या निधनानंतर फिल्म बनू शकली नाही. पुढे २००५ साली याच नावाची दुसरी फिल्म तयार झाली. संजू बाबा, सुनील शेट्टी, अभिषेक बच्चन ही फळी नव्या सिनेमात होती. या सिनेमाच्या माध्यमातून मुकुल आनंद यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

१०. देसी मॅजिक

आपल्या करियर मध्ये काही खास काम न करू शकलेली अमिषा पटेल २०१३ साली ‘देसी मॅजिक’ मधून कमबॅक करणार होती. पण शुटींगच्या तारखा पुढे ढकलल्याने फिल्म आजवर रिलीज झालेली नाही. पुढे कधी रिलीज होईल याचाही पत्ता नाही.

११. लिबास

गुलजारजींच्या ‘रावी पार’ या गाजलेल्या कथा संग्रहातील ‘सीमा’ या कथेवर आधारित लिबास सिनेमा स्वतः गुलजार यांनी दिग्दर्शित केला होता. सिनेमाची कथा विवाहबाह्य संबंधांवर होती. याच कारणाने तो रिलीज होऊ शकला नाही. २९ वर्षांनी २०१७ साली फिल्मला शेवटी रिलीज करण्यात आलं.

 

मंडळी, यातला कोणता सिनेमा रिलीज व्हायला पाहिजे होता असं तुम्हाला वाटतं ?

 


 

आणखी वाचा :

तब्बल २९ वर्षांनी हा सिनेमा अखेर रिलीज होतोय...जाणून घ्या तो भारतात इतकी वर्षं का दाखवला गेला नव्हता...

बॉलीवूडने ही पोस्टर्स हॉलीवूडमधून ढापलीयेत...बघा तर यात तुमच्या आवडत्या सिनेमाचं नाव आहे का !!

सबस्क्राईब करा

* indicates required