computer

सहकारी साखर कारखान्यांचा समृध्द जिल्हा-अहमदनगर

साखर कारखान्यांचा जिल्हा म्हणून राज्यात ओळख असलेला अहमदनगर हा राज्यात पुढारलेल्या जिल्ह्यांपैकी एक आहे. आकाराच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा असलेला नगर अनेक बाबतीत संपन्न आहे. अशा या नगर जिल्ह्याची माहिती आज आपण वाचणार आहोत.

राज्यातला पहिला साखर कारखाना १९५० साली डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांनी स्थापन केला आणि राज्यात सहकाराची लाट आली. याच सहकाराने राज्याच्या संपन्नतेत मोठी भर घातली. प्रसिध्द अर्थतज्ञ धनंजयराव गाडगीळ यांना सोबत घेऊन या कारखान्याची मुहूर्तमेढ रोवण्यात आली होती.

नगरचा इतिहास बघायला गेले तर पार १२ व्या शतकापर्यंत मागे जावे लागेल. मराठी भाषेच्या सौंदर्यात भर घालणारा आणि मोठा आध्यात्मिक ठेवा असलेला ग्रंथ ज्ञानेश्वरी, जिल्ह्यातील नेवासे या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिला होता. तसेच १९४२ साली झालेल्या चले जाव चळवळीत पंडित नेहरू, सरदार पटेल, मौलाना आझाद या नेत्यांसह अनेक नेत्यांना नगर जिल्ह्यातील भुईकोट किल्ल्यात बंदी करून ठेवण्यात आले होते. याच ठिकाणी पंडित नेहरू यांनी त्यांचा प्रसिद्ध ग्रंथ 'डिस्कव्हरी ऑफ इंडिया' लिहिला होता.

नगर जिल्हा भौगोलिकदृष्टीने पण विशेष आहे. राज्यातील सर्वात उंच शिखर-कळसूबाई हे अकोले तालुक्यात येते. संगमनेर आणि अकोले हे दोन तालुके सह्याद्रीच्या डोंगररांगेसाठी माहिती आहेत. हरिश्चंद्र बालाघाट ही नगर जिल्ह्यातील प्रमुख डोंगररांग आहे. घोड, भीमा आणि सीना या नद्या जिल्ह्याच्या दक्षिण बाजूला वाहतात.

नगर जिल्ह्यात असलेल्या साखर कारखान्यांची संख्या लक्षात घेता जिल्ह्यातील प्रमुख पीक हे ऊस असेल हे वेगळे सांगण्याची गरज नाही. पण ज्वारी हे सुद्धा अतिशय महत्वाचे पीक या जिल्ह्यात घेतले जाते. सूर्यफूल या पिकाचे उत्पादन याच जिल्ह्यात चांगल्या प्रमाणावर घेतले जात असते. फळांच्या बाबतीत द्राक्ष, डाळिंब, मोसंबी या पिकांचे क्षेत्र आहे. श्रीरामपूर या ठिकाणी तर मोसंबी संशोधन केंद्र आहे. नगर जिल्ह्याची विशेषता असलेले शेंवतीचे फुले यांना राज्याबरोबर राज्याबाहेर पण मोठ्या प्रमाणावर मागणी आहे.

दळणवळणाचा विचार करायचा झाल्यास महाराष्ट्राची लाडकी लालपरी (एसटी) १९४८ साली सर्वप्रथम नगर - पुणे या रस्त्यावर धावली होती. जिल्ह्यातून जाणारे दोन महत्वाचे राष्ट्रीय महामार्ग म्हणजे क्रमांक ५० चा नाशिक - पुणे आणि क्रमांक २२२ चा कल्याण - विशाखापट्टणम यांचे नाव घेता येईल. जिल्ह्यात जवळपास २०० किलोमीटरचा रेल्वेमार्ग आहे.

पर्यटनाच्या बाबतीत माळढोक अभयारण्य, चांदबीबी महल, भंडारदरा धरण, भुईकोट किल्ला, हरिश्चंद्रगड हे प्रसिध्द आहेत. तर शिर्डी आणि शनी शिंगणापूर येथे जगभरातील भाविक दर्शनासाठी येत असतात. तसेच अमृतेश्वर मंदिर, जगदंबामाता मंदिर, भगवानगड, रेणुकामाता मंदिर हे भाविकांचे श्रद्धास्थळ आहेत.

अहमदनगर जिल्ह्याची ही माहिती तुम्हाला आवडली असल्यास आपल्या मित्रांना जरुर शेयर करा.

सबस्क्राईब करा

* indicates required