लायन किंग येतोय आता नव्या रुपात. जुनं काय नसेल आणि नवीन काय काय असेल पटापट वाचून घ्या

‘दि लायन किंग’ म्हटल्यावर आपल्याला आठवते ती प्रसिद्ध पोज. राफिकी वानराने सिम्बाला उंच धरलेलं आहे आणि सगळे प्राणी त्यासमोर नतमस्तक होतायत. याशिवाय सिम्बाला किडे खाऊ घालणारे, हाकून मटाटा (नो टेन्शन) गाणारे टिमॉन आणि पुम्बाची जोडी आठवल्याशिवाय राहणार नाही. यात काही शंकाच नाही की लायन किंग सिनेमावर एक संपूर्ण पिढी मोठी झाली आहे.
गेल्याच वर्षी वॉल्ट डिझनीने जंगल बुक सिनेमाची नवी आवृत्ती आणली होती. तशीच आता दि लायन किंगला आपण नव्या अवतारात पाहणार आहोत. लवकरच लायन किंगचा CGI रिमेक येतोय. आजच 3D रूपातल्या ‘लायन किंग’चा हिंदी ट्रेलर रिलीज झालाय. आपण लहानपणी जी 2D मध्ये फिल्म पाहिली होती त्याचं हे भव्य रूप असणार आहे.
सिम्बाचे वडील म्हणजे मुफासा सिंहाला कबीर बेदी आपला भारदस्त आवाज देणार आहेत. ट्रेलरची सुरुवातच त्यांच्या आवाजाने होते. नवीन राजाच्या आगमनाची नांदीच ट्रेलर मधून दिसत आहे. आणि हो, लायन किंगची ओळख असलेली ती प्रसिद्ध पोजही आहे बरं का. पण तुम्हाला ही पोज काहीशी तुटक वाटेल. आता वॉल्ट डिझनीवाले सगळंच काही एकदाच दाखवणार नाहीत. नाही का ?
जंगल बुकचे दिग्दर्शक ‘जॉन फेव्रो’ यांनीच लायन किंगचं दिग्दर्शन केलं आहे. आपल्या लाडक्या मोगलीला नव्या रुपात समर्थपणे आणल्यानंतर लायन किंगही तेवढ्याच ताकदीचा असेल यात शंकाच नाही.
चला तर आता ट्रेलर पाहून घ्या. ट्रेलर कसा वाटला ते सांगायला विसरू नका !!