computer

चेहऱ्याला हात लावण्याची सवय कशी मोडाल? हे उपाय करून पाहा !!

चेहऱ्याला हात लावू नये, हा पहिला नियम कोरोनापासून वाचण्यासाठी सांगण्यात येत आहे. कारण चेहऱ्याला हात लागल्यास कोरोना होण्याची शक्यता वाढते. आपण किती वेळा चेहऱ्याला हात लावत असू याचा अंदाज नाही. अगदी उठता-बसता चेहरा आणि हाताचा संबंध येत असतो. कोरोना तर आत्त्ता आला आहे, पण चेहऱ्याला हात लावण्यामुळे फ्लू किंवा सर्दीसंबंधीसुद्धा आजार होण्याचा धोका असतो. पण सध्या कोरोनाकाळात तर हा धोका जास्तच वाढला आहे. कारण तोंड आणि डोळे यांच्यामाध्यमातून विषाणू सहज शरीरात प्रवेश करू शकतो.

२०१५ साली ऑस्ट्रेलियामधल्या एका युनिव्हर्सिटीने प्रयोग केले आणि त्यांच्या लक्षात आले की माणूस तासाभरात साधारणतः २३ वेळा चेहऱ्याला हात लावतो. त्यातही जास्तीत जास्त वेळा नाक, तोंड आणि डोळ्यांनाच हात लागतो. आणि दुर्दैवाने हेच विषाणूचे प्रवेशद्वार असतात.

याच्यावर सातत्याने हात धुणे हा एक उपाय असू शकतो. हात कमीत कमी २० सेकंद धुवायला हवा. पण तरीही चेहऱ्याला हात लावण्यापासून स्वत:ला रोखणे महत्वाचे आहे. कारण विषाणू कुठल्याही क्षणी तुमच्या हाताच्या संपर्कात येण्याची शक्यता असते.

चेहऱ्याला हात लावला जाऊ नये यासाठी तुम्ही काही उपाय करू शकता. म्हणजे पाहा, हाताला रबर बांधू शकता!! जेव्हा चेहऱ्याकडे हात जाईल तेव्हा ते रबर पाहून तुम्हाला चेहऱ्याला हात लावायचा नाहीय हे आठवेल. अनेक मानसोपचारतज्ञांच्या मते चेहऱ्याला परत परत हात लावणे ही एक सवय आहे आणि ती सहज मोडता येऊ शकते.

स्वतःवर सातत्याने लक्ष ठेवण्याने यावर बराच कंट्रोल येऊ शकतो. ऑफिस किंवा घरात असताना फोनवर रिमाईंडरसुद्धा लावता येईल. यामुळे सतत सूचना मिळून तुमचं चेहऱ्याला हात लावणं क्रमश: कमी होत जाईल. पण किती मिनिटांच्या अंतराने रिमाईंडर सेट करायचा हा प्रश्नच आहे आणि तुमच्या सतत वाजणाऱ्या रिमाईंडर्समुळे बाकी पब्लिकल त्रास होईल हे मात्र लक्षात घ्या बरं!

सतत कामात राहाणं हाही एक उपाय मानला जाऊ शकतो. हात सतत काही ना काही कामात गुंतून राहिले तर त्यांचा चेहऱ्याशी संबंध येण्याची शक्यता नक्कीच कमी होईल.

सेंटेड सॅनिटायझर वापरल्यानेसुद्धा ही सवय कमी करता येते. आता तुम्ही म्हणाल वरचे उपाय ठीक आहेत, पण आता सॅनिटायझर काय करेल? तर सेंटेड सॅनिटायझरमुळे जेव्हा तुमचा हात चेहऱ्याकडे जाईल तेव्हा त्याच्या वासाने तुम्हाला चेहऱ्याला हात लावायचा नाहीये, हे आठवेल आणि आपोआप तुम्ही चेहऱ्याला हात लावण्यापासून वाचाल. मात्र सॅनिटायझर चांगल्या प्रतीचे निवडा नाहीतर मूळ दुखणं तर राहिलच, पण नवं दुखणंही मागे लागेल.

आम्ही आधीच म्हटल्याप्रमाणे कितीही हात धुतले तरी चेहऱ्याला हातच न लावणे हा सर्वात चांगला उपाय आहे. तर त्यासाठी आम्ही काही उपाय सांगितले आहेत. ते इतरांसोबतही शेअर करा आणि त्यांनाही याबद्दल जागृत करा...

सबस्क्राईब करा

* indicates required