लोकांना डिप्रेशन मधून बाहेर काढणारा कुत्रा आता डॉक्टर म्हणून ओळखला जाणार...वाचा थेरपी डॉग 'मुज'बद्दल !!

आजवर तुम्ही कुत्र्यांबद्दल कृतज्ञता म्हणून लोकांनी केलेल्या अनेक गोष्टी ऐकल्या असतील. पण एक कुत्रा आता चक्क डॉक्टर होणार आहे. तुम्ही काहीही चुकीचे वाचले नाहीये. अमेरिकेतील व्हर्जिनिया टेक नावाच्या विद्यापीठाने मुज या कुत्र्याला डॉक्टरेट देऊन सन्मानित केले आहे.
कोरोनामुळे व्हर्जिनिया टेक विद्यापीठाला आपला पदवीदान सोहळा ऑनलाईन घ्यावा लागला. पण जेव्हा तिथे चक्क एका कुत्र्याला डॉक्टरेट देण्यात आली तेव्हा लोकांच्या भुवया चांगल्याच उंचावल्या. तिथं ८ वर्षांच्या मुजला पशु चिकित्सेत मानद डॉक्टरेट देऊन सन्मानित करण्यात आले.
विद्यापीठाच्या मते मुज डेविसने विद्यापीठाच्या सेवेसाठी आयुष्य दिले आहे. थेरपी डॉग म्हणून त्याचे कार्य हे उत्कृष्ट आहे. २०१४ पासून मुज हा विद्यापीठाच्या सेवेत आहे.
मुज हा न्यूयॉर्कमध्ये वाढला. पण त्याचे आरोग्य हा त्याच्या थेरपी डॉग होण्यामधील सर्वात मोठा अडथळा होता. पण त्याला डेव्हिड यांनी दत्तक घेतले. डेव्हिड यांचा हेतूसुद्धा मुजला थेरपी डॉग बनवण्याचा होता. डेव्हिड सांगतात की मुज नोकरीसाठी अर्ज करू शकत नाही, पण तो आता एक चांगला थेरपी डॉग झाला आहे.
मुज (आता डॉक्टर मुज) स्वतः अनेक आजारांनी ग्रस्त असूनदेखील विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांना नेहमी मदत करत असतो. नुकतेच त्याला प्रोटेस्ट कॅन्सरचे निदान झाले आहे. किमोथेरपी तसेच इतर अनेक उपचार त्याच्यावर सुरू आहेत.
मानसिक आजारांसंबंधी उपचारांमध्ये मुज मदत करत असतो. व्हर्जिनिया टेकमधील आपल्या सहा वर्षांत मुजने ७५०० पेक्षा जास्त सेशन्स आणि ५०० पेक्षा जास्त कार्यक्रमांमध्ये मदत केली आहे.
डॉग थेरपी काय असते?
गेल्या काही वर्षांमध्ये वातावरणातला तणाव वाढतोय. अनेकजण डिप्रेशनला बळी पडत आहेत. अशावेळी कुत्र्यांसोबत घालवलेला वेळ हा एखाद्या थेरपीपेक्षा कमी नसतो. डॉग थेरपीमध्ये लोकांना कुत्र्यांसोबत वेळ घालवायला दिला जातो. त्यांच्यासोबत खेळणे, बागडणे अशा गोष्टींचा त्यात समावेश असतो.
स्ट्रेस अँड हेल्थ जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार ही थेरपी दिवसेंदिवस लोकप्रिय होत आहे. याच संशोधनानुसार डॉगथेरपी आधी आणि नंतर यात मोठा फरक पडलेला दिसून येतो. डॉग थेरपीनंतर अनेक लोक आनंदी झालेले दिसतात तसेच त्यांच्या एनर्जीतसुद्धा वाढ झाल्याचे निदर्शनास येते.
हे सगळं पाहून भविष्यात आणखी कुत्र्यांना पदव्या मिळतील असं दिसतंय खरं.