बापरे !! चक्क जिभेवर केस आले ? वाचा कशाचा साईड इफेक्ट आहे हा !!

प्रतिजैविक म्हणजे अँटीबायोटीक्स माणसाचा जीव वाचवतात हे खरंच, पण काही वेळा ही औषधं अशी उलटतात की वाचलेला जीव पुन्हा संकटात सापडतो. इंग्लंडमधल्या एक  ५५ वर्षाच्या महिलेच्या गाडीला अपघात झाला. या अपघातात तिचे दोन्ही पाय अक्षरशः चेचले गेले. इस्पितळात दाखल केल्यावर तिच्यावर उपचार सुरु झाले.  पण याच दरम्यान तिच्या जखमांंमध्ये पॉलीमायक्रोबीअल म्हणजे एकाच वेळा अनेक जंतूंचा संसर्ग झाला. त्यामुळे तिला एकाच वेळी एकापेक्षा जास्त प्रतिजैविकं द्यावी लागली. थोड्याच दिवसात जंतू संसर्ग आटोक्यात आला.  पण... पण... तिच्या जिभेवर चक्क केस आले. 

स्रोत

पाह्यलंत, किती भयंकर आणि किळसवाणी स्थिती झाली ते! डॉक्टरांनी मेरोपेनेम आणि मिनोसायक्लीन ही प्रतिजैविकं सुरु केल्यावर सात दिवसातच तिला मळमळ सुरु झाली, तोंडाची चव बदलली, थोड्याच दिवसात जिभेवर चक्क केस उगवले.

डॉक्टरांच्या मते ही रेअर मेडीकल कंडीशन या स्वरुपाची म्हणजे अगदी विरळ स्वरुपाची अवस्था आहे. आपल्या जिभेवर असलेल्या खरखरीत ठिपक्यांतून, ज्याला शास्त्रीय भाषेत  filiform papillae म्हणतात,   हे केस वर येतात. filiform papillae मुळे जिभेवर खखरीतपणा राहतो आणि त्यांच्यामुळे  अन्न गिळताना जिभेला न चिकटता पुढे ढकलले जाते. तोंडाची कडू गोड, आंबट, तुरट खारट चव ओळखणारे ठिपके किंवा रुचिकलिका वेगळ्या आणि हे filiform papillae वेगळे असतात. 

हा अनुभव आल्यावर डॉक्टरांनी  नेमक्या कोणत्या प्रतिजैविकामुळे असे झाले असावे याचा अभ्यास करून मिनोसायक्लीन बंद  केले आणि दुसरे औषध सुरु केले. थोड्याच दिवसात हे केसाळ गुच्छ नाहीसे झाले. पण सावधान, केवळ प्रतिजविकांमुळे असे होत नाही, तर अतिजहाल माउथ फ्रेशनर वापरल्यामुळेसुद्धा असे होऊ शकते.

आमची डॉक्टरांना एकच विनंती आहे, मिनोसायक्लीनमुळे जर जिभेवर केस येत असतील तर डो़क्यावर मिनोसायक्लीन चोपडून टकलावर केस येतील का हे तरी शोधून काढा !! आमच्या ओळखीतले बरेच 'उजडे चमन ' आहेत, त्यांची लग्नं तरी लवकर होतील !!!

सबस्क्राईब करा

* indicates required