computer

शरीरातलं ऑक्सिजनचं प्रमाण मोजणं का आवश्यक आहे? त्यासाठी पल्स ऑक्सिमेट्री यंत्र घ्यावं का?

सध्या कोरोनाने धुमाकूळ घातलाय. कदाचित ही सुरुवात असेल, असे आणखी विषाणू आपल्याला यापुढे पाहता येतील. सध्या आपण आतापुरतं बोलू. सगळीकडून कोरोनाची लक्षणे, सोशल डिस्टन्सिंग, हात धुवा, घरी राहा वगैरेंचा मारा होतोय. यातच आता सरकारकडून घरातल्या सगळ्यांचं तापमान, दर मिनिटाला नाडीचे ठोके किती येतात, शरीरात ऑक्सिजनचं प्रमाण किती आहे याची रोजची नोंद ठेवा अशी सूचना आलीय. घरी ताप पाहण्यासाठी थर्मामीटर साधारण असतोच. नाडीचे ठोके मनगटावर बोट ठेवून मोजता येतील. पण शरीरातलं ऑक्सिजनचं प्रमाण कसं मोजायचं? त्यासाठी काहीजणांनी ऑक्सिमीटर्स ऑनलाईन दुकानांतून मागवले असतील. थोडं खर्चिक प्रकरण असलं तरी जान है तो जहान है ना?

पण हे ऑक्सिमीटर्स काय असतात? कसे वापरायचे? ते आपल्या शरीरातलं नक्की काय आणि कसे मोजतात हे प्रश्न तर असतीलच. त्यामुळे बोभाटाच्या वाचकांसाठी खास घेऊन आलो आहोत पल्स ऑक्सिमीटर्सबद्दलची पूर्ण माहिती..

तर, पल्स ऑक्सिमेट्री ही एक सोपी आणि वेदनारहित टेस्ट असते. ही टेस्ट तुमच्या शरिरातली ऑक्सिजन संतृप्तता(सॅच्युरेशन) किंवा तुमच्या रक्तातील ऑक्सिजन मोजण्याचे काम करत असते. या टेस्टने तुमच्या शरिरातील ऑक्सिजनशी संबंधित लहानसहान बदल लगेच कळत असतात. पल्स ऑक्सिमीटर हे एक चिमट्याच्या आकाराचे यंत्र आहे. हे यंत्र बोटांना किंवा कानाच्या पाळीला सहज लावता येऊ शकते. बऱ्याचवेळा हे इमर्जन्सी रूम्समध्ये वापरले जाते. त्याचप्रमाणे नाकाचे डॉक्टरसुद्धा हे यंत्र त्यांच्या दवाखान्यात ठेवतात. या पल्स ऑक्सिमेट्रीचा उपयोग तुमचे हृदय कशाप्रकारे ऑक्सिजनचे वहन करत आहे हे पाहण्यासाठी होत असतो. याचबरोबर याचा उपयोग एखाद्याच्या शरीरात रक्त ऑक्सिजनासंबंधी काही अडचणी असतील तर त्या सोडविण्यासाठी होत असतो.

पल्स ऑक्सिमेट्री कोणत्या आजारात सहसा केली जाते?

- क्रॉनिक ऑबस्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज(COPD)
- अस्थमा
- न्यूमोनिया
- फूफुसाचा कॅन्सर
- ऍनिमिया
- हर्ट अटॅक
- जन्मजात हृदयरोग

पल्स ऑक्सिमेट्रीचा नेमका कशा प्रकारे उपयोग होतो?

- फुफुसाची औषधे कशा प्रकारे काम करत आहेत हे तपासण्यासाठी.
- एखाद्याला श्वसनासाठी मदतीची गरज आहे का हे तपासण्यासाठी.
- रुग्णासाठी व्हेंटिलेटर किती उपयोगी आहे याचे मूल्यमापन करण्यासाठी.
- रुग्णासाठी पूरक ऑक्सिजन लावणे किती प्रभावी ठरू शकेल याचा अंदाज बांधण्यासाठी.
- रुग्णाचे शरीरातील बदल स्वीकारण्याची किती तयारी आहे हे तपासणीसाठी.

 

पल्स ऑक्सिमेट्री कशाप्रकारे काम करते?

आधी सांगितल्याप्रमाणे या छोट्या चिमट्याच्या आकाराच्या यंत्रात आपले बोट सरकवायचे असते. पायाचे किंवा हाताचे बोट चालू शकेल. काहीवेळा ये यंत्र कानाच्या पाळीला देखील लावले जाते. एक लहान प्रकाशकिरण या बोटांमधून जातो. या किरणामधून शरीरातले ऑक्सिजनचे प्रमाण मोजले जाते. यासर्व प्रक्रियेदरम्यान कुठलाच त्रास होत नाही. किंबहुना, आपली तपासणी होत आहे हेच मुळात जाणवत नाही. त्यामुळे मुंग्या, थरथर, टोचणे असं काहीही या टेस्टदरम्यान जाणवत नाही.

पल्स ऑक्सिमेट्री टेस्ट फक्त शरीरातली ऑक्सिजन सॅच्युरेशनची पातळी सांगत नाही, तर ती हार्ट रेट पण सांगते. पल्स ऑक्सिमेट्री ही फक्त रुग्णालयात केली जाते असेही नाही. डॉक्टर तुम्हाला घरीसुद्धा पल्स ऑक्सिमेट्री करण्याचा सल्ला देऊ शकतात. ही काय खूप कठीण टेस्ट आहे असेही नव्हे. तुम्हीही हे यंत्र घरी मागवून आपली पल्स ऑक्सिमेट्री घरच्याघरी करु शकता. पल्स ऑक्सिमेट्री ही पूर्णपणे जलद आणि विनात्रास होणारी टेस्ट आहे. तसेच ही टेस्ट केल्याने कुठलाही धोका उद्भवत नाही.

ही टेस्ट कशी करतात हे आपण पायरी-पायरीने समजून घेऊया.

१. या यंत्रात आपले बोट ठेवायचे. वरुन-खालून दोन्ही बाजूंनी कुशन असल्याने बोटाला चिमटा बसत नाही आणि कुठलाही त्रास होत नाही. तुमच्या बोटांना नेलपॉलिश लावले असेल तर ते या टेस्टदरम्यान काढावे लागते.

२. यंत्र चालू करावे. हे यंत्र बॅटरी ऑपरेटेड किंवा इलेक्ट्रिक कनेक्शन असलेले असू शकते.

३. मिनिटाभरात या यंत्रावर तुमचा पल्सरेट आणि ऑक्सिजन पातळीचे आकडे स्क्रीनवर दिसतील.

४. पुढच्या माणसाचे रिडिंग घेण्यापूर्वी यंत्र बंद करुन पुन्हा चालू करावे.

मात्र, हे यंत्र वापरताना आपले बोट सॅनिटाईझ करुन घ्या पण यंत्राच्या आत सॅनिटायझर लावू नका हा जाताजाता मोलाचा सल्ला!!

पल्स ऑक्सिमेट्री ही प्रभावी टेस्ट मानण्यात येते. या टेस्टच्या रिडिंगमध्ये फारतर २ टक्के चूक असण्याची शक्यता असते असं सांगण्यात येतं. म्हणजे समजा तुमच्या शरीरातलं खरोखरीचं ऑक्सिजनचं प्रमाण ८० असेल तर या यंत्रांवर आलेली तुमची ऑक्सिजन सॅच्युरेशन पातळी ही ७८ ते ८२च्या दरम्यान असेल.

रक्तात ऑक्सिजनचे प्रमाण नक्की किती असायला हवे?

सर्वसाधारणत: शरीरातल्या ८९% रक्तात ऑक्सिजन असायला हवा. असे असेल तर आपल्या शरीरातल्या पेशी आणि शरीर निरोगी आहे असे म्हणता येईल. एखाद्यावेळेस हे प्रमाण कमीजास्त झाले तर हरकत नाही, पण सतत किंवा वारंवार असे घडले तर नक्कीच ते धोकादायक आहे.

तज्ञांच्यामते निरोगी शरीरात ऑक्सिजनचे प्रमाण ९४ ते ९९ टक्के असायला हवे. तुमचे रिडिंग याहून कमी किंवा अधिक सतत येत असेल, तर डॉक्टरांना सल्ला घ्यायलाच हवा.

या टेस्टच्या आधारे पुढे कुठल्या टेस्ट किंवा कुठला उपचार रुग्णाला द्यावा हे डॉक्टर सांगू शकतात. तुम्ही ही ही टेस्ट घरीच करत असाल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने पुन्हा ही टेस्ट किती अंतराने आणि कितीवेळा घ्यावी हे तुम्ही ठरवू शकाल. निश्चित पातळीपेक्षा रिडींग जास्त किंवा कमी असेल तेव्हा काय करावे हेसुद्धा डॉक्टरांच्या सल्ल्यानेच ठरवावे.

कोरोनाज्वरात हे पल्स ऑक्सिमीटर चर्चेत आले आहे. त्याला कारणही तसेच आहे. इतर आजारांसोबतच कोरोनाची लक्षणे ओळखण्यासाठीसुद्धा या यंत्राचा उपयोग होत आहे. श्वसनात अडचण येणे हे कोरोनाचे प्रमुख लक्षण मानले जाते. या टेस्टमुळे याचा शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण मोजले जात असल्याने कोरोना इन्फेक्शनचा छडा लावायला मदत होते. सध्याच्या घडीला शक्य तितके घरीच राहाणे हितावह असल्याने पल्स ऑक्सीमीटर यंत्र वापरून घरच्या घरी सुरुवातीची लक्षणे समजण्यात मदत होऊ शकेल. पुढे कुठल्या प्रकारची ट्रीटमेंट आवश्यक आहे हे या टेस्टच्या माध्यमातून समजू शकेल. अनेक तज्ञांच्यामते लोकांना आपल्या शरीरात ऑक्सिजनची कमतरता आहे हे लगेच कळत नाही. कोरोना शरीरातील ऑक्सिजन हळूहळू कमी करतो आणि तोवर कोरोनाबाधित रूग्ण हळूहळू कमी ऑक्सिजनशी ऍडजस्ट झालेला असतो. त्यामुळे श्वसनाला होणारा त्रास हा लगेच कळून येत नाही. अशा परिस्थितीत पल्स ऑक्सिमेट्री यंत्र वेळीच सावध करुन पुढचे अप्रिय प्रसंग टाळू शकेल.

आता महत्त्वाचा मुद्दा- या यंत्राची किंमत काय?

ॲमेझॉनवरती या यंत्राची किंमत १,८०० ते ५,५०० रुपयांपर्यंत दिसते. आम्ही निश्चित असा एखादा ब्रँड सुचवत नाही आहोत. मात्र खरेदी करण्यापूर्वी तिथले लोकांचे अभिप्राय वाचून मगच कोणते यंत्र घ्यायचे ते ठरवा. बजेटचा विचार तर अर्थातच तुम्ही करालच.

आता थर्मामीटर, बीपी, रक्तातली साखर चेक करण्याच्या यंत्रासोबत पल्स ऑक्सिमीटरही घरी ठेवायला लागणार असं दिसतं. तुम्हांला काय वाटतं?

सबस्क्राईब करा

* indicates required