computer

जगात खाण्यापिण्याबद्दल आहेत हे १० विचित्र कायदे, काहीठिकाणी तर शिक्षाही केली जाते !!

रस्त्यावर थुंकू नये, रस्त्यावर कचरा टाकू नये, सिग्नल लाल झाला की गाडी थांबवावी, रेल्वेतून विनातिकीट प्रवास करू नये, वगैरे वगैरे. हे नियम व कायदे जगभरात एकसारखेच आहेत. पण काही देशांमध्ये असे काही कायदे आणि नियम आहेत जे इतर कुठेच पाहायला मिळत नाहीत. त्यापैकीच एक आहे ‘फूड लॉ’ !!

राव, खाद्यपदार्थांच्या बाबतीत जगभरात विचित्र नियम आणि समजुती आहेत. आता हेच बघा ना, कॅलिफोर्नियामध्ये बाथटबमध्ये बसून संत्री खाणं बेकायदेशीर आहे, तर एल साल्वाडोर भागात पिऊन गाडी चालवणाऱ्यावर सरळ गोळीबार करण्यात येतो. हे तर काहीच नाही, फ्लोरिडा भागात काट्याने चिकन खाल्ल्यास चक्क तुरुंगाची हवा खावी लागते.

असेही कायदे आहेत? विश्वास बसत नाही ना? आज आपण अशाच अतरंगी आणि विचित्र कायद्यांबद्दल बोलणार आहोत. चला तर पाहूयात!!

१. लुईझियाना भागात पिझ्झा मागवल्यानंतर जर ती व्यक्ती पिझ्झा घ्यायला जागेवर हजर नसेल तर तब्बल ५०० डॉलर्सचा दंड आकारला जातो.

२. एल साल्वाडोर भागात पिऊन गाडी चालवल्यास माणसावर जीव गमावण्याची वेळ येऊ शकते. प्यायलेला माणूस फायरिंग स्क्वाडच्या निशाण्यावर आल्यास त्याच्यावर गोळीबार केला जातो. हे पूर्णपणे कायदेशीर आहे भाऊ!!

३. बेल्जियमच्या भागात पर्यटकांवर ब्रुसेल्स स्प्राऊट्स फेकणे चक्क कायदेशीर आहे. या कायद्याचा फटका पर्यटकांना ब्रुसेल्स स्प्राऊट्सच्या रुपात झेलावा लागतो.

४. थायलंडमध्ये रस्त्यावर च्युईंग गम खाऊन थुंकल्यास तब्बल ६०० डॉलर्सचा दंड आहे.

५. बोलिव्हियाच्या ‘ला पाझ’ भागात गरोदर स्त्रिया फक्त १ ग्लास वाईन घेऊ शकतात. त्यापेक्षा जास्त बेकायदेशीर आहे.

६. कॅलिफोर्नियाच्या रिव्हरसाईड भागात सकाळी ११ ते १ वाजेच्या दरम्यान रस्त्यावरून जेवण घेऊन फिरण्यास मनाई आहे.

७. कॅलिफोर्निया भागात बाथटबमध्ये बसून संत्री खाणे बेकायदेशीर आहे.

मंडळी, हा एक फार जुना कायदा आहे. १९२० साली लोकांची अशी समजूत झाली होती, की संत्र्यामध्ये असलेलं सायट्रिक आम्ल आणि आंघोळीसाठी वापरण्यात येणाऱ्या तेलाचं मिश्रण होऊन विस्फोटक पदार्थ तयार होतो. हा कायदा अस्तित्वात असला तरी त्यातली अंधश्रद्धा आता निघून गेली आहे. 

८. गेन्सव्हिल, फ्लोरिडा भागात काट्याने चिकन खाणे बेकायदेशीर आहे. २००९ साली एका पर्यटकाला याबद्दल जेलची हवा खावी लागली होती राव.

९. न्यूजर्सी भागात सूप पिताना आवाज करणे हा गंभीर गुन्हा मानला जातो. फुर्रss करून पिणाऱ्याने जपून राहावं!!

१०. बॉस्टनमधल्या एका कायद्यानुसार चर्चमध्ये शेंगदाणे खाण्यावर सक्त मनाई आहे.

११. अमेरिकेच्या इंडियाना भागात जर तुम्ही लसूण खाऊन सिनेमाला गेलात तर तुम्हाला एन्ट्री नाकारली जाते. कारण अर्थातच ‘तोंडाचा वास’!!

मंडळी, आम्ही लवकरच असे आणखी अतरंगी कायदे घेऊन येणार आहोत तोवर हा लेख शेअर करायला विसरू नका !!

 

 

आणखी वाचा :

जगातल्या ११ यडचाप सायकली....सर्वात यडचाप कोणती ? सांगा बरं !!

भारतातल्या घटस्फोटांची ही ८ विचित्र कारणं माहित आहेत का ?

सबस्क्राईब करा

* indicates required