computer

सासूकडून प्रेरणा घेऊन सुनेने उभारला स्वतःचा बिझनेस तो ही व्हाट्सॲपच्या मदतीने !!

सोशल मीडियावर लक्ष्मी नांदते आणि जो तिची योग्य आराधना करतो त्यालाच ती पावते. ह्याची प्रचिती घेतलीये षण्मुग प्रिया ह्यांनी. चेन्नईमध्ये राहणाऱ्या षण्मुग प्रिया ह्यांनी सोशल मीडियाचा प्रभावी वापर करून आपला डिजिटल बिझनेसचं साम्राज्य उभारलंय. ह्यांच्या हाताखाली जवळजवळ २००० रिसेलर (विक्रेते) काम करतात. त्यापैकी कित्येकांना त्यांनी पाहिलेही नाहीये. त्यांच्यासाठी रिसेलर बनून काम करणाऱ्या कित्येक महिलांना षण्मुग प्रियाजींमुळे आज मानाने जगायला मिळत आहे.   

 

काय आहे नक्की त्यांचा बिझनेस?

ऑनलाइन खरेदी-विक्री हा सध्या चलतीत असलेला बिझनेस. होलसेलरकडून माल मागवायचा आणि व्हाट्सॲपद्वारे तो लोकांना विकायचा. प्रियाजींनी समस्त महिलावर्गाचा जिव्हाळाचा विषय असलेल्या साड्यांची विक्री सुरु केली. सुरूवातीला फक्त आपल्या मैत्रिणी आणि घरातल्या स्त्रियांना विकण्यासाठी त्या साड्या आणायच्या आणि घरी जाऊन विकायच्या. अगदी आईकडे माहेरी गेल्या तरी आठ -हा साड्या बरोबर न्यायच्या. चार बायका जमल्यावर बोलता बोलता चारआठ साड्या विकल्या गेल्या तर उत्तम नाही का ?  हळूहळू कानोकानी खबर जाऊन साड्यांचा खप वाढला.

अन्न आणि वस्त्र, खास करून कपडे, साड्या ह्या धंद्याला मरण नाही. प्रियाजींच्या साड्या मागवून काही स्त्रियांनी, स्वतःही साडी विकण्याचा बिझनेस केला. अर्थातच घरबसल्या स्त्रियांना पैसे कमावता येऊ लागल्याने त्यांना नवीन उभारी मिळाली. बघता बघता २००० रिसेलर बनवण्याचा विक्रम प्रियाने केला. आजच्या तारखेस त्यांची वार्षिक उलाढाल अडीच कोटीच्या घरात पोहोचली आहे. यासाठी त्यांनी व्हाट्सॲप चे १० ते ११ ग्रुप बनवले आणि आपले रिसेलर वाढवले. हे काम असतं गृप ऍडमिनचं.

 

ह्या व्यवसायाची सुरुवात कशी झाली..?

षण्मुग प्रियाची सासू तिचा नवरा अवघ्या काही महिन्याचा असताना घरोघरी जाऊन साड्या विकायची. कित्येक वर्षे त्यांनी हा बिझनेस केला. प्रियाच्या लग्नानंतरही त्या हा बिझनेस करत होत्या. पण त्यांच्या मृत्यूनंतर मात्र प्रियाला तिची नोकरी सोडावी लागली. आणि तिनेही सासूचं गुडविल घेऊन तिचाच व्यवसाय पुढे सुरू केला. आणि तोही अगदी स्मार्ट पद्धतीने..

आता घराचा एक मजला रिकामा करवून तिने स्वतः साड्या बनवण्यास सुरुवात केली आहे. सणासुदीला दिवसाला काही लाखांच्या साड्या व्हाट्पॲपच्या माध्यमातून विकल्या जातात. तर एरवीसुद्धा दिवसाकाठी ५० ते १०० साड्या विकल्या जातात. तिला आता गिऱ्हाईक शोधायची गरजच पडत नाहीये. सगळं काम तिचे रिसेलर करतात. तेच होलसेल भावात साड्या घेऊन जातात आणि विकतात. प्रिया म्हणते, "फक्त माझ्या मैत्रिणी आणि घरातल्या स्त्रियांना मी सिंगल पिसेस विकते. बाकी सगळं होलसेलमध्येच." किरकोळ विक्रीचं काम तिने थांबवले आहे. तरीही तिने तीन वर्षांत अडीच कोटी इतक्या किमतीच्या साड्या विकल्या आहेत.

 

आता तुम्हाला वाटेल ऑनलाइन विक्रीचं तर नुसतं लोण पसरलंय मग ह्या स्पर्धेत ही अजूनही टिकून कशी??

तर त्याचं असं आहे, की मागच्या चार वर्षात तिने नुसते रिसेलर नाही तर माणसे कमावली आहेत. माल नेल्यावर लगेच पैशांच्या मागे ती लागत नाही. त्यांना माल विकल्यावर पैसे देण्याची मुभा प्रियाने दिली आहे. त्यामुळे हे रिसेलर तिला सोडून अजून कुठूनही माल घेतच नाहीत. अशा तऱ्हेने जास्तीतजास्त साड्या विकून त्यांचा आणि प्रियाचा भरपूर फायदा होतो. बरं ह्या सगळ्यात प्रियाचा नवरा MNC मध्ये मोठ्या पदावर असला तरी तिला सपोर्ट करतोय म्हणजे त्याचेही नक्कीच खूप कौतुक आहेच. नाहीतर बायकोला मोठ्या मनाने साथ देणारे कमीच आढळतात. मात्र इथे एक यशस्वी स्त्रीच्या मागे एक पुरुष उभा आहे.

मंडळी, प्रिया एवढ्यावरच थांबलेली नाहीये तर तिने फेसबुकचे पेज काढून तिचे रिसेलर्स २००० वरून वर वाढवत नेले आहेत आणि देशा-परदेशातसुद्धा तिचे रिसेलर्स भरपूर साड्या मागवून विकत आहेत. काही कुरिअरवाल्यांबरोबर टायअप करून ती हे काम सहजतेने करत आहे.  घर संसार सांभाळून  इतरही कित्येक हजार स्त्रियांना जगण्याचा मार्ग शोधून देणाऱ्या ह्या षण्मुगा प्रियाला बोभाटाचा सलाम!!

 

 

आणखी वाचा :

तुमच्या सुंदर रेशमी साड्यांना पुन्हा उपयोगात आणण्याच्या ८ हटके आयडिया..

तुमच्या सुंदर साड्यांना पुन्हा उपयोगात आणायच्या २५ सॉलीड आयडियाज..

बिहारमध्ये दारुबंदीमुळं वाढलाय महागड्या साड्यांचा खप!! किती? विश्वास बसणार नाही, इतका!!

तुमचा वॉर्डरोब सजवा जॅकेट ब्लाऊजसोबत.. पाहा जॅकेट ब्लाऊजचे एक से बढकर एक १३ प्रकार..

रेशमाचे धागे ते साडी -पाहा प्रवास

या १० प्रकारच्या साड्या तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हव्यात

पाच सेकंदात नेसून होते ही साडी....कशी वाटली ही आयडिया?

सबस्क्राईब करा

* indicates required