computer

कोरोना संकटकाळातली नर्स, पायलट, मॉडेल, लेखिका ते शिक्षिका.. हे ८ राजे-राजकन्या सामान्य आयुष्य कसं जगतायत?

पूर्वी राजेशाही होती. आज राजेशाहीला जगात स्थान नाही. पण काही नामधारी राजे नक्कीच आहेत. सर्वसामान्यांना परिचित असलेलं राजघराणं म्हणजे इंग्लंडचं राजघराणं. इंग्लंडच्या राणीकडे काही विशेषाधिकार नक्कीच आहेत, पण मुळातच इंग्लंडमध्ये constitutional monarchy म्हणजे संविधानिक राजेशाही आहे. राणीच्या हातातील मोजके अधिकार सोडले तर सर्व निर्णय संसदेकडे असतात. इंग्लंड खेरीज स्वीडन, मोनॅको, डेन्मार्क या देशांतील राजघराणीही याच पद्धत काम करतात. सुरुवातीलाच सांगितल्याप्रमाणे हे राजे मंडळी नामधारी आहेत.

असं असलं तरी ह्या राजेलोकांच्या रोजच्या आयुष्यातला शाही थाट काही कमी झालेला नाही. प्रचंड पैसा, दिमतीला नोकर, राजवाडा, मानसन्मान इत्यादी हे राजेलोक उपभोगत असतात. आज आम्ही हे सगळं सांगतोय कारण राजघराण्यातील काही मंडळींनी आपलं हे थाटातलं आयुष्य नाकारून सर्वसामान्य लोकांप्रमाणे जगणं पसंद केलं आहे. सर्व सामान्य लोक करतात तशी कामे हे लोक करतात.  आजच्या लेखात आपण शाही कुटुंबातील अशाच निवडक व्यक्तींबद्दल जाणून घेणार आहोत !!

१. मोनॅको देशाची राजकन्या चार्लीन

चार्लीन ही मुळची दक्षिण आफ्रिकेतील. तिने मोनॅकोचा राजपुत्र अल्बर्टशी विवाह केला. ती प्रशिक्षित जलतरणपटू आहे. तिच्या करियरला १९९६ सालच्या दक्षिण आफ्रिकन चॅम्पियनशिप पासून सुरुवात झाली. २००० सालच्या सिडनी ऑलेम्पिकमध्ये तिने दक्षिण आफ्रिकेचं प्रतिनिधित्व केलं. पुढची सात वर्षे ती वेगवेगळ्या स्पर्धांमधून झळकत होती. तिच्या खांद्याला झालेल्या दुखापतीमुळे तिला आपलं करियर थांबवावं लागलं. आता ती अपंगांसाठी असलेल्या पॅरालिम्पिक स्पर्धकांना प्रशिक्षण देते. शिवाय कर्णबधीर मुलांसाठी काम करते.

२. इंग्लंडचा राजपुत्र विल्यम

इंग्लंडच्या जगप्रसिद्ध राजघराण्यातला हा एक राजपुत्र. विल्यमने सुरुवातीलाच आपल्या करीयरची निवड केली होती. त्याला सैन्यात जायचं होतं, पण त्याच्या निर्णयाला विरोध झाला. कारण एका राजघराण्यातील व्यक्तीने सैन्यात जाणं हे जोखमीचे काम आहे असं सगळ्याचं  मत पडलं. त्यामुळे विल्यमला आपलं करियर बदलावं लागलं. त्याने मग वायुदलात जायचा निर्णय घेतला. या कामासाठी त्याला कोणी अडवलं नाही. २०१४ साली तो अधिकृतपणे पूर्णवेळ हवाई वैद्यकीय सेवेत पायलट (ambulance pilot) म्हणून काम करू लागला.

३. स्वीडनची राजकन्या सोफिया

स्वीडनची राजकन्या सोफिया हिने अकाऊन्टस् आणि बिझनेस डेव्हलपमेंटचा अभ्यास केला आहे. याखेरीज तिने योग प्रशिक्षक म्हणूनही शिक्षण घेतलं आहे. यावर्षी कोरोना संकटकाळात तिने स्वतःहून पुढाकार घेऊन कोरोना रुग्णांसाठी काम करण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी तिने तीन दिवसांचं प्रशिक्षण पूर्ण केलं.  Sophiahemmet Hospital मध्ये तिने डॉक्टर आणि नर्सेसना कामात मदत केली.

४. हॅनोव्हरची राजकन्या शॅर्लट

हॅनोव्हर हे जर्मनीतील छोटं शहर आहे. आधी या शहरावर राजेशाही होती. सध्या राजेशाही नाही पण राजपरिवार शिल्लक आहे. याच कुटुंबातील एक राजकन्या म्हणजे शॅर्लोट. ती लेखिका आहे. तिने स्वतःचं पुस्तक प्रकाशित केलंय. ती एका मासिकासाठी संपादक म्हणूनही काम करत होती. २००९ साली तिने आपलं कार्यक्षेत्र बदललं. फॅशन आणि पर्यावरणाशी निगडीत उपक्रमांमध्ये तिने भाग घेतला. Ever Manifesto नावाचं मासिक तिने सुरु केलं. या मासिकाच्या माध्यमातून ती फॅशन क्षेत्राचा पर्यावरणावर कसा दुष्परिणाम झाला हे वारंवार सांगत असते.

५. डेन्मार्कची राजकन्या मेरी

डेन्मार्कची राजकन्या मेरी हिला तिच्या साधेपणाचा वारसा तिच्या वडिलांकडून मिळाला आहे. तिच्या वडिलांनी राजघराण्यातून येऊनही शिक्षक म्हणून नोकरी केली होती. मेरीनेही हाच वारसा पुढे सुरु ठेवला. तिने आधी अकाऊन्टंट म्हणून काम केलं. पुढे तिने हे काम सोडून पॅरसी येथील एका शाळेत इंग्रजी शिकवण्याचं काम पत्करलं. ती सध्या व्यावसायिक सल्लागार म्हणून काम करते.

६. डेन्मार्कचा राजपुत्र निकोलाय

राजपुत्र निकोलाई हा डॅनिश राजघराण्यातला आहे. राजेशाही आयुष्यापेक्षा त्याला फॅशन  क्षेत्रात अधिक रस आहे. तो २०१८ पासून फॅशन मॉडेल म्हणून काम करतोय. त्याला  fashion’s golden boy म्हणून ओळखलं जातं.

७. नेदरलँड्सचा राजा विलेम-अलेक्झांडर

नेदरलँड्सचा राजा राजा विलेम-अलेक्झांडर हा त्याच्या तरुण वयात ‘रॉयल नेदरलँड्स नेव्ही’त होता. पुढे त्याला लेफ्टनंटची पदवी मिळाली.  विलेम-अलेक्झांडरला पायलट बनण्याची इच्छा होती. तो म्हणाला होता की, ‘मी जर राजा नसतो तर पायलट नक्कीच झालो असतो.’ तो अधूनमधून पायलटचं काम करत असतो. तो म्हणतो की ‘फारच कमी वेळा मला लोकांनी ओळखलं आहे.’

८. बेल्जियमचा राजपुत्र जोआकिम

जोआकिमने स्वेच्छेने सैन्याचं प्रशिक्षण घेतलं. शिक्षण पूर्ण झाल्यावर तो अधिकृतपणे बेल्जियमच्या नौदलात ऑफिसर म्हणून काम करू लागला. राजेशाही जीवनापेक्षा त्याने सैन्यात जाऊन देशसेवा करणं जास्त  पसंत केलं आहे.

 

वाचकहो, हे सर्व राजकन्या, राजपुत्र किंवा राजे मंडळींनी आपल्या थाटाचं आयुष्य नाकारून काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला आहे. आपणही या देशाचे सामान्य नागरिक आहोत हे या लोकांनी मनोमन मान्य केलेलं दिसत आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं, हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा !!

सबस्क्राईब करा

* indicates required