घरी फोटो काढण्यासाठी बनवा एक धम्माल फोटोस्पॉट...तो कसा सजवायचा याच्या पाहा या ८ भन्नाट आयडियाज !!

लग्न पाहावं करुन आणि घर पाहावं बांधून. या दोन्ही गोष्टी तशा अवघडच आणि आयुष्यात बरेचदा त्या एकेकदाच होतात. आता काहीजण इतके भाग्यशाली असतात की त्यांची होतात दोन-तीन घरं घेऊन. पण काही असो, एकदा का त्या घरात राहायचं म्हटलं, की ते सगळ्यांपेक्षा वेगळं आणि छान कसं दिसेल हाच विचार आपल्या मनी असतो. आपल्या घराची भिंत सुंदर दिसावी हे आणखी एका गोष्टीसाठी आजकाल फार गरजेचे आहे. का? अहो घरात इतके मोबाईल कॅमेरे असताना छान छान फोटो काढण्यासाठी एखादा फोटोस्पॉट नको का??
यासाठीच आज बोभाटा घेऊन आलं आहे भिंत सजवण्याच्या साध्या-सोप्या, मस्त आणि टिपटॉप आयडिया !!

सुरुवात करुयात अगदी साध्या बेसिक पद्धतीनं, म्हणजे भिंतींच्या रंगापासून. भिंती सजवायला रंग तर वापरले जातातच. त्यात एका भिंतीला वेगळा रंग देऊन हायलाईट करणं हा एक साधा आणि सगळ्यांना माहित असलेला प्रकार आहे. यात इतर भिंतींचा मुख्य रंग आणि हायलायटेड वॉलचा रंग यामुळं घराला एकदम वेगळा लूक येतो आणि फोटो भारी येतात हे  वेगळं सांगायला नकोच.

स्रोत

भिंत हायलाईट सोबतच त्यामुळं टेक्स्चर वॉल करणं हा ही एक पर्याय आहे.  यातही बरेच वेगवेगळ्या प्रकारचे टेक्स्चर्स उपलब्ध आहेत.

स्रोत

भिंतीच्या रंगावर चांगलं उठून दिसणारं एखादं पेंटिंग अत्यंत सुंदर दिसेल. त्यातही सगळ्यात सोपं पेंटिंग म्हणजे पेंटर्स स्टेन्सिल वापरुन काढतात ते. त्यातही मग काही हटके पर्याय हवे असतील तर वारली, मधुबनी किंवा गोंड पद्धतीची चित्रं काढता येतील. या पद्धतींच्या चित्रांचा भर मुख्यत: रेखाटनावर असतो. पुण्यामुंबईत तर शक्य नाही, पण तुमच्या घराला मजले असतील आणि घराचा जिना आतूनच जात असेल, तर दोन्ही मजल्यांवरुन दिसेल असं एकच एक मोठं गोंड शैलीचं चित्र मस्तच दिसेल. इतर चित्रांसाठी तुम्हीच घरच्याघरी मित्रांना जमवून चित्र काढू शकता. मित्रमंडळींसोबत काढलेली चित्रं हा आठवणींचा अमूल्य खजिना असतो बरं..  मात्र खूप मोठं चित्र काढायचं असेल, तर त्यासाठी मात्र कुशल कारागिरच हवा.

स्रोत

स्रोत

युरोपात बरेच ठिकाणी सिरॅमिकच्या प्लेटस वापरुन गॅलरी सजवायची फॅशन आहे. अशा वेगवेगळ्या रंगांच्या किंवा एकाच धाटणीच्या प्लेट्स वापरुन तुम्ही एखादी भिंत सजवू शकाल.
 

स्रोत

सिरॅमिकच्या प्लेट्स जास्त महाग वाटत असतील तर आजकाल केळीच्या वाळवलेल्या सापटापासून केलेल्या  प्लेट्सही मिळतात. त्या वापरुनही भिंत छान सजवता येईल. इथंही वेगवेगळ्या थीम्समध्ये प्लेटा रंगवून ठेवता येतील आणि आपण कसे कुणी येणार म्हटले की पडदे वगैरे बदलतो, तशा या प्लेटाही बदलून बदलून वापरता येतील.

घर म्हटलं की सजावटीसाठी पेंटिंग हे आलंच. पण ओरिजिनल पेंटिंग घ्यायची तर ती कित्येक हजारोंच्या घरात जातात आणि सगळ्यांना परवडतातच असं नाही. यासाठी दोन पर्याय आहेत. एक म्हणजे काही वस्तुसंग्रहालयं आणि गॅलरीज वेगवेगळ्या साईजमध्ये मूळ चित्रांच्या प्रिंटस काढून विकतात. दुसरं म्हणजे आजकाल छान कॉटनच्या मधुबनी किंवा कलमकारी यांसारख्या छान प्रिंट असलेल्या ओढण्या मिळतात. अशा ओढण्या फ्रेम करुन लावल्यात तर स्वस्तही पडेल आणि तुमच्या निवडीची सगळेजण वाखाणणी करतील.

स्रोत

एखाद्या भिंतीवर घरतल्या लोकांचे फोटोही तुम्ही  लावू शकता. त्यातही स्टेन्सिल वापरुन झाड काढणं आणि त्याच्या फांद्यांना फोटो लटकावणं हे कॉम्बिनेशन खूप लोकांचं आवडतं आहे.

स्रोत

फक्त पार्टी, एखादा समारंभ किंवा गणपतीसारख्या सणासाठी भिंत तात्पुरती सजवायची असेल, तर कागदी फुलांना पर्याय नाही. इंटरनेटवर पाहा, फुलं कशी बनवायची यावर  ढीगानं ट्यूटोरियल आणि व्हिडिओज सापडतील. वेगवेगळ्या रंगांची आणि आकारांची फुलं घराचा लूकच बदलून टाकतील पाहा.

स्रोत

स्रोत

हे झालं घरापुरतं. पण लोक घराच्या बाहेरचा भागही मोठ्या असोशीने सजवतात. तुमच्या घरी बाग असेल तर तुम्ही असं काहीतरी करु शकाल पाहा...

या झाल्या आपल्या घराच्या भिंती सजवण्याच्या काही आयडियाज. तुम्हांला यातली कोणती सर्वात जास्त आवडली ते सांगा. तुमच्याकडे काही याहून वेगळ्या आयओडिया असतील त्या आमच्यासोबत नक्की शेअर करा..

सबस्क्राईब करा

* indicates required