computer

मुलांची नावे ठेवण्यासाठी अजब आणि विचित्र असे कायदे असलेले ८ देश !!

मूल जन्माला येतं आणि थोड्या दिवसानंतर त्याचं नामकरण केलं जातं. आपल्या देशात मुलांची नावे ठेवण्यासाठी कुठले नियम वगैरे नाहीत. आपण अगदी कुठलीही आणि काहीही नावे आपल्या मुलांना ठेवू शकतो. परंतु सगळ्याच देशांत ही मुभा नाही. जगभरात आठ देश असे आहेत जिथे मुलांची नावे ठेवण्यासाठी अजब आणि विचित्र असे कायदे आहेत. चला तर मग जाणून घेऊया त्यांच्याबद्दल!!

जर्मनी

जर्मनीत नावे ठेवताना त्या नावावरूनच मुलाचे लिंग कळेल असे नाव ठेवावे लागते! म्हणजे आपल्याकडची किरण, शीतल वगैरे नांवे बाद. उत्तर भारतात तर मुलांचीही नावे कमल-विमल असतात. जर्मनीत नावावरुन लिंग समजण्यासोबतच त्या नावावरून कुठलाही नकारात्मक अर्थ निघू नये असा नियम आहे. म्हणजे त्या नावाच्या व्यक्तीच्या मनात त्याबद्दल वाईट भावना निर्माण होऊ नये! तसेच तुम्ही तुमचे आडनाव हे नाव म्हणून वापरू शकत नाही.

जर्मनीत वस्तूचे किंवा एखाद्या उत्पादनाचे नाव मुलांना देता येत नाही! तुम्ही तुमच्या मुलांना ठेवलेली नावे कायम राहतील की नाही याचा निर्णय ते मूल ज्या भागात जन्माला आले आहे तिथल्या रजिस्टर ऑफिसमधले अधिकारी घेतात. जर अधिकाऱ्यांनी तुम्ही ठेवलेल्या नावाला विरोध केला तर तुम्हाला अपील करता येते आणि तिथे तुम्ही हरलात तर तुम्हाला नवीन नाव शोधावे लागते. आणि प्रत्येकवेळी नावासाठी अर्ज करताना तुम्हाला फी आकारली जाते. अधिकारी नावाबद्दल निर्णय घेताना "the international manual of the first names" या पुस्तकाचा संदर्भ घेतात. त्याचबरोबर जर नाव जर्मन भाषेतील नसेल तर परदेशी तज्ञांची मदत घेतली जाते. या सगळ्या कडक निर्बंधांमुळे आईवडील आपल्या मुलांची नावे पारंपरिक शब्दांमधूनच ठेवतात. उदा मॅक्समिलन, सोफी, अलेक्झांडर इ.

नाकारलेली नावे - matti या नावाला अधिकाऱ्यांनी नकार दिला कारण त्या नावातून लिंगनिर्देश होत नव्हता!

स्वीकारलेली नावे - legolas आणि nemo ही नावे स्वीकारली गेली!

स्वीडन

समाजातील खालच्या वर्गातील लोकांनादेखील उच्चकुलीन नावे ठेवता यावीत म्हणून स्वीडनमध्ये १९८२ मध्ये नामकरण कायदा अस्तित्वात आला. त्यानंतर त्यात थोडेफार बदल झाले. त्यात असं लिहिलंय की जर मुलांचं पहिलं नाव उच्चारण्यामुळे जर काही गुन्हा घडत असेल किंवा उच्चारायला ते कठीण वाटत असेल तर अशी नावे स्वीकारली जाणार नाहीत! मुलांची पहिली नावे ही संमतीसाठी टॅक्स एजन्सीकडे पाठवण्यात यावीत असाही नियम आहे. एजन्सी एका मुलाला अनेक नावे ठेवण्याची संमती देऊ शकते. पण जर का त्या मुलाचे नाव पुन्हा बदलायचे असेल तर एजन्सीने आधी संमत केलेल्या नावांपैकीच एक नाव त्याला निवडावे लागते!

उदाहरणार्थ, तुमचं नाव जॉन असेल आणि तुम्हाला ते बदलून जॅक असं करायचं असेल, तर तुमचं नवीन नाव जॅकजॉन असेल. आणि हो, स्विडीश रजिस्ट्रेशन ऑफिसमधूनच नावामध्ये बदल करता येतात!

नाकारली गेलेली नावे-

Brfxxccxxmnpcccclllmmnprxvclmnckssqlbb11116 या नावाचा उच्चार म्हणे अल्बिन आहे!! कसा हे नांव सुचवणाऱ्यालाच माहित. तर हे नाव एका मुलाच्या पालकांनी दाखल केलं, परंतु या नावाला स्वीकृती मिळाली नाही! नंतर त्यांनी त्यात A हे अक्षर घातलं तरीसुद्धा त्या नवीन नावाला स्वीकृती मिळाली नाही!

त्याचबरोबर मेटॅलिका, सुपरमॅन, वेरांडा, इकिया, एल्विस ही नावेसुद्धा स्वीडनच्या ऑफिसने नाकारली आहेत!

स्वीकृती मिळालेली नावे - गूगल हे एका मुलाचं मधलं नाव म्हणून स्वीकृत केलं गेलं! लेगो म्हणजे एका खेळाचं नावही माणसाचं नाव म्हणून तिथं मान्य केलं गेलं आहे.

जपान

जपानमध्ये प्रत्येक मुलासाठी एक नाव आणि एक आडनाव स्वीकारलं जातं, अपवाद फक्त तिथलं राजघराणं म्हणजे इम्पिरियल फॅमिलीचा! कारण इम्पिरियल फॅमिलीत फक्त पहिलं नाव स्वीकारलं जातं! काही अपवाद वगळता जपानमधील नावे अणि आडनावे लगेच कळून येतात.

जपानी अक्षरांना कांजी म्हटलं जातं. जपानी लिपीत ५०,००० हून अधिक कांजी आहेत. साधारण दोन हजारेक कांजी नावांसाठी आणि नावांमध्ये वापरणं प्रचलित आहे. फक्त या अधिकृत कांजी वापरूनच बाळाचं नाव लिहिता आलं पाहिजे असा तिथला नियम आहे. बाळाचं सहजपणे लिहिता आणि वाचता यावं हा यामगचा उद्देश आहे. जपानमध्ये काही अयोग्य वाटतील अशी नावं ठेवण्यावरही निर्बंध आहेत.

नाकारलेली नावे - अकुमा म्हणजेच राक्षस अशा अर्थाचं नाव नाकारलं गेलं आहे.

डेन्मार्क

डेन्मार्कमध्ये नामकरण कायदा इतका कडक आहे की सरकारने एक मुलामुलींची नावे असलेली ७००० शब्दांची एक यादीच तयार केली आहे. शक्यतो तुम्हाला त्या यादीतलंच नाव स्वीकारावं लागतं. त्या यादीबाहेरचं नाव पाहिजे असेल तर मग तुम्हाला स्थानिक चर्चकडून विशेष परवानगी घ्यावी लागते! आणि त्यानंतर ते नाव पडताळणीसाठी सरकारी अधिकाऱ्याकडे पाठवलं जातं! क्रिएटिव्ह स्पेलिंग असलेली सामान्य नावे शक्यतो वगळली जातात! मुलांचं आणि मुलींचं त्यांच्या नावांमधून लिंगनिर्देशन व्हायला हवं असं तिथला कायदा स्पष्टपणे म्हणतो. तसेच तुम्ही तुमचं आडनाव हे नाव म्हणून वापरू शकत नाही! दरवर्षी साधारपणे ११०० नावं पडताळणीसाठी पाठवली जातात आणि त्यातली १५ ते २० टक्के वगळली जातात. काही दुर्मिळ दानिश नावे संरक्षित करण्यासाठी तिथे विशेष कायदा आहे!

वगळण्यात आलेली नावे - अनुस, प्लुटो आणि माँकी

स्वीकारली गेलेली नावे - बेंजी, जिमीनिको, मोल्ली आणि फी!

आईसलँड

१९९१ मध्ये आईसलँडची नामकरण समिती तयार करण्यात आली. या समितीनेच मुलांना दिलेली नवीन नावे स्वीकारायची की नाही हे ठरवायचे असं मीटिंगमध्ये ठरवण्यात आलं. मुलाच्या पालकांना आईसलँडच्या नॅशनल रजिस्टरमध्ये नसलेले नाव ठेवायचे असेल तर त्यांना त्यासाठी वेगळी फी देऊन परवानगी घ्यावी लागेल असही ठरवण्यात आलं! एखादं नाव अधिकृतपणे स्वीकृत होण्यासाठी त्या नावाला काही परीक्षा द्याव्या लागत!

उदाहरणार्थ, त्या नावाच्या शब्दात फक्त आईसलँडच्या बाराखडीमधलीच अक्षरं असावीत! तसेच तो शब्द व्याकरणदृष्ट्या परिपूर्ण असावा! त्याचबरोबर तो शब्द आईसलँडच्या परंपरेला साजेसा आहे का? त्या शब्दाने मुलाच्या व्यक्तीमत्त्वावर काही परिणाम तर होणार नाही ना? हे देखील पाहिले जाते! तसेच तो शब्द लिंगनिर्देशक असावा आणि एकाला तीनपेक्षा जास्त नावे ठेवता येणार नाहीत असे नियम होते!

आईसलँडमधील आडनावे हीसुद्धा एक विशिष्ट परंपरा पाळतात! इथे आडनाव म्हणजे कोणत्या घराण्याचे नाव लावण्याऐवजी सरळ वडिलांचे किंवा आईचे नाव लावले जाते! उदाहरणार्थ वडिलांचे नाव एरिक असेल तर मुलाचे आडनाव एरिकसन (Erik's son) होईल! आणि एरिकच्या मुलीचे आडनाव Ericsdóttir (or Erik's daughter) असे होईल! आईसलँडच्या कल्चरनुसार c हे अक्षर आईसलँडच्या बाराखडीत नाहीच! आता काही आडनावे आहेत ज्यांची खरोखर परंपरेनुसार नावे आहेत, परंतु ही सगळी आडनावे बाहेरून आईसलँडमध्ये आलेल्या फॅमिलीची आहेत!

स्वीकृत झालेली नावे - बांबी

अस्विकृत झालेली नावे - हॅरिएट आणि. डंकन. कारण Duncan हे नाव लिहायला त्यांच्या लिपीत C हे अक्षरच नाही!

न्यूझीलंड

1995 च्या न्यूझीलंडच्या जन्म, मृत्यू आणि विवाह नोंदणी कायद्यानुसार ज्यामुळे समाजात गुन्हा होण्याची शक्यता निर्माण होईल असं कुठलही नाव मुलांना ठेवू दिलं जात नाही! जे नाव विनाकारण खूप लांब आहे असंही नाव तिथे ठेवू दिलं जात नाही!

अस्वीकृत नावे - स्टॅलिन, या डेट्रॉईट, फिश अँड चिप्स, ट्विस्ती पोई, किनान गोट लकी, सेक्स फ्रूट, सटान, आणि अडॉल्फ हिटलर!

स्वीकृत नावे - बोन्सन अँड हेजेस (जुळ्यांसाठी) मिडनाईट चार्डोनी, नंबर 16 बस शेल्टर, व्हायोलन्स

चीन

चीनमध्ये तर नॅशनल आयडेंटीटी कार्डवरील नावे कॉम्प्युटर स्कॅनरद्वारे वाचली जातात. तिथे बहुतांश पालकांना अशीच नावे ठेवावी लागतात जी वाचताना स्कॅनरला काही अडचणी येणार नाहीत. पालकांनी आपल्या मुलांची नावे सोपी आणि चीनच्या परंपरेला अनुसरून ठेवावीत असं सरकारने सुचवलं आहे! चीनमध्ये पारंपारिक आणि सुलभ अशा दोन लिप्या मानल्या जातात. नाव ठेवताना ते सुलभ लिपीत लिहिता यावे असा नियम आहे.

तसेच बाळाचं नाव ठेवताना नावांमधली अक्षरे ही चीनी लिपीच्या बाहेरची नसावीत आणि नावात अंक किंवा इतर स्पेशल कॅरॅक्टर्स, उदा. #, @, $, %, &, ^, *, इत्यादी असू नयेत असा तिथे नियम आहे! आयडेंटीफिकेशन कार्ड्सचा उपयोग व्हावा म्हणून सन २००० मध्ये तर लोकांना त्यांची नावे बदलून घ्यायला सांगितलं होत!

अस्वीकृत नावे - "@": वांग यातील @ म्हणजेच ऍट हे अस्वीकृत केलं गेलं. परंतु त्या मुलाच्या पालकांचं असं म्हणणं होतं की हेच नाव आमच्यासाठी खऱ्या अर्थाने योग्य आहे. चायनिज मध्ये @ चा उच्चार "ai-ta" असा होतो जो तिथल्या "त्यांच्यावर प्रेम करा" या अर्थाच्या वाक्यप्रचारशी मिळताजुळता आहे!

नॉर्वे

नॉर्वेत जे नाव आडनाव म्हणून प्रचलित आहे ते पाहिलं नाव म्हणून वापरता येतं नाही. अपवाद जर तुम्ही नॉर्वेच्या बाहेरून आला असाल तरच! आणि प्रत्येक दहा वर्षांत तुम्हाला तुमचे नाव फक्त एकदाच बदलता येतं! अडथळा ठरतील अशी नावे ठेवण्याची सोय तिथल्या पालकांना नाही.

नॉर्वेत खरी मज्जा तर आडनाव बदलताना येते! जर तुमचंच आडनाव असलेली दोनशेपेक्षा जास्त लोक तिथे असतील आणि तुम्हाला तुमचं आडनाव बदलायचं आहे तर बिनधास्तपणे बदलू शकता. पण तुमच्याच आडनावाची दोनशेपेक्षा कमी लोक नॉर्वेत असतील तर आडनाव बदलताना तुम्हाला परवानगी घ्यावी लागते!

अस्वीकृत नावे - गेशर हे नावे अस्वीकृत करण्यात आलं कारण त्या मुलाच्या आईने ४२० डॉलर्सचा दंड भरण्यास नकार दिला आणि ती जेलमध्ये गेली!

बोनस - अमेरिका

कायद्याचे प्राध्यापक कार्लटन लारसन यांच्या म्हणण्याप्रमाणे Massachusetts मध्ये तुमचं प्रत्येक नाव (पाहिलं, मधलं आणि आडनाव) हे चाळीस अक्षरांपेक्षा कमी लांबीचं पाहिजे जेणेकरून कॉम्प्युटरला इनपुट देणे सोपे होईल! त्याचबरोबर तिथली बरीच राज्ये कीबोर्डवरील सव्वीस अक्षरे वापरूनच मुलांना नावे द्यावीत असे सुचवतात! म्हणजेच कॅलिफोर्नियात तुम्ही मुलाला jose, उच्चारी होजे, म्हणून हाक मारू शकता, परंतु टेक्निकली त्याचं नाव लिहिताना José म्हणजेच जे त्याचा उच्चार होज आहे की होजे हे स्पष्टपणे ध्वनीत करते, ते असू शकत नाही!

Tennessee मध्ये लग्न झालेल्या पालकांच्या मुलांना एक तर आईकडचे आडनाव किंवा वडिलांकडचे अधिक आईचे आडनाव लावता येते! परंतु काही केले तरी त्याला वडिलांच्या आडनावाचा उल्लेख करावा लागतो!

तर वाचकहो, भारतासारख्या संस्कृती, आचार, विचार, पेहराव अशा सर्व बाबतीत विविधता असणाऱ्या देशात असे काही निर्बंध नाहीत ही सुखाची गोष्ट आहे. पण जिथं असे हे नियम आहेत ते का आहेत ते जाणून घ्यायला काहीच हरकत नाही, हो ना?

 

लेखक : सौरभ पारगुंडे

सबस्क्राईब करा

* indicates required