उंदीर प्यायले तब्बल १००० लिटर दारू ?....कुठे घडलंय हे ?

मंडळी, आजकाल बातम्या अशा येत आहेत की त्या खोट्या वाटाव्या. आता हेच बघा ना, बरेलीच्या मलखाना येथील पोलीस स्टेशन मध्ये १००० लिटर दारू चक्क उंदरांनी रिचवली म्हणे.

काय आहे हे प्रकरण ? चला जाणून घेऊ.

त्याचं झालं असं, पोलिसांनी दारूने भरलेले प्लास्टिक कॅन्स जप्त केले होते. हे कॅन्स पोलीस स्टेशन मध्ये ठेवण्यात आले होते. नुकतंच असं समजलं की हे कॅन्स पोलीस स्टेशन मधून गायब झाले आहेत. यातील काही कॅन्स रिकामे सापडले तर काही सापडलेच नाहीत. जे सापडले त्यांना छिद्र पाडण्यात आलं होतं. यावरून पोलिसांनी असा शोध लावला की हे काम चक्क उंदरांनी केलंय.

मंडळी, मलखान पोलिसांनी आता शोध मोहीम हाती घेतली आहे. हे काम खरंच उंदरांचं आहे की नाही याचा शोध घेतला जाईल. हे जर सिद्ध झालं तर भविष्यात हे दारुडे उंदीर पोलीस स्टेशन मध्ये घुसू नयेत म्हणून तशी काळजी घेतली जाईल.

पोलिसांनी जप्त केलेली दारू ही जवळजवळ १० वर्ष जुनी होती. छाप्यांमध्ये ही दारू जप्त केली होती. नियमानुसार जप्त केलेली दारू नष्ट करण्यात येते, पण ही दारू तशीच पडून राहिली. एका वरिष्ठांनी म्हटलंय की त्यांनी शिफारस करूनही दारू नष्ट करण्यात आली नाही.

मंडळी, तुम्हाला जर ही बातमी ‘मस्करी’ वाटत असेल, तर मागच्या वर्षी घडलेलं बिहारचं प्रकरण घ्या. त्या प्रकरणात तर उंदरांनी तब्बल ९ लाख लिटर दारू रिचवल्याचा प्रकार घडला होता. यातलं सत्य काय ते अजून उघड झालेलं नाही.

तर मंडळी, तुम्हाला काय वाटतं उंदीर खरंच दारू प्यायले असतील ? सांगा बरं !!

 

सबस्क्राईब करा

* indicates required