computer

जखमी वडिलांना सायकलवर बसवून १२०० किलोमीटर नेणाऱ्या ज्योती कुमारीची गोष्ट मोठ्या पडद्यावर येतेय !!

लॉकडाऊनने आपल्याला आयुष्यभरासाठी आठवणी दिल्या आहेत. तसं अनलॉकचं पुन्हा काही ठिकाणी लॉकडाऊनमध्ये रुपांतर होतंय त्यामुळे आणखी वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आपल्या लक्षात राहतीलच. पहिल्या काही दिवसांत लोकांना हे प्रकरण खूप लांबेल हे कळलं आणि त्यांची घरी जाण्याची ओढ सुरु झाली. ट्रेन, रस्तेवाहतूक, विमानं सगळं काही ठप्प असताना लोकांनी जीवावर उदार होऊन कसेकसे प्रवास केले हे आपण वर्तमानपत्रांत वाचलंच. त्यांतल्या काही लोकांची गरज भावनिक होती, काहींची आर्थिक, तर काहींसाठी तो जन्ममरणाचा प्रश्न होता. यातलीच एक गोष्ट होती ज्योतीकुमारीची. आपल्या जखमी वडिलांना सायकलवर बसवून गुरुग्राम ते बिहार म्हणजे तब्बल १२०० किलोमीटर नेणारी ज्योती कुमारी. या मुलीची कहाणी सर्व भारतासाठी एकाच वेळी कौतुकाची आणि तेवढीच काळजीची ठरली होती. त्याच ज्योती कुमारीवर आता एक सिनेमा तयार होत आहे.

आजवर मोठमोठ्या लोकांवर ज्यांनी आयुष्यात काहीतरी भव्यदिव्य करून दाखवले आहे. अशा लोकांवर सिनेमा तयार होत असे पण ज्योतीसारख्या मुलींचे कर्तृत्व सुद्धा काही कमी नसते. हे ओळखून तिच्यावर तयार होणारा सिनेमा हा निश्चितच नव्या सुरुवातीची नांदी ठरणार आहे. वीमेक नावाची एक सिनेमा निर्मितीत असणारी कंपनी हा सिनेमा बनवत आहे. चार मित्रांद्वारे या ही कंपनी चालवली जाते. त्यांनी हा सिनेमा तयार करायचे ठरवले आहे. महत्वाची गोष्ट अशी की या सिनेमा ज्योतीचा रोल करण्यासाठी कुण्या हिरोईनला न घेता स्वतः ज्योतीलाच तिचा स्वतःचा रोल करण्यासाठी घेतले आहे.

ज्योती या गोष्टीमुळे खूप आनंदी असल्याचे बोलले जात आहे. ज्योती म्हणते की, "या प्रवासाने माझे संपूर्ण आयुष्य बदलून टाकले आहे. जेव्हा मी घरी पोहोचले तेव्हा मला कळले की मी देशभरात हिरो झाले आहे. मला सांगण्यात आले की भारतच नाहीतर जगभरातील लोकांना माझे नाव माहीत झाले आहे. मी काही स्पेशल केलेले नाही अशा परिस्थितीत जे एका मुलीने आपल्या वडीलांसाठी करायला पाहिजे तेच मी केले आहे. मला सिनेमासाठी निवडण्यात आले या गोष्टीचा मला खूप आनंद आहे."

ज्योतीचे वडील मोहन पासवान हे इ-रिक्षा ड्रायवर आहेत. आणि नेमका लॉकडाऊन व्हायच्या काही दिवस आधी त्यांचा ऍक्सीडेंट झाला. तिची आईसुद्धा आजारी असल्याने ती आपल्या वडिलांची काळजी घेण्यासाठी बिहारहून गुरुग्रामला गेली. अचानक लॉकडाऊन घोषित झाल्याने हाती असलेले मोजके पैसे सुद्धा संपले. सगळ्या गाड्या बंद असल्याने वडिलांना परत बिहारला कसे घेऊन जायचे हा प्रश्न होता. ती सांगते की मी तर त्यांना खांद्यावर घेऊन जायलासुद्धा तयार होते. शेवटी तिने साठवलेले सगळे पैसे खर्च करून एक जुनी सायकल घेतली आणि त्यावर वडिलांना बसवून घरची वाट धरली. कित्येक दिवस तर त्यांना फक्त पाण्यावर काढावे लागले. घरी पोहोचणे गरजेचे होते म्हणून अशाही परिस्थितीत ती चालत राहिली. घरी पोचल्यावर तिला फक्त घरी पोचल्याची खुशी होती. पण आपले अशा पद्धतीने कौतुक होत आहे हे ऐकून तिला पण आनंदच झाला.

निर्मात्यांनी सिनेमाचे नाव आत्मनिर्भर असे ठेवले आहे. या सिनेमात ज्योतीची संपूर्ण कहाणी त्याचबरोबर लॉकडाऊन काळात स्थलांतरितांचे झालेले हाल या सिनेमाच्या माध्यमातून दाखवले जाणार आहेत. शाईन कृष्णा हे या सिनेमाचे डायरेक्टर असणार आहेत. हिंदी, इंग्लिश आणि मैथिली अशा तीन भाषांमध्ये हा सिनेमा तयार करण्यात येणार आहे. इंग्लिश सिनेमाचे नाव 'अ स्टोरी ऑफ अ मायग्रंट' असे असणार आहे. इंग्लिश चित्रपटासोबत 20 भाषांमध्ये याचे सबटायटल्स असणार आहेत. ज्योतीचे कौतुक फक्त भारतात झाले नव्हते तर थेट अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी इवांका यांनी सुद्धा या संदर्भात ट्विट केले होते.

लॉकडाऊनचे किस्से-कहाण्या आपल्याला आता अनेक सिनेमांमध्ये दिसतील, ही फक्त एक सुरुवात आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required