computer

बोभाटाची बाग : भाग ८ - मादक सुगंधी कदंबवृक्ष!! पुराणातले उल्लेख तर खरेच, पण कदम घराण्याचा इतिहास काय आहे?

आज बोभाटाच्या बागेत ज्या वृक्षाला आपण भेटणार आहोत तो आपल्या प्राचीन इतिहासाचा साक्षीदार आहे.  हो, आणि इतिहासही कसा तर कृष्ण आणि गोपिकांच्या प्रणयाचा, कालिदासाच्या मेघदूताचा, गोमंतकाच्या राजघराण्याचा असं बरंच काही! चला तर भेटू या कदंबाला! 

कृष्णचरित्रात या कदंबाचा उल्लेख अनेकदा होतो. याच झाडाखाली कृष्ण बासरी वाजवत उभा राहतो, याच झाडावर गोपिकांची वस्त्रे नेऊन ठेवतो, असे एक नाही अनेक कदंब वृक्षाचे संदर्भ पुराणात वाचायला मिळतात. स्कंद पुराणातला एक संदर्भ मात्र खासच आहे. कालिया ज्या डोहात वास्तव्य करत होता त्याच्या आसपासच्या सर्व वनस्पती त्यांच्या फुत्काराने जळून गेल्या होत्या. पण एकच वृक्ष जिवंत होता तो म्हणजे कदंब! त्याचं कारण असं मटलं ज्जातं की स्वर्गातून अमृत प्राशन करून आलेला गरूड काही काळ या वृक्षावर बसला होता. त्याने आपली चोच घासल्यामुळे अमृताचे काही थेंब या वृक्षाला पण मिळाले.

हे झाले पुराणातले संदर्भ. पण कालिदासाच्या मेघदूतात तो यक्ष मेघाला सांगतो मलय पर्वतावरून येणार्‍या वार्‍यामुळे कदंबावर रोमांच उभे राहतात. आणि ते रोमांच म्हणजे कदंबाची फुले! एखाद्या चेंडूसारखी गोल, आधी शेंदरी आणि नंतर सोनेरी रंगात फुललेली ही फुलं बघणं म्हणजे नयनोत्सव असतो. ही फुलं पण एकाच वेळी येतात म्हणून त्यावरून *कदंबमुकुल न्याय असाही एक उल्लेख आढळतो.
 
दुर्गाबाईं भागवत एका लेखात म्हणतात, 
"कदंब फुलला की माधवीलता फुले गळून ओकीबोकी झालेली असते... ग्रीष्माच्या शेवटी उन्हाच्या झळीमुळे मोगरीतले माधुर्य ओसरते. त्यावेळी भ्रमर उमलत्या कदंब लतिकेसाठी आसुसलेला असतो... "

आपल्या इतिहासातला कदम म्हणजे कदंब घराण्याचा उल्लेख आहे. असं म्हटलं जातं की "कदंब घराण्याचा वंश स्थापक पहिला वंशधर राजा मयुरवर्मा याचे अंगणात कदंबाचे एक विस्तीर्ण झाड होते व त्याचे दैवत होते. तो नित्यादिनी त्याची पूजाअर्चा करीत असे. तो अतिपराक्रमी व सार्वभोम राजा होता. तेथपासून त्याचे वंशजास कदंब असे नाव पडले."

तर असा हा हरिप्रिया-कादंबनवासिनी कदंब वृक्ष. त्याचं शास्त्रीय नाव आहे 'Neolamarckia cadamba'. पण तुम्ही हे वाचत का बसला आहात? बाहेर जा, सुगंधी फुलांनी बहरलेला कदंब बघा आणि एखादं गाणं म्हणा,

कदंबतरूला बांधुनी दोला
उंच-खालती झोले
परस्परांनी दोले-घेतले
गेले! ते दिन गेले!

सबस्क्राईब करा

* indicates required