computer

बोभाटाची बाग भाग-३ : निशिगंधाचा दरवळ हवाय? मग ते झाड लावण्यापूर्वी हे वाचाच !!

काहीवेळा असं वाटतं की आपण उगाचच जागतिकीकरणाच्या डिंगा मारत असतो. आपण जागतिकीकरण हा शब्द शिकण्यापूर्वीही ते होतंच! फक्त पध्दत वेगळी होती. धर्मप्रचारक, व्यापारी, सैनिक आणि हौशी प्रवासी हे त्यांच्या परीने नकळत ग्लोबलायझेशन करतच होते. आता बघा, कॉफी आपल्याकडे नव्हतीच. पण एका मुस्लीम फकिराने ती भारतात लपूनछपून आणली. मलेरियाचं औषध - क्विनाइन - ज्या वनस्पतीपासून मिळतं ती सिंकोनाची झाडं ब्रिटिशांनी भारतात आणली. खाद्यपदार्थ तर जगाच्या कुठल्या कानाकोपऱ्यातून आपल्या देशात आले आणि आता आपलेच होउन बसले. पण जर झाडं आणि वनस्पतींबद्दल बोलायचं झालं तर बहुतेक वनस्पती या उपयुक्ततेच्या तत्वावरच आणल्या आणि जोपासल्या जायची. आज आम्ही अशाच एका परदेशातून भारतात आलेल्या आणि नेहमीच बागेत-हृदयात फुलत असणाऱ्या एका फुलाची कहाणी सांगणार आहोत..
 
हो, आज आपण वाचणार आहोत निशिगंधाच्या फुलाबद्दल!! 

दोन आठवड्यापूर्वी जेव्हा गीतकार योगेश यांचं निधन झालं तेव्हापासून त्यांचं गाणं 'रजनीगंधा फूल तुम्हारे' मनात दरवळत होतं. तर सांगायचं असं की आपली ही रोमँटिक रजनीगंधा किंवा निशिगंध हा भारतीय नाही. निशिगंध स्पॅनिश लोकांनी मेक्सिकोतून युरोपात आणला, नंतर फ्रान्सच्या मार्गाने आणि पोर्तुगीजांच्या माध्यमातून तो भारतात प्रवेश करता झाला. फ्रान्स म्हणजे सुगंधाचं माहेरच. त्यामुळे तिथे या फुलांचा वापर 'पर्फ्यूम' बनवण्यासाठी केला जातो. आपण या फुलाला निशिगंध नाव दिलं. हिंदीत त्याचं रजनीगंधा झालं. आता हिंदीवरुन मराठी नाव आलं की मराठीतून हिंदीत नाव गेलं हे काही समजायला सध्या मार्ग नाही. पण इंग्रजीत याचं बारसं 'ट्यूब रोज' अशा रुक्ष नावाने झालं आहे. आपल्याकडे निशिगंधाचा वापर अर्थातच हार, वेण्या बनवण्यासाठी आणि अर्थातच पुष्पगुच्छात होतो. 

ही फुलं आपल्याला इतकी जवळची वाटतात की काही वेळ असं वाटतं की केवळ "रजनीगंधा फूल तुम्हारे" या गाण्यामुळे विद्या सिन्हा सारख्या ठिकठाक हिरॉइनला आपण सहन केलं. पण ही फुलं अगदी रुक्ष माणसाला पण कशी रोमँटिक बनवतात हे बघायचं झालं तर अशोककुमारचा 'आशिर्वाद' बघायला हवा. 

या फुलझाडाची लागवड करायची असेल तर काय पथ्य पाळावीत ते पण बघा.

1. निशिगंध जमिनीत चांगला वाढतो. पण हे झाड कुंडीत लावायचे असल्यास किमान १२ इंची कुंडी घ्यावी.

2. निशिगंधाला गुलछडी ही म्हणतात. ही एक अत्यंत खादाड वनस्पती आहे. त्यामुळे हे झाड लावताना मातीत भरपूर सेंद्रिय पदार्थ/शेण खत घालावे, पाणी साचू देऊ नये, निचरा चांगला असावा आणि मुख्य म्हणजे झाडावर पाण्याचा ताण पडू नये.

3. निशिगंधाचा मोठा कांदा विकत घ्यावा/आणावा. छोटा कांदा लावल्यास नुसत्या पातीच येतील. हा कांदाही लावताना कुंडीच्या मध्यभागी २ इंच खोल लावावा.

4. कुंडी किंवा झाड ज्या ठिकाणी भरपूर सूर्यप्रकाश येतो अशाच ठिकाणी ठेवावा.

5. झाडाला नियमितपणे खतपाणी द्यावे. 

फुलं येऊन गेल्यावर या झाडाची पानं पिवळी पडतात. अशावेळी आणि हिवाळ्यातही निशिगंधाला पाणी अगदी कमी द्यावे, कंद उकरून परत नव्याने लागवड करावी.

इतकं केलंत की काही दिवसांतच निशिगंधाचा दरवळ तुमचे रोज स्वागत करेल..

 

लेखिका : अंजना देवस्थळे

सबस्क्राईब करा

* indicates required