computer

बोभाटाची बाग भाग -२ या सुंदरीला माकडी का म्हणतात ?

अपमान करणं ही पण  एक कला आहे. एखाद्या सुंदरीचा धडधडीत अपमान करायचा असला तर काय करायचं? फार सोप्पं आहे, तिच्या सौंदर्याचा अपमान करायचा!  माणसाला ही कला उपजतच येत असावी. नाहीतर फोटोत दाखवलेल्या या फुलाला चक्क माकडीचे फूल कोण म्हणेल? आता या फुलाने कोणाचे काय वाकडे केले होते कोणास ठाऊक?

या झाडाला इंग्रजीत Torch Tree म्हणतात.  डाक पोहोचवणारे दूत एकेकाळी या झाडाची फांदी रात्री मशालीसारखी वापरायचे. म्हणूनच हिंदीतही याला 'मशाल का झाड' म्हणतात. कन्नडात गोरवी म्हणतात. पण आपल्या अमृतातेही पैजा जिंकणाऱ्या मराठीत मात्र या फुलाचं नाव 'माकडी' आहे!! मराठीत केलेल्या अपमानाची संस्कृतने भरपाई केलीय. देववाणीत या फुलाला नवमल्लिका म्हणतात. ही फुलं दिसायला अगदी मल्लिकेसारखी म्हणजे एखाद्या राजाच्या सुंदर पट्टराणीसारखी असतात. जाईजुईची सख्खी चुलतबहीण नसूनही या फुलाला मोहक सुगंध असतो.

मोगरा, जाई, जुई, मदनबाण या प्रजातीत हे फूल मोडत नाही हे मात्र इथे आठवणीने लक्षात ठेवा. 'त्या' मल्लिका वर्गात मोडणारी फुलं शाक्त संप्रदायी भगत त्यांच्या विधीत वापरतात. उडप्याच्या हॉटेलात गेलात तर गल्ल्याच्या वर असलेल्या देव्हाऱ्यातला हार महाराष्ट्रातल्या मोगर्‍याचा नसतो, तर याच मल्लिकेचा असतो. या मोगर्‍याच्या जातीला 'मैसोर मल्लिगे' म्हटलं जातं. ही फुलं रोज एअर कुरीयरने मुंबईत येतात. त्यांचा सुवास अप्रतिम असतो.

तर या फुलाला नव मल्लिका म्हणा किंवा माकडी, बहरण्याचे काम ही फुलं चोख करत असतात.

लेखिका : अंजना देवस्थळे

सबस्क्राईब करा

* indicates required