computer

बोभाटाची बाग भाग-५ : विषारी असा शिक्का बसलेली रुई वनस्पती खरंच विषारी आहे का?

रुई- या वनस्पतीबद्दल लहान मुलांच्या मनात सातत्याने धाक निर्माण केला जातो. रुईचा चिक विषारी असतो. त्याचा थेंब जरी डोळ्यात गेला तर अंधत्व येतं हे सतत ऐकल्यामुळे की काय रुईच्या सुंदर जांभळ्या फुलांकडे कोणीच लक्षच देत नाही. ते झुडूप कसंतरी आपलं अस्तित्व बागेच्या,अंगणाच्या कोपर्‍यात तगवत असतं. त्याच्या बोंडातून कापसाच्या म्हातार्‍या उडायला लागल्या की त्यांचा पाठलाग करत धावणं ही आठवण मात्र सगळ्यांना आवडती असते. 

हे झालं लहानपणचं, थोडे मोठे झाल्यावर या वनस्पतीची आठवण होते थेट लग्नाच्या वेळीच! बर्‍याच घरात 'पंच पल्लव ' देवक असते. त्यामधील एक पल्लव म्हणजे रुई ! तसेही दर शनिवारी हा हार मारुतीला अर्पण करणारे अनेक भावीक आहेतच. 

पण विष हा विषयच या वनस्पतीचा स्थायीभाव समजला जातो. आता जे विषारी असेल त्याचा मालक म्हणजे निळकंठ महादेवच नाही का ? त्यामुळे रुईचे फूल महादेवाला वाहीले जाते. असेच दुसरे विषारी फूल म्हणजे धोतर्‍याचे ते पण शंकराचे आवडते फूल समजले जाते.

पण रुईचा चिक खरोखर विषारी असतो का ? या प्रश्नाचे उत्तर होय असेच आहे.आफ्रीकेतल्या आदीवासी जमाती बाणाच्या टोकाला हा चीक लावून विषारी बाण बनवायचे.. यात असलेले विष भिनले की हृदयाचे ठोके जोरात पडतात आणि प्रमाण वाढले तर कार्डीअ‍ॅक अ‍ॅर्‍हीमीआ होऊ शकतो. डोळ्यात चीक उडला तर डोळ्याला केरॅटो कंजक्टीव्हीटीस होतो ज्यामुळे दृष्टीहिनता येऊ शकते. धौम्य ऋषींच्या उपमन्ञु या शिषाची कथा तुम्ही वाचली असेल ! 

पण वाचकहो, या वनस्पतीवर मारलेला विषारीपणाचा शिक्का म्हणजेच ही वनस्पती औषधी असण्याचे प्रमाणपत्र आहे. या वनस्पतीचा उपयोग अनेक औषधात प्राचीन काळापासून केला जातो. सहजासहजी न बर्‍या होणार्‍या जखमा भरून येण्यासाठी ,सूज उतरवण्यासाठी, ताप उतरवण्यासाठी याच्या पानांचा उपयोग केला जातो.  काटा रुतून आत अडकला की रुईच्या चिका सारख रामबाण औषध नाही.

आधुनीक औषधशास्त्रात डायक्रोलोमिथेन वापरून बनवलेले अर्क फुफ्फुस, मोठे आतडे आणि यकृताच्या कर्करोगावर यशस्वीरित्या वापरून बघण्यात आलेले आहेत. या क्षेत्रात अजूनही संशोधन बाकी आहे. 

सगळ्या वनस्पतींची शास्त्रीय नावं टंग ट्वीस्टर म्हणूनच वापरावीत असं आम्हाला वाटतं . या वनस्पतीचही नाव असंच अवघड म्हणजे   Calotropis gigantea आहे. 

तर, असे अनेक बरेवाईट प्रवाद असलेल्या या झुडुपाची फुलं बघावीत तर त्याच्या लव्हेंडर कलरच्या सौंदर्यासाठी ! बस्स , सौंदर्याचा आस्वाद घ्या , बाकी गुणधर्म तपासायाला शास्त्रज्ञ मंडळी आहेतच !

 

लेखिका : अंजना देवस्थळे

सबस्क्राईब करा

* indicates required