computer

बोभाटाची बाग भाग-४ : दुर्मिळ कैलाशपती. फुलांसाठी प्रसिद्ध असलेल्या या झाडाचे औषधी गुणधर्म माहित आहेत का?

कैलाशपती. हा वृक्ष नजरेस पडला आणि विस्मृतीत गेला असे कधीच होत नाही. याला अनेक कारणं आहेत. या अवाढव्य वृक्षाला येणारी तशीच मोठी फुलं आणि त्यानंतर झाडाला लगडलेली तोफेच्या गोळ्याएवढी मोठ्ठी फळं सह्ज लक्षात राहतात. या मोठ्या फळांचा फारसा काही उपयोग नसतो, पण कैलाशपतीची फुलं हा मात्र एक खास विषय आहे. 

ही फुलं आकाराने मोठी असतात. त्यात गुलाबी आणि पिवळ्या पाकळ्यांची रचना, फुलाच्या मध्यभागात असलेले परागकोष, नागाच्या फणीचा आकार हे सगळे मनमोहक असते. या फुलांचा सुगंध फक्त सकाळी लवकर उठणार्‍यासाठीच राखून ठेवला असतो. माध्यान्हीपर्यंत तो सुगंध लोप पावतो. जेव्हा हा वृक्ष बहरतो तेव्हा एकावेळी हजार फुलंही येतात. रसिकांच्या नजरेला तर हा रंगाचा आणि सुगंधाचा उत्सवच असतो असं म्हणा ना! 

शिवललिंगाशी साधर्म्य दिसणार्‍या या फुलांना एक भक्तिची किनार आहे. पण ती आधुनिक असावी. कारण हा वृक्ष तसा परदेशी म्हणजे ब्राझिलमधून भारतात आलेला आहे. त्याचे कैलाशपती हे नाव पण आधुनिकच आहे. त्यामुळे पुराणात या फुलांचा उल्लेख आढळत नाही.

मानसिक थकव्याला (डिप्रेशन) उभारी देण्याचे काही गुण या वृक्षाच्या अर्कात (Methanolic extract) असतात असे काही संशोधकांना आढळून आले आहे. त्याखेरीज इक्लाय-बॅसीलस- स्टेफीलोकॉकस अशा प्रकारच्या जंतूंना मारक गुणधर्म या झाडाच्या फळामध्ये आढळले आहेत. तमिळनाडूच्या संशोधकांच्या मते या वनस्पतीचा उपयोग पोटातील जंत -कृमीच्या निर्मूलनासाठी पण केला जाऊ शकतो.

ब्राझीलच्या संशोधकांच्या मते काही वेदनाशामक गुणधर्मही या वनस्पतीत आहेत. त्वचेचे अल्ट्रा व्हायोलेट किरणांपासून संरक्षण, केसांची निगा आणि त्वचेच्या तजेलपणा, चेहेर्‍यावरच्या वृध्दत्वाच्या खुणा नाहीशा करणार्‍या गुणधर्मांसाठी या वनस्पतीच्या काही अर्कांवर पेटंट घेतली गेली आहेत.

एक प्रश्न आमचे वाचक विचारतात तो असा की हे वृक्ष कुठे बघायला मिळतील? 

या वनस्पतीचे वर्गीकरण 'दुर्मिळ' वनस्पतींमध्ये केलेले असले तरी भारतात अनेक ठिकाणी हे वृक्ष आढळून येतात. फुलांच्या आकारामुळे आणि ठेवणीमुळे शंकराच्या मंदिराच्या परिसरात याची लागवड केली गेली आहेच. त्याखेरीज जुन्या ब्रिटिशकालीन इमारतींच्या परिसरात म्हणजे बर्‍याचशा रेल्वे क्वार्टरच्या, जुन्या न्यायालयांच्या, सरकारी इस्पितळांच्या आवारात मोठे कैलाशपाती वृक्ष बघायला मिळतात. मुंबईत केइएम हॉस्पिटलच्या अंगणातच पाच सहा वृक्ष सहज बघायला मिळतात. बागा सजवणारे (हॉर्टीकल्चरीस्ट) तर हा वृक्ष आठवणीने लावतात.

कॅनन बॉल ट्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या झाडाची फळं म्हणजे घाणेरड्या वासाचा बॉम्ब असतो. रेमंड वूलन मिलचे चेअरमन विजयपत सिंघानिया यांच्या वडिलांचे नाव कैलाशपत सिंघानिया. त्यांना या वृक्षाची माहिती मिळाल्यावर त्यांनी या वृक्षाची लागवड  कंपनीच्या आवारात मोठ्या प्रमाणात केली. आता या झाडाची एक खासियत कोणाच्याही लक्षात आली  नाही की याची पानगळएका वर्षात पाच ते सहा वेळा होते. आज पानगळ संपली की उद्या नवीन पालवी हजर ! पण यामुळे जमिनीवर पडलेली पानगळ झाडण्यासाठी काही नवीन माणसं नेमावी लागली!!

तसं या वृक्षाचं शास्त्रीय नाव बरंच अगडबंब- Couroupita guianensis असे आहे. पण आपण का ते उच्चारत बसण्याचे कष्ट घ्यायचे? आपण फुलांच्या सौंदर्याचा आस्वाद घ्यावा हे चांगले, नाही का?

 

लेखिका : अंजना देवस्थळे

सबस्क्राईब करा

* indicates required