computer

बोभाटाची बाग - भाग १८ : “देशी वृक्ष जागृती अभियान”...परिचित आणि अपरिचित भारतीय वृक्षांची ओळख करून घेऊ या !!

बोभाटाच्या बागेत या आधीच्या लेखात वृक्षारोपण कुठे करावे याची आपण माहिती घेतली. आता बाग फुलवायची म्हणजे कोणती झाडं लावायची हा निर्णय घेणे फार महत्वाचे असते. प्रत्येक झाडाचा बांधा, ठेवण आणि काही वेळा अचूक उपयुक्तता माहिती असणे गरजेचे असते. “देशी वृक्ष जागृती अभियान”च्या पुस्तिकेत झाडांचा आकार आणि उंची, भरपूर पर्णसंभार असलेले वृक्ष, सरळसोट वाढणारे आणि फांद्या कमी असलेले वृक्ष, खाण्यायोग्य फळे देणारी झाडे, सुंदर आकर्षक फुले देणारी झाडे, औषधी गुणधर्म असलेली झाडे, पक्षांना आकर्षित करणारी झाडे असे वर्गीकरण करून यादी देण्यात आली आहे.

आकाराने मोठे व उंच वाढणारे देशी वृक्ष-

(कदंब)

उंबर, पिंपळ, बड, पिंपर्णी, पायर, नांद्रूक, सातबीण, पुत्रंजीवी, बेहडा, कदंब,

शिरीष, बकूळ, अर्जुन, कडूलिंब, वायवर्णा, काटेसावर, मुचकुंद, सोनचाफा, चिंच,

सुरंगी, जांभूळ, जंगली बदाम, फणस, अंकोळ, महारूख, रानबिब्बा, भेरली माड,

बिवळा, दून (महानीम), हळदू, वाळुंज, कोसिंब, वावळ, अंजनी, इत्यादी.

(जांभूळ)

यापैकी उंबर, पिंपळ, वड, बकुळ,काटेसावर,सोनचाफा, चिंच, जांभूळ,फणस या झाडांचा आपला परिचय असतो. पण काही झाडे अशी आहेत की ती पाहाण्यात आली असतील, पण त्यांची नावे माहिती नसतील. काही झाडं तर पूर्णपणे अपरिचित असू असतील. त्यातील काहींची आज ओळख करून घेऊया!!

 

भेर्ली माड -

या वृक्षाचे शास्त्रीय नाव Caryota urens असे आहे. शंकर जटा किंवा अर्धी सुपारी या नावाने पण हे ओळखले जाते. 'ताड' वर्गात मोडणारे हे झाड त्याच्या फुलोर्‍याच्या सौंदर्याने ओळखले जाते. या झाडापासून ताडगूळाची निर्मिती करता येते. गेल्या काही वर्षांत ताडगूळाची मागणी घटली आहे आणि उत्पादनही कमी आहे. मंडप सुशोभित करण्यासाठी याच्या पानांची -फुलोर्‍याची अतोनात कत्तल होते आहे.

वायवर्णा -

या वृक्षाचे शास्त्रीय नाव Crataeva Nurvala - सुंदर देखण्या फुलोर्‍यासाठी हे झाड ओळखले जाते. वरूण -पाचुंदा अशा अनेक नावांनीही ओळखले जाते. अश्मरिघ्न असेही एक नाव या झाडाला आहे. किडनी स्टोन (अश्म) निवारणासाठी मूळांचा आणि सालींचा वापर केला जातो.

वरुणः शेतपुष्पच तिक्तशाकः कुमारक श्वेतद्रुमो गन्धवृक्षस्तमालो मारुतापह अशा अनेक नावानी संस्कृत वाङ्मयात त्याचा उल्लेख आहे.

रानबिब्बा -

HOLIGARNA GRAHAMII (WIGHT) KURZ असे शास्त्रीय नाव असलेले हे झाड काजूसारख्या झाडाच्या भावकीतले आहे. सदाहरीत भरगच्च पर्णसंभार, मजबूत मोठा बुंधा असलेले हे झाड पश्चिमी घाटात आढळते. काही ठिकाणी त्याचा उल्लेख ब्लिस्टरींग वार्नीश ट्री असा आढळतो. झाडाच्या रसाने त्वचेवर डाग पडण्यापासून फोड येण्यासारखी लक्षणे दिसून येतात.

नांद्रूक-

नांदुरकी -नांदरुख अशा अनेक नावानी ओळखला जाणाऱ्या या वृक्षाचे शास्त्रीय नाव Ficus retusa असे आहे. वड, पिंपळ आणि नांद्रुक 'फायकस' या प्रवर्गात मोडतात. पूर्वी नांद्रूकीच्या झाडापासून लाखेचे उत्पादन घेतले जायचे. बोनसाय पध्दतीने हे झाड वाढवण्याकडे सध्याचा कल आहे. तुकाराम महाराज वैकुंठाला गेले त्या जागेवर हा वृक्ष आहे. तुकाराम बिजेच्या दिवशी दुपारी १२.०२ वाजता तो हलतो असे म्हणतात.

सातविण

सातविण या झाडाला सप्तपर्णी या नावानेही ओळखले जाते. सात पानांच्या रचनेमुळे हे नाव मिळालेले दिसते. मुंबईतल्या अनेक जुन्या रस्त्यांच्या कडेला हे झाड लावलेले बघायला मिळते.

 

या सर्व वृक्षांचे वैशिष्ट्य असे की हे अनेक वर्षं जगणारे, उंच वाढणारे, डेरेदार, भरपूर पर्णसंभार असलेले वृक्ष आहेत. या सर्व वृक्षांचा आणि आपला पुरातन काळापासून परिचय आहे. थोडक्यात मनुष्य प्राण्याच्या जगण्याचा आणि या वृक्षांचा जवळचा संबंध आहे. पुढच्या भागात अशाच आणखी काही वृक्षांची ओळख करून घेऊया.

सबस्क्राईब करा

* indicates required