computer

बोभाटाची बाग - भाग १६ : हिमालयात ३००० ते ५७००मी उंचीवर उगवणारं 'खरं' ब्रह्मकमळ आणि त्याची रोचक कथा!!

बर्‍याच वेळा तुमच्या मित्रमंडळीतून किंवा नातेवाईकांकडून एक मेसेज येतो, आज रात्री आमच्याकडे ब्रह्मकमळ फुलणार आहे. एकदा फुलले की काही तासांतच ते कोमेजते. तेव्हा वेळेत या. दर्शन घ्या आणि पूजेतही सहभागी व्हा! याआधी हा अनुभव तुम्हाला नक्कीच आला असेल. पण सध्याच्या सामाजिक दुराव्याच्या काळात ते शक्य होत नाही. म्हणून दुसर्‍या दिवशी फेसबुकवर ब्रह्मकमळाचे सुंदर फोटो बघायला मिळतात.

पण आम्ही आज ज्या ब्रह्मकमळाबद्दल बोलणार आहोत ते आहे खरे 'ब्रह्मकमळ'. हे कमळ फक्त हिमालयात अतिउंच भागात म्हणजे जे ३००० ते ५७०० मीटर उंचीवर उगवते.

(हिमालयात उगवणारं ब्रम्हकमळ)

मग हे खरे आणि आमच्या घरी उगवते ते खोटे असे काही आहे का? तर त्याचे उत्तर असे आहे की आपल्या घरातल्या कुंडीत किंवा आपल्या बागेत जे उमलते ते 'लोकप्रिय संस्कृती' म्हणजे पॉप्युलर कल्चरमधले ब्रह्मकमळ! ते एका जातीच्या कॅक्टसचे फूल असते. हिमालयात उगवते ते पण ब्रह्मकमळच, आणि ते या नावाने गेली हजारो वर्षे ओळखले जाते.

(घरातल्या कुंडीत उगवणारं ब्रम्हकमळ)

आपल्या पुराणातही ब्रह्मकमळाचा उल्लेख आहे. आता हे नाव त्याला का मिळाले? तर भगवान विष्णूंच्या नाभितून उगवलेल्या कमळावर ब्रह्मदेव असतात, त्यांच्या हातात हे फूल असते म्हणून त्याचे नाव ब्रह्मकमळ! इतर अनेक पौराणिक कथांमध्ये या फुलाचा उल्लेख आढळतो. गणपतीच्या धडावर हत्तीचे शिर कलम करण्यासाठी भगवान शंकराने या कमळाच्या रसाचा वापर केला होता. लक्ष्मणाला जेव्हा मूर्च्छेतून जाग आली तेव्हा देवांनी याच फुलांचा वर्षाव स्वर्गातून केला होता. अर्थात जेवढे जुने नाव तितक्याच दंतकथाही जास्त असणारच. आपण सध्या कॅक्टसच्या फुलाला ब्रह्मकमळ म्हणतो ती कदाचित भविष्यातली दंतकथा असेल.

हिमालयात उगवणार्‍या ब्रह्मकमळाचे अनेक औषधी उपयोग आहेत. तिबेटी औषधांमध्ये त्याचा वापर केला जातो. पौराणिक संदर्भामुळे केदारनाथ, बद्रीनाथ आणि इतर मंदिरात पूजेसाठी या फुलांना मागणी असते. त्यामुळे उत्तराखंडातल्या बाजारात या फुलाची जोरात विक्री होते. साहजिकच परागीकरणासाठी फुलं कमी पडतात. त्यामुळे त्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होते आहे.

एकेकाळी उत्तराखंड जेव्हा उत्तरप्रदेशाचा भाग होता तेव्हा ते त्या राज्याचे फूल होते. काही वर्षांपूर्वी उत्तराखंड हे वेगळे राज्य झाल्यावर या फुलावर हक्क कुणाचा हा प्रश्न आला. पण हिमालयाच्या अतिउंच भागात म्हणजे उत्तराखंडात ते उगवत असल्याने ते आता त्यांचे फूल आहे. १९८२ साली भारतीय टपाल खात्याने ब्रह्मकमळाचे एक तिकीटही जारी केले होते. पण ब्रह्मकमळ फक्त उत्तराखंडाची ही मक्तेदारी नाही. काश्मिर, सिक्कीम, गढवाल, चामोली, हेमकुंड या सर्वच परिसरांत ब्रह्मकमळ दिसते.

आता वनस्पती शास्त्राच्या नजरेतून ब्रह्मकमळाची अधिक माहिती घेऊ या. Saussurea या कुळात असलेल्या या फुलाचे पूर्ण नाव Saussurea obvallata आहे. Saussurea हे एका स्विस तत्ववेत्त्याचे नाव आहे. त्याच्या सन्मानार्थ ही जातकुळी ओळखली जाते. या कुळात कस्तूरी कमळ, फेन कमळ, हिम कमळ ही भावंडे पण आहेत.

फुलाची रचना अशी असते की बाहेरच्या बाजूने त्याचे हरीतदल आत असणार्‍या खर्‍या निळ्या छोट्या छोट्या फुलांचे रक्षण करीत असतं. आता दिसण्याच्या गोष्टींची तुलना करायची म्हटली तर आपल्या घरी उगवणारे फुल जास्तच सुंदर दिसते असं काहींना वाटेल. पण हिमालयात जाऊन ब्रह्मकमळ बघणार्‍यांवर ते ब्रह्मकमळ जादू करतं तेही साहजिकच आहे.

 

लेखिका : अंजना देवस्थळे

सबस्क्राईब करा

* indicates required