computer

चर्च, गोदाम,मृत्यूदंडाची जागा, सायकल स्टँड ते बुकस्टोअर. ७०० वर्षं जुन्या चर्चचा कायापालट पाहा!!

पुस्तकांमध्ये अनेक संस्कृत्या, माणसे, काळ, इतिहास, आणि ज्ञान साठवून ठेवलेलं असतं.  वर्तमान आणि भविष्याबद्दलचाही दृष्टीकोनही असतोच असतो. मग अशा पुस्तकाचं दुकानही अनेक शतकं उनपाऊस खात उभ्या असलेल्या ऐतिहासिक ठिकाणी असेल तर? या कल्पनेचं मूर्त रूप म्हणजे Selexyz Dominicanen bookstore. 

Selexyz ही पुस्तकांचं वितरण करणारी डच कंपनी आहे. नेदरलँड्सच्या वेगवेगळ्या भागांमध्ये या कंपनीचे बुकस्टोअर्स आहेत. Selexyz ची एक खासियत अशी की त्यांना दुकान थाटण्यासाठी ऐतिहासिक वास्तू आवडतात. Selexyz Dominicanen bookstore हे या प्रकारातलं त्यांचं तिसरं आणि सर्वात भव्य बुकस्टोर आहे.

Selexyz Dominicanen bookstore हे खरं तर १३ व्या शतकातील डॉमिनिकन चर्च आहे. या चर्चची निर्मिती १२९४ साली करण्यात आली होती. तेव्हापासून ते १७०० च्या शेवटपर्यंत सर्व काही सुरळीत चाललं होतं. पण १७९४ साली नेपोलियनने हल्ला करून देशावर ताबा मिळवल्यावर या वास्तूचे दिवस फिरले. नेपोलियनने डॉमिनिकन्सचं नेदरलंड्समधून उच्चाटन केलं. परिणामी हे चर्च ओस पडलं.

Selexyz ने आपलं पुस्तकाचं दुकान थाटण्यापूर्वी या जागेने अनेक स्थित्यंतरं पाहिली. कधी गोदाम म्हणून तर कधी संग्रहाची जागा म्हणून चर्चच्या जागेचा वापर झाला. असं म्हणतात की मृत्युदंडाची शिक्षा देण्यासाठी तयार केलेलं गिलेटीन या जागी ठेवण्यात आलं होतं. Selexyz ने जागेचा ताबा मिळवण्यापूर्वी चर्चच्या जागेचा वापर सायकल पार्किंगसाठी केला जायचा. 

१३ व्या शतकातील हा ऐतिहासिक ठेवा जपण्यासाठी Selexyz ने या जागेचा कायापालट केला. हे काम Merkx + Girod या वास्तुविशारद कंपनीने हाती घेतलं होतं. Selexyz ने इतर ऐतिहासिक ठिकाणी उभारलेल्या बुकस्टोर्सचं डिझाईन देखील Merkx + Girod कंपनीने तयार केलं होतं. 

Merkx + Girod कंपनीने चर्चच्या जागेचं पुस्तकाच्या दुकानात रुपांतर करण्यासाठी अत्यंत काळजीपूर्वक काम केलं. दुकानाचं डिझाईन तयार करताना कुठेही चर्चच्या वास्तूला धक्का लागणार नाही याची काळजी घेतली गेली. चर्चची जागा मोठी होती, पण दुकानासाठी आणखी जागा हवी होती. त्यासाठी ३ मजले तयार करण्यात आले. सर्वात वरच्या कपाटापर्यंत पोचण्यासाठी पायऱ्या तसेच लिफ्टची व्यवस्था करण्यात अली. बाथरूम तसेच स्टोरेज रूम तयार करण्यासाठी चर्चच्या गायन स्थळाचा वापर करण्यात आला.

अशा प्रकारे हे सर्वांग सुंदर बुकस्टोर उभं राहिलं. सगळा देखावा तर तयार झाला, पण पुस्तकांचं काय? तर या दुकानात पुस्तकांचं मोठं कलेक्शन विक्रीस ठेवलेलं आहे. स्थानिक भाषांमधली पुस्तके, तसेच वेगवेगळ्या विषयांवरची इंग्रजी पुस्तकेही इथे आहेत. याखेरीज वाचकाला वाचण्यासाठी जी वातावरण निर्मिती लागते तीही Selexyz ने यशस्वीपणे साध्य केली आहे. चर्चच्या मागच्या बाजूला वाचकांना बसण्यासाठी जागा आहे, तिथे वाचक कॉफीचे घोट घेत, चर्चची भव्य वास्तू न्याहाळत आवडत्या पुस्तकाचा आनंद घेऊ शकतात.

Selexyz Dominicanen bookstore ला वास्तुकलेचा Lensvelt de Architect Interior Prize मिळाला आहे, तसेच २००८ साली गार्डियन वृत्तपत्राने जगातील सर्वोत्तम पुस्तक विक्रीच्या ठिकाणाचा मानही Selexyz Dominicanen bookstore ला दिलाय.

वाचक आणि ऐतिहासिक वास्तुकलेत रस असणाऱ्या प्रत्येकासाठी ही जागा म्हणजे पर्वणी आहे. कधी नेदरलंड्सला जाण्याचा योग आला तर या बुकस्टोअरला नक्की भेट द्या.

सबस्क्राईब करा

* indicates required