computer

१२ वर्षे तब्बल ४ लाख लोकांचं पोट भरणारा अन्नदाता...वाचा या अज्ञात हिरोच्या कार्याविषयी !!

कोरोनाने देशाला गेल्या वर्षाच्या सुरुवातीपासून आपल्या विळख्यात घेतले आहे. देशात या दरम्यान मोठ्या प्रमाणावर लॉकडाऊन होता. अन्नही मिळत नाही अशी परिस्थिती गेल्या अनेक वर्षात देशाने पहिल्यांदा अनुभवली. पण याही परिस्थितीत काही लोकांनी अन्न पुरवण्याचे काम केले. पण आज ज्या अफलातून माणसाची गोष्ट आम्ही सांगणार आहोत तो माणूस गेली १२ वर्षे निस्वार्थपणे गरजूंना अन्न पुरवत आहे.

केरळमधील कोन्नूर जिल्ह्यातील सिपी सुरेश कुमार यांनी गेल्या १२ वर्षात तब्बल ४ लाख लोकांना जेवण पुरवले आहे. सुरुवातीच्या काळात त्यांनी आपल्या बचतीतून हे काम केले. पुढे त्यांनी बॅनर  तयार केला आणि त्याच्या कॉपीज ५० विविध ठिकाणी लावल्या. या बॅनरवर लिहिले होते, 'ज्यांच्याकडे जास्तीचे अन्न असेल ते कन्नूर तालुका ऑफिसजवळ येऊन जमा करू शकतात, हे अन्न गरिबांमध्ये वाटले जाईल.'

लोक कितपत प्रतिसाद देतील याबद्दल सुरेश यांना शंक होती. पण पहिल्याच दिवशी २५ लोकांनी अन्नदान केले. ते अन्न २५ लोकांमध्ये वाटण्यात आले. सुरेश यांनी शाकाहारी, मांसाहारी कुठल्याही प्रकारचे अन्न स्वीकारले जाईल असे म्हटले होते, पण चांगले अन्न स्वीकारले जाईल अशी अट ठेवली होती. दुसऱ्या दिवसापासून सुरेश यांना मिळणारे अन्न वाढले. एकेक दिवस सरकत गेले तसे अन्नदान करणाऱ्यांची संख्या वाढत गेली. रोज अन्न जमा करायचे आणि ते गरजू लोकांमध्ये वाटायचे हा अभिनव प्रयोग ते गेली १२ वर्षे अविरतपणे राबवत आहेत.

एखाद्याच्या घरी जर काही कार्यक्रम असला तर ते जास्तीचं जेवण बनवून सुरेश यांच्याकडे सुपूर्द करत असतात. तसेच मुलांचे वाढदिवस आणि इतर कार्यक्रमांमधून मिळणारं अन्न ते थेट गरिबांपर्यंत पोहोचवत असतात. सुरेश सांगतात की, 'एखाद्या दिवशी कमी अन्न गोळा होते तर एखाद्या दिवशी खूप जास्त अन्न गोळा होते, कधीकधी अनेक डिशेस असतात तर कधी कधी एकाच प्रकारचे अन्न असते. काहीही असले तरी आपण नियमितपणे जेवण पुरवतो.'

सुरेश यांच्याकडे अन्नाबरोबरच कपडे देखील काही लोक देऊन जातात, ते कपडे थेट लोकांमध्ये वाटले जातात. पुढे जसे त्यांचे काम वाढले तसे बाहेरच्या लोकांनी देखील त्यांना मदत करण्याची इच्छा व्यक्त केली. अशा पद्धतीने छोट्या स्तरावर सुरू झालेले काम आज ४ लाख लोकांचे पोट भरून देखील सुरू आहे.

अशा या दानशूर व्यक्तीस बोभाटाचा सलाम!!

सबस्क्राईब करा

* indicates required