computer

मोबाईल फोन आणि सोशल मिडिया...आशिष नेहराने सांगितलेले किस्से त्याची एक वेगळी बाजू दाखवतात !!

सोशल मिडिया हा सध्या जीवनावश्यक भाग बनला आहे. सोशल मीडियावर सक्रिय नसलेला माणूस म्हणजे मागास असे समजले जाते. त्यातल्या त्यात सेलिब्रिटी असतील तर त्यांची एक कमाई सोशल मीडियावरून देखील होते, म्हणून त्यांना तर 'सोशल' राहणे भाग असते. पण याही काळात काही सेलिब्रिटी सोशल मिडियापासून अंतर राखून असतात. ९० च्या दशकातील पोरांचा आवडता बॉलर आशिष नेहरा देखील यापैकीच एक आहे. तो २०१७ पर्यंत साधे व्हाॅट्सऍपसुद्धा वापरत नव्हता.

नेहराने गौरव कपूरच्या शोमध्ये याबद्दल सांगितले होते. नेहरा सांगतो की, २०१७ साली त्याला त्याच्या बायकोने 'आयफोन ७' घेऊन दिल्यानंतर त्याने पहिल्यांदा व्हाॅट्सऍप सुरु केले होते. त्याच्याआधी गडी चक्क नोकिया E51 हा अतिशय साधा फोन वापरत होता. तो पुढे सांगतो की, त्याला एक व्यक्ती आयफोन सिरीजच्या फीचर्सची माहिती देत होता. तेव्हा त्याने त्याला मिश्कीलपणे आपल्याला मोबाईलमधले फक्त लाल आणि हिरवा बटन माहीत असल्याचे सांगितले होते. 

हाच धागा पकडत गौरव कपूरने त्याला सांगितले की तुझ्या या स्पष्ट स्वभावामुळे तू ट्विटरवर मत व्यक्त केले पाहिजे. यावर उत्तर देताना नेहराने सांगितलेला किस्सा वाचल्यावर मात्र मैदानावर शांत दिसणारा नेहरा किती स्पष्टवक्ता आणि आपल्या तत्वांशी तडजोड न करणारा आहे याची प्रचिती येते.

नेहरा सांगतो, 'माझ्याकडे एक व्यक्ती आला, तो मला म्हणाला तुम्ही महिन्यातून फक्त 3 ट्विट करा, त्याबदल्यात आम्ही तुम्हाला वर्षाचे ८० लाख रुपये देऊ. ट्विट काय करायचं ते आम्ही सांगू.' त्यावर नेहरा भडकला, 'मी काय करायचे हे तुम्ही मला सांगणार? आजवर मी कुणाचेही ऐकून काम केलेले नाही. मला जे योग्य वाटते तेच मी बोलतो' अश्या शब्दांत त्या व्यक्तीचा पाणउतारा करत नेहराने त्याला पिटाळून लावले.

अनेक सेलिब्रिटी हे पैशांच्या  मोबदल्यात ट्विटर तसेच इतर माध्यमांवर पोस्ट्स टाकत असतात. पण नेहरा सारखा विशेष प्रसिद्धी नसलेला खेळाडू पैशांपेक्षा जास्त महत्त्व आपल्या तत्वांना देतो हे कौतुकास्पद आहे

सबस्क्राईब करा

* indicates required