computer

आयपीएल २०१९ फायनल आणि शेन वॉटसनचा रक्ताळलेला पाय...काय घडलं होतं तेव्हा?

आयपीएलचा हिट असण्यामागील सर्वात मोठे कारण जर कुठले असेल तर ते म्हणजे सेकंदा सेकंदाला बदलणाऱ्या गेममुळे सातत्याने असलेली सामन्यातील रंगत!! कधीही सामना कुणाच्या पारड्यात पडेल काहीही सांगता येत नाही. खेळाडू जिंकण्यासाठी जिवाच्या आकांताने प्रयत्न करत असतात. असाच एक आयपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक चित्तथरारक सामना म्हणजे २०१९ ची फायनल.

चेन्नई आणि मुंबई हे दोन संघ सर्वात जास्त वेळा ट्रॉफी जिंकणारे संघ म्हणून प्रसिद्ध आहेत. सर्वाधिक कट्टर फॅन्स देखील याच दोघा संघांना लाभले आहेत. २०१९ च्या फायनलमध्ये शेवटच्या ओव्हरपर्यन्त रंगलेल्या या सामन्यात मुंबईने बाजी मारली होती.

२०१९ ची फायनल जरी मुंबई जिंकली असली तरी खऱ्या अर्थाने मन जिंकले होते ते चेन्नईच्या शेन वॉटसन याने, पठ्ठ्या पायातून रक्त वाहत असताना देखील खेळत होता. शेवटच्या ओव्हरमध्ये जर वॉटसन आऊट झाला नसता तर कदाचित सामन्याचा शेवट वेगळाच झाला असता. 

मुंबईने पहिली बॅटिंग करताना चेन्नईसमोर १५० धावांचे आव्हान ठेवले होते. चेन्नईची टीम या धावांचा पाठलाग करताना गडगडायला लागली. पण शेन वॉटसनने वादळी ८० धावांची खेळी करत चेन्नईला विजयाच्या जवळ आणून ठेवले. मलिंगा सारख्या वेगवान बॉलरची यथेच्छ धुलाई त्याने केली. अक्षर पटेलच्या एकाच ओव्हरमध्ये त्याने तीन सिक्स मारले. पण हे करत असताना त्याच्या पायातून रक्त वाहत होते. त्याच्या गुडघ्याजवळील भाग पूर्णपणे रक्ताळलेला दिसत होता. तरी देखील तो मैदानावर धावत होता. 

१४८ पैकी ८० धावा एकट्याने करून चेन्नईचा विजय जवळ आणल्यावर वॉटसन शेवटच्या ओव्हरमध्ये आऊट झाला आणि चेन्नईने आयपीएलची ट्रॉफी गमावली. पण रक्त निघत असताना शेन वॉटसनने केलेली धमाकेदार खेळी मात्र अजरामर झाली असेच म्हणावे लागेल. सामना संपल्यावर वॉटसनच्या पायाला सहा टाके पडले होते, यावरून त्याची दुखापत किती मोठी होती याचा अंदाज येईल.

सबस्क्राईब करा

* indicates required