केनियात पण एक मांझी आहे, जाणून घ्या त्याने काय केलंय!!

तुम्हाला दशरथ मांझी आठवतोय का ? एक अख्खा डोंगर फोडून रस्ता तयार करणारा ? नक्कीच आठवत असणार, त्यांच्यावर बनलेली फिल्म पण तुम्ही पहिलीच असेल. आज दशरथ मांझी आठवण्याचं कारण असं की केनिया मध्ये एक दशरथ मांझी जन्मला आहे. चला तर आज केनियाच्या दशरथ मांझीला भेटूया.
जिथे सरकार कमी पडतं तिथे सामान्य माणसालाच पुढाकार घ्यावा लागतो. केनिया मध्ये कागांडा नावाचं गाव आहे. या गावापासून १ किलोमीटरवर असलेल्या कागांडा शॉपिंग सेंटर पर्यंतचा डोंगरी रस्ता खराब झाला होता. ह्यामुळे लोकांना लांबच्या रस्त्याचा वापर करावा लागत होता. या रस्त्याची पुनर्बांधणी करावी असं वेळोवेळी सांगून पण सरकारकडून काहीच प्रतिसाद आला नव्हता. अखेर गावातल्या नोकोलास मुचामी नावाच्या व्यक्तीने हे काम स्वतःहून करायचं ठरवलं.
नोकोलास मुचामी एक कामगार आहे. त्याने ६ दिवस कामावरून सुट्टी घेतली होती. या ६ दिवसांच्या कमाईवर त्याने पाणी सोडलं होतं. रोज सकाळी ६ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत तो राबला. रस्ता बांधण्यासाठी त्याच्याकडे साहित्य नव्हतं म्हणून त्याने शेतातल्या अवजारांनी हे काम पूर्ण केलं आहे.
त्याने केलेल्या कामगिरीने तो आता गावासाठी हिरो ठरला आहे. गावकऱ्यांनी म्हटलंय की आमच्यावर त्याचे उपकार आहेत.