computer

नाट्यपंढरी, गणपती, कुस्ती, चालुक्यांची राजधानी, भडंग.. सांगली जिल्ह्याच्या आणखी काय विशेषता आहेत हे जाणून घ्या!!

सांगली जिल्हा हा खऱ्या अर्थाने विविधतेने नटलेला जिल्हा. या जिल्ह्याला नाट्यपंढरी म्हटले जाते. महाराष्ट्रात ज्यांना मानाचे स्थान आहे त्या नारायण श्रीपाद राजहंस म्हणजेच बालगंधर्व यांचा जन्म सांगलीचा. सीतास्वयंवर हे ऐतिहासिक ठरलेले नाटक याच ठिकाणी सादर करण्यात आले. या जिल्ह्यात वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखाना हा या जिल्ह्यात आशियातील सर्वात मोठा साखर कारखाना आहे. कधीकाळी एकाचवेळी चार मंत्रीपदे असल्याने राजकारणातही सांगलीचा दबदबा होता. नद्या, पशु, पक्षी, मंदिरे, असे सर्व काही ज्या सांगली जिल्ह्याचे वेगळेपण जपताना दिसतात, त्या सांगलीचे जिल्ह्याचे रूप आज आपण वाचणार आहात.

सांगलीचा इतिहास तसा मोठा आहे. या जिल्ह्याने सातवाहन, चालुक्य, राष्ट्रकूट, यादव आदी सत्तांचा काळ बघितला आहे. पुढे पेशवाईकाळ सुरू झाला तेव्हा सांगली स्वतंत्र संस्थान म्हणून नावारूपाला आहे. पटवर्धन घराणे इथले संस्थानिक झाले. आज कुंडल हे सांगली जिल्ह्यातलं गाव आहे, पण पूर्वी सांगलीच्या आसपासचा परिसर कुंडल म्हणून ओळखला जायचा. तेव्हाचे कुंडल हे चालुक्यांची राजधानी होती, यावरून सांगलीचे ऐतिहासिक महत्व लक्षात येऊ शकते. आताचे कुंडल ही क्रांतिसिंह नाना पाटील, जी. डी. लाड अशा स्वातंत्र्यसैनिकांची भूमी आहे. कुंडल गाव कुस्ती आणि कुस्तीगीरांसाठीही प्रसिद्ध आहे. शिराळा तालुक्यातल्या बिळाशी येथे सविनय कायदेभंग चळवळीवेळी मोठा सत्याग्रह झाला होता. वसंतरावदादा पाटील यांनीही इंग्रजांना सळो की पळो करून सोडले होते. स्वातंत्र्य संग्रामातदेखील सांगलीचे योगदान मोठे होते हे इथे लक्षात येते.

आता सांगली जिल्ह्याच्या भौगोलिक बाजूबद्दल बोलायचे झाल्यास १४६३ मीटर उंच सह्याद्रीची मुख्य श्रेणी जिल्ह्याच्या पश्चिम सीमेवर आहे. त्याच्या दक्षिण दिशेस दक्षिण तिवरा घाट आहे. जिल्ह्याचा पश्चिम भाग मोठ्या प्रमाणावर डोंगराळ आहे. तर पूर्वभागात ही अनेक डोंगर आहेत, मात्र तुलनेने त्यांची उंची कमी आहे. एका भागात नद्यांमुळे सुजलाम सुफलाम, तर दुसऱ्या भागात डोंगर आणि कमी पर्जन्यवृष्टीमुळे ओसाड भाग असे काहीसे दृश्य दिसते.

कृष्णा ही साताऱ्यातून सांगलीत वाहून येते. सांगलीत या नदीचा प्रवाह १३० किमी आहे. यावरून कृष्णा सांगलीची मुख्य नदी आहे हे तुमच्या लक्षात आले असेल. तर प्रचितगडजवळ उगम पावणारी वारणा ही पश्चिम सीमेवरील महत्वाची नदी असून तिची लांबी १७३ किमी आहे. वारणा, येरळा, अग्रणी या प्रमुख उपनद्या आहेत. बोर, माण या इतर महत्वाच्या नद्या जिल्ह्यात आहेत.

जिल्ह्यात शाळू म्हणून ओळखली जाणारी रब्बी ज्वारी हे प्रमुख पीक आहे. कृष्णा नदीकाठ हा सुपीक असल्याने इथे गव्हाचे उत्पादन घेतले जाते. सांगलीची हळद तर देशभर प्रसिद्ध आहे. ऊस आणि द्राक्षे हे नगदी पिके इथे घेतली जातात. द्राक्ष उत्पादनासाठी तासगाव तालुका प्रसिद्ध आहे. कृष्णाकाठची वांगी त्यांच्या चवीसाठी ओळखली जातात.

प्रकल्पांचा विचार करायचा झाल्यास कृष्णा कोयना उपसा जलसिंचन प्रकल्प, कृष्णा कालवा, टेंभू उपसा सिंचन योजना, वारणा पाटबंधारे प्रकल्प, आरफळ स्टोरेज हे पाच मोठे प्रकल्प आहेत. त्याचबरोबर अनेक धरणे आणि लहानमोठे प्रकल्प या ठिकाणी आहेत.

जिल्ह्याच्या इतर काही विशेषता म्हणजे बुद्धिबळाचे माहेरघर म्हणून सांगली ओळखला जातो. कुस्ती आणि पैलवान इथेही आहेतच. हिंदकेसरी मारुती माने यांचे नाव तुम्ही ऐकले असेलच. खाद्यपदार्थांच्या बाबतीत येथील भडंग, मिसळपाव आणि वडापाव प्रसिद्ध आहेत. भाग्यश्री ही बॉलिवूड अभिनेत्री सांगलीची आहे, तर मंगेशकर घराणेही सांगलीचेच आहे. सुप्रसिद्ध क्रिकेटपटू विजय हजारे यांचाही जन्म इथलाच. तर सुधांशु किंवा काव्यतीर्थ म्हणून ज्यांची ओळख आहे ते हणमंत नरहर जोशी सांगलीचे आहेत. १९७४ साली त्यांना पद्मश्री पुरस्कार देण्यात आला होता. त्यांनी लिहिलेली अनेक भावगीते आणि दत्तगीते राज्यभर प्रसिद्ध आहेत.

रोजगार हमी योजना आज देशात एक महत्वाची योजना म्हणून ओळखली जाते. या योजनेमुळे कित्येक लोकांना रोजगार मिळू शकला आहे. या योजनेचे श्रेय जाते विठ्ठल सखाराम पागे म्हणजेच वि. स. पागे यांना. देशभर क्रांतिकारी ठरलेल्या या योजनेचे जनक सांगलीचे होते. वि. स. पागे महाराष्ट्र विधानपरिषदेचे अध्यक्षही राहिले होते.

 

शिक्षण व्यवस्थेचा विचार करायचा झाल्यास जिल्हा लईच आघाडीवर आहे. भारती विद्यापीठासारखी संस्था शिक्षणाचा मोठा पसारा सांभाळत आहे. देश स्वतंत्र होत असताना सांगलीत १९४७ सालीच वालचंद इंजिनिअरिंग कॉलेज सुरू झाले. राज्यातीलच नाही,तर देशातील अतिशय जुन्या कॉलेजपैकी हे एक कॉलेज आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून मुलं इथे येत असतात. आजही अनेक जिल्ह्यात महाविद्यालयीन शिक्षणाची सोय नसल्याने मुलांना स्थलांतर करावे लागते. पण डेक्कन एज्युकेशन सोसायटीतर्फे १९१९ सालीच इथे मुंबईचे माजी गव्हर्नर विलींग्डन यांच्या नावाने महाविद्यालय सांगलीत सुरू झाले होते. स्वातंत्र्यपूर्व काळात सुरू झालेली सांगली शिक्षण संस्था प्राथमिक शाळांपासून तर महाविद्यालयीन शिक्षणापर्यंत आणि मराठी, इंग्रजी अशा दोन्ही माध्यमांतून सांगलीच्या शिक्षण व्यवस्थेत भरीव योगदान देत आहे.

किर्लोस्कर उद्योगसमूह महाराष्ट्रात नावारूपाला आला. त्यांचा पहिला कारखाना देखील सांगलीत स्थापन करण्यात आला होता. १० वर्ग किलोमीटर परिसरात पसरलेले मानवनिर्मित सागरेश्वर वन्यजीव अभयारण्य हे जिल्ह्याचे वैभव आहे. हरीण, सांबर, भेर असे अनेक वन्यजीव येथे आहेत. सातवाहन काळात घडवलेली ५१ शिवलिंगे या अभयारण्याच्या परिसरात तुम्हांला पाहावयास मिळतील.

साधारण १८४३मध्ये बांधलेले गणपती मंदिर सांगलीचे आराध्यदैवत आहे. मंदिर विशाल असल्याने त्याची भव्यता डोळे दिपवून टाकतात. मंदिराचे बांधकाम पूर्ण होण्यास तब्बल ३० वर्षं लागली होती. जिल्ह्यातल्या तासगाव इथेही एक गणपती मंदिर आहे. साधारणत: दक्षिणेकडे पाहावयास मिळणारे गोपूर पद्धतीचे तुम्हांला इथे दिसेल. हे महाराष्ट्रातले सर्वात उंच आणि एकमेव गोपूर आहे. हे मंदिर १७७९मध्ये बांधले गेले. दरवर्षी ऋषीपंचमीला होणारा या मंदिरातला रथोत्सव प्रसिद्ध आहे. त्या उत्सवाबद्दल इथे वाचा.. 

गणपती बाप्पा मोरया: १७७९ पासून चालत आलेला तासगांवचा रथोत्सव. तुम्ही कधी पाह्यलाय का?

कवठे एकंद या गावात आतषबाजीची दारू बनवली जाते. दसऱ्याच्या रात्री आतषबाजीचे खेळ पाहण्यासाठी दूरदुरून लोक येतात. या दारुकामाची माहिती आणि चित्रांसाठी हा लेख जरूर वाचा. दसरा विशेष: सांगली जिल्ह्यातल्या कवठे एकंदची आतषबाजी.. 

दसरा विशेष: सांगली जिल्ह्यातल्या कवठे एकंदची आतषबाजी..


इथल्या बत्तीस शिराळा या गावात दर नागपंचमीला जिवंत नाग आणून त्यांची पूजा केली जात असे. आजकाल त्यावर बंदी घातल्याचे दिसते.

या जिल्ह्याला लेखनपरंपराही लाभली आहे. वि. स. खांडेकर, द. मा. मिरासदार, ग. दि. आणि व्यंकटेश माडगूळकर, श्रीनिवास कुलकर्णी, सरोजिनी बाबर, पद्मा गोळे ही त्यांतली काही मुख्य नावे.

तर सांगली जिल्ह्याची ही माहिती आपणास आवडली असल्यास निश्चित शेअर करा.

उदय पाटील

सबस्क्राईब करा

* indicates required