computer

स्वराज्याची पायाभरणी करणारा आणि मराठी अस्मितेची राजधानी बनलेला जिल्हा -सातारा

महाराष्ट्रात एकूण ३६ जिल्हे आहेत. यात सातारा जिल्ह्याचे महत्व मात्र उठून दिसावे असे आहे. राजधानी सातारा म्हणून प्रसिद्ध असलेला हा जिल्हा अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार आहे. इतिहासाप्रमाणे वर्तमानातही साताऱ्याचे महत्व कमी झालेले नाही.

साताऱ्याचा इतिहास प्रचंड मोठा आहे. इसवीसन पूर्व कालखंडापासून सातवाहन चालुक्य घराण्यांनी इथे राज्य केले आहे. तसेच १२ व्या शतकात शिलाहार वंशातील राजा दुसरा भोज यांनी जिल्ह्यात अनेक ठिकाणी किल्ले बांधले. अजिंक्यतारा यांनीच बांधले असल्याचे काही ठिकाणी म्हटले जाते. भोज राजाचा पराभव यादवांनी केल्यावर इथे यादव राज्य आले. यादवांचे पतन झाल्यावर बहामनी राज्य दक्षिणेत बहरले. सातारा किल्ल्याची दुरुस्ती स्वतः महंमदशाह बहामनी याने केली होती.

बहामनी सत्तेनंतर इथे आले आदिलशाही राज्य. शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करत मोठा प्रदेश स्वराज्यात सामील करून घेतला होता. जावळी पादाक्रांत करणे असो की अफझलखानाचा निःपात करून वाई प्रदेश जिंकणे असो, स्वराज्यात सातारा समाविष्ट होत गेले. पुढे राजाराम महाराजांनी सातारा ही मराठ्यांची राजधानी केली. पुढे शाहू महाराजांच्या अखत्यारीत सातारा आल्यावर ते संस्थान म्हणून ओळखले जाऊ लागले.

१८१८ सालापासून ईस्ट इंडिया कंपनी, तर १८५७ नंतर इंग्रज सरकार यांचा अंमल इथे होता. देश स्वतंत्र झाल्यावर सांगली, मिरज, जत, औंध, फलटण ही संस्थाने समाविष्ट करून प्रचंड मोठा असा सातारा जिल्हा निर्माण झाला. पुढे उत्तर आणि दक्षिण असे दोन सातारा जिल्हे तयार झाले. शेवटी १९६० साली महाराष्ट्र राज्य म्हणून अस्तित्वात आल्यावर दक्षिण सातारा सांगली जिल्हा म्हणून ओळखला जाऊ लागला तर उत्तर सातारा फक्त सातारा म्हणून उरला.

भौगोलिक दृष्ट्या साताऱ्याचे चार विभाग पडतात. पूर्वेकडील माळरानाचा प्रदेश, कृष्णा नदीखोऱ्याचा प्रदेश, नीरा नदीखोऱ्याचा प्रदेश आणि सह्याद्रीचा प्रदेश. सह्याद्रीचा प्रदेश हा जिल्ह्याच्या पश्चिम सरहद्दीवर आहे. सुमारे ९७ किलोमीटर लांब सहयाद्रीची जिल्ह्यात लांबी आहे तर जिल्ह्यात शंभू महादेव डोंगररांग प्रदेश जिल्ह्यात आहे.

पूर्व दिशेला बामणोलीचा डोंगर हा उत्तरदक्षिण दिशेने पसरलेला आहे. महाबळेश्वर आणि पाचगणीचे पठार साताऱ्यात आहेत. महाबळेश्वरची उंची ही १४३६ मीटर असून या थंड हवेच्या ठिकाणाची महती पूर्ण देशात आहे. आधी सांगितल्याप्रमाणे सातारा जिल्हा हिंदवी स्वराज्याचा प्रमुख साक्षीदार आहे. जिल्ह्यात प्रतापगड, अजिंक्यतारा, सज्जनगड असे महत्वाचे किल्ले आहेत. या सोबत जिल्ह्यात अनेक किल्ले आहेत.

सातारा जिल्ह्यातील अजून एक महत्वाची विशेषता म्हणजे या ठिकाणी असलेले घाट. महामार्गांवर असणारे घाट अनेक मार्गांना जोडत असतात. खंबाटकी घाट हा खंडाळ्याजवळ पुणे - बँगलोर महामार्गावर आहे, तर कुंभार्ली घाट पाटण-चिपळूण महामार्गावर आहे. सोबतच वाई महाबळेश्वर मार्गावर पसरणी घाट आणि महाबळेश्वर - महाड मार्गावर पार घाट आहे.

 

जिल्ह्यात कोयना आणि कृष्णा या प्रमुख नद्या आहेत. महाबळेश्वर पठाराच्या पूर्व भागात कृष्णा नदी उगम पावते. जवळपास १७२ किलोमीटर प्रवास ही नदी जिल्ह्यातून करते. कोयना ही कृष्णा नदीची प्रमुख उपनदी आहे. उरमोडी, वेण्णा, कुडाळी, याही कृष्णेच्या उपनद्या आहेत. कृष्णा आणि कोयनेचा संगम प्रीतीसंगम म्हणून ओळखला जातो. तर कृष्णा आणि वेण्णा नद्यांचा माहुलीजवळ उगम झाला आहे.

नीरा नदी ही सातारा जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरून वाहते. बाणगंगा ही नीरा नदीची उपनदी आहे. तर कोयना ही नदी महाबळेश्वर पठारावर उगम पावते. या नदीवर पाटण तालुक्यात कोयना धरण आहे. कैरा आणि वांग या कोयनेच्या उपनद्या म्हणून ओळखल्या जातात. खनिज संपत्तीचा विचार करायचा झाल्यास इथे जांभा खडक, बॉक्साइट, चुनखडी, मँगनीज आढळते.

पिकांच्या बाबतीत ज्या भागात पाऊस जास्त होतो त्या पश्चिम भागात तांदूळ घेतले जाते. तर कमी पाऊस असणाऱ्या पूर्व भागात ज्वारी, बाजरीसारखी पिके घेतली जातात. महाबळेश्वर आणि वाई येथील स्ट्रॉबेरीचे पीक महाराष्ट्रात नावाजले जात आहे. तर कृष्णाकाठावर पिकणारे वांगीही वाखाणले जातात. फलटण जिल्हा द्राक्ष, डाळिंबासाठी, तर कराड केळीच्या उत्पादनसाठी ओळखला जात आहे. जिल्ह्यात ९ सहकारी आणि ६ खासगी असे एकूण १५ साखर कारखाने आहेत.

सातारा जिल्ह्यात होऊन गेलेल्या अनेक महान लोकांनी राज्याच्या आणि देशाच्या विविध गोष्टींतील जडणघडणीत महत्वाचे योगदान दिले आहे. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज, समर्थ रामदास स्वामी, क्रांतिसिंह नाना पाटील, यशवंतराव चव्हाण, गोपाळ गणेश आगरकर, फुले दाम्पत्य, महाराणी ताराबाई राणी लक्ष्मीबाई, कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जन्म याच सातारा जिल्ह्यात झाला आहे. यातील एकेका व्यक्तीमत्वाचे कर्तृत्व आभाळाएवढे आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातील खाशाबा जाधव, धावपटू ललिता बाबर हे मूळ साताऱ्यातील आहेत. किसन वीर, शाहीर साबळे, काकासाहेब कालेलकर, प्राचार्य शिवाजीराव भोसले हेही सातारकरच होते.

सातारा जिल्ह्यात भेट द्यावी असे अनेक स्थळे आहेत. सज्जनगड किल्ला, अजिंक्यतारा किल्ला इथे गडप्रेमींची गर्दी असते. महाबळेश्वर आणि पाचगणीची कीर्ती पूर्ण देशात आहे. तर कास पठारावर असलेल फुलांचा हंगाम लोकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू आहे. सोबतीला चांदोली, कोयना अभयारण्य तर मायणी तलाव हे निसर्गप्रेमींसाठी पर्वणी ठरतात. ठोसेघर, ओझर्डे आणि भांबवलीचे धबधबेही लोकांना सातारकडे खेचून आणतात.

तर या लेखाच्या माध्यमातून सातारा जिल्ह्याची इत्यंभूत माहिती आमच्या वाचकांपर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. हा लेख तुम्हाला आवडल्यास नक्की शेयर करा.

उदय पाटील

सबस्क्राईब करा

* indicates required