computer

लेन्सकथा : बंगळुरूच्या रस्त्यांवर भटकणारा अंतराळवीर. जाणून घ्या त्याची प्रेरणा, काम आणि मेहनतीबद्दल!!

प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आल्याने फोटो आणि सेल्फी काढणं अगदीच सोपं झालंय. असं असलं तरी लाईट, फ्रेम, कपोझिशन या गोष्टी प्रत्येकालाच ऍडजस्ट करता येतात असं नाही. फोटो काढणं ही एक कला आहे आणि त्याच्याही पलिकडे इतर समाजमाध्यमांसारखंच फोटो हे जनजागृती करण्याचं आणि आसपासच्या घटना उजेडात आणण्याचं एक माध्यम आहे. यामुळेच तर पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धाच्या काळात कितीतरी जागतिक घटनांचं दृश्य स्वरूपात डॉक्युमेंटेशन होऊ शकलंय. काळावर आपली छाप सोडणाऱ्या आणि आज फोटोग्राफीच्या माध्यमातून लोकांसमोर वेगळं जग मांडू पाहणाऱ्या अशाच फोटोग्राफर्सच्या कामाविषयी या मालिकेच्या माध्यमातून लिहिण्याचा मानस आहे.

या लेखमालिकेत इन्व्हायरमेंटल फोटोग्राफी आणि जनजागृती, वाईल्ड लाईफ फोटोग्राफी आणि वन्यजीवन, घरदार नसणाऱ्या बायका त्यांचं जीवन यांसारख्या विषयांचा समावेश असेल.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Eashan Misra (@mr.kalopsia) on

रस्त्यावर, रिक्षात किंवा बसमध्ये बसलेला, किराणा घेणारा स्पेस सूटमधला माणूस तुम्ही पाहिलाय? ही गंमत नाही! बंगळुरूच्या रस्त्यांवर लॉकडाऊनच्या अगदी काही दिवस आधी तो फिरत होता. तुम्ही बंगळुरूमध्ये राहात नसाल म्हणून तुम्ही कदाचित त्याला पाहिलं नसेल. पण तुम्ही इंस्टाग्रामवर तर नक्कीच असाल. तिथे तुम्ही त्याचे फोटो पाहिलेत का? कदाचित हे वाचून तुम्ही आवक झाला असाल. तो कोण आहे? त्याला तो स्पेस सूट कसा मिळाला? तो असा रस्त्यांवर का फिरतो? त्याचे फोटो कोण काढतं? असे कितीतरी प्रश्न तुम्हाला पडले असतील. आणि एक फार मोठा प्रश्न पडला असेल की फोटोग्राफर्सविषयी माहिती देणाऱ्या सिरीजमध्ये मधूनच या स्पेससूटमध्ये फिरणाऱ्या माणसाविषयी का लिहिलं जातंय? या सगळ्याचा उलगडा तुम्हाला संपूर्ण लेख वाचल्यावर होईल

पृथ्वीवरचा हा अंतराळवीर आहे तरी कोण?

हा आहे मिस्टर कॅलोप्सिया. मुक्कामपोस्ट इंस्टाग्राम! म्हणजे mr.kalopsia हा त्याचा इंस्टाचा पत्ता हो. या इथेच त्याची जादुई दुनिया आपल्याला पाहायला मिळते. मूळचा पटण्याचा असणारा आणि सध्या बंगळुरूमध्ये राहणारा २३ वर्षांचा इशान मिश्रा खरंतर ग्राफिक्स डिझायनर आणि फोटोशॉप आर्टिस्ट आहे. ही सगळी झाली त्याची अगदीच औपचारिक ओळख. या आत्ताच्या घडीला त्याला तमाम भारतीय तरुणांहून वेगळं ठरवणारी त्याची खरी ओळख तर अजून बाकी आहे. नासा व अवकाशविज्ञानाच्या प्रमोशनसाठी काम करणाऱ्या एका म्युझिकल बँडसोबत इशान ग्राफिक्स डिझायनर म्हणून काम करतो. तो त्याच्या व्यवसायाचा भाग आहे. हे डिझाईन करण्यासाठी तो ॲडॉबी फोटोशॉप या सॉफ्टवेअरचा वापर करतो. संपूर्ण भारत नव्हे, संपूर्ण जगच ज्या ॲडोबी ब्रँडच्या फोटो आणि व्हिडिओ सॉफ्टवेअर्सचा वापर मोठ्या प्रमाणात करतं. असा ॲडोबी ब्रँड जगभरातल्या काही निवडक ग्राफिक्स डिझायनर्सना फॉलो करतो. तो ज्या ग्राफिक्स डिझायनर्सना फॉलो करतो त्यांच्या यादीत 'इशान मिश्रा' हे एकमेव भारतीय नाव आहे. ॲडोबीने तर इशानविषयी आणि त्याच्या कामाविषयी कौतुक करणारा एक छानसा ब्लॉगही लिहिलेला आहे.

ॲडोबी फोटोशॉप नेमकं आहे तरी काय? 

फोटोशॉप हा शब्द सगळ्यांना माहित आहेच. हे म्हणजे फोटोकॉपी आणि झेरॉक्ससारखं आहे. म्हणजे, फोटो एडिटिंग हे काम आहे आणि ॲडोबी फोटोशॉप हे फोटो एडिटिंग करणारे एक सॉफ्टवेअर. अर्थातच हे सॉफ्टवेअर भारतातल्या यंग जनरेशनच्या चांगल्याच परिचयाचं आहे. फोटोग्राफर्सची तर या सॉफ्टवेअरशी गट्टीच आहे. 

आता फोटो एडिटिंगबद्दल सोप्या शब्दात सांगायचं झालं तर फोटो हवा तसा एडिट करणे. त्याला हवे ते इफेक्ट देणे, फोटोत हवे ते रंग भरणे किंवा मग फोटोत असलेले रंग काढून टाकणे. काळ्या माणसाला गोरं, गोऱ्या माणसाला सावळं, दिवसाची रात्र, रात्रीचा दिवस. हव्या त्या बॅकग्राउंडवर, हवी ती वस्तू , व्यक्ती एडिट करून क्लब करू शकतो. हे सगळं करण्यासाठी या सॉफ्टरवेअरमध्ये निरनिराळे टूल्स असतात. आणि वेगवेगळ्या लेयर्स घेऊन आपल्ल्याला फोटो एडिट करता येतो. इफेक्ट देता येतात.

या सगळ्या फिचर्समुळे फोटोग्राफर्सना ते चांगलंच मदतीचं ठरतं. तसे फोटोशॉपच्या विधायक वापरापेक्षा त्यांच्या विघातक वापरामुळे वादच जास्त होतात. रियल टाईम परफेक्ट क्लिकची व्हॅल्यू फोटोशॉपमुळे सामान्यतः कमी झालेली पाहायला मिळते. असं असलं तरी त्याची उपयुक्तता पाहता हे सॉफ्टवेअर म्हणजे क्रिएटिव्ह लोकांच्या हाती लागलेली जादूची छडी आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण कुठलंच सॉफ्टवेअर एका परफेक्ट क्लिकची बरोबरी कधीच करू शकत नाही. लाईट, टायमिंग आणि कल्पकता या तिघांचं सूत जिथे जुळतं तिथेच चांगला फोटो पाहायला मिळतो. आता कल्पकतेत फ्रेम आणि तिचं कपोझिशन या दोन्ही गोष्टी आपोआपच येतात. या अशा चांगल्या फोटोंना आपण सॉफ्टवेअर वापरून आणखी चांगला नक्कीच करू शकतो. आणि इशान सारखी क्रिएटिव्ह डोकी तर अशा सॉफ्टवेअरचा वापर करून आपली व्हर्च्युअल स्पेस ही तयार करतात.

फोटोशॉप वापरून इशानने नेमकी कुठली कलाकारी केलीय? 

पाच मिलियन (5M) म्हणजे ५० लाख फॉलोअर्स असणारं ॲडोबी फोटोशॉपचं इंस्टा हँडल जगभरातल्या फक्त २६० जणांना फॉलो करतं. त्यांच्या कामावर लक्ष ठेऊन असतं. या २६० जणांमध्ये इशान कसकाय हे जाणून घेणं फारच इंटरेस्टिंग आहे. अवकाशाविषयी एका ठराविक वयात मुलांना आकर्षण वाटतं यात काही नवल नाही. तिथल्या गुढतेविषयी आणि चमत्कारिक घटनांविषयी त्यांना आकर्षण वाटणं अगदीच साहजिक आहे. इशानलासुद्धा हे आकर्षण सतत जाणवायचं. अवकाश विज्ञानाविषयी (स्पेस सायन्सविषयी) उत्सुकता मात्र होती. त्याच्याविषयी जाणून घेण्याची जिज्ञासा होती. जे काही करेन ते अवकाशविज्ञानाशी सबंधीतच असं त्याने मनोमन ठरवून टाकलं होतं. यातून तो स्पेस आर्टवर्क करू लागला.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Eashan Misra (@mr.kalopsia) on

सुरुवातीला यासाठी तो स्टॉक इमेजेस वापरायचा. नंतर मग इंटरनेटवर असतील त्या इमेजेस वापरून आर्टवर्क करणं त्याला कंटाळवाणं वाटू लागलं. म्हणून मग तो स्वतःची अशी वेगळी स्टाईल डेव्हलप करण्याच्या मागे लागला. त्यातून एक भन्नाट कल्पना त्याला सुचली. त्याच्या स्वतःच्या मालकीच्या 'डमी स्पेससूट' ची!! या स्पेससूटचा वापर करून त्याला हवं तसं फोटोशूट तो करू शकेल. आता हा स्पेससूट रेडिमेड घेणं म्हणजे फार खर्चिक काम होतं. मग इशानने स्वतःच तो सूट तयार करण्याचं ठरवलं. त्यासाठी वेगवेगळे युट्युब व्हडिओ पाहात त्याने आपलं पहिलं आर्टवर्क डिझाईन केलं, अगदी तसाच स्पेससूट  डिझाईन केला. त्यासाठी तो स्वतः शिवणकाम शिकला. स्पेस हेल्मेट तयार केलं. असं करत करत तो हळूहळू त्याची कल्पना सत्यात उतरवण्याचा दिशेने पुढे जाण्याचा प्रयत्न करू लागला.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Eashan Misra (@mr.kalopsia) on

बंगळुरूला सध्या तो ज्या घरात राहतो त्या घरात त्याने स्टुडिओ सेटअप तयार केला. थ्री पॉईंट लायटिंग सेटअप उभारला. एक बेसिक फिचर असणारा कॅमेरा, ट्रायपॉड, ग्लव्हज, हेल्मेट आणि स्पेससूट सगळी तयारी तर झाली. आता प्रश्न होता फोटो काढणार कोण? आणि कुणाचे? मग इशान स्वतःच अंतराळवीराच्या अवतारात तयार झाला. टायमर लावून स्वत:च स्वतःचे फोटो काढायचे असं त्याने ठरवून टाकलं. आता गंमत अशी की ग्लव्हज घालून कॅमेरा हँडल करणं महाकठीण काम. मग इशानने ग्लव्हज घालण्याची प्रॅक्टिस केली. आता तो अवघ्या काही सेकंदात ग्लव्हज घालू शकतो. टायमर लावून अवघ्या दहा सेकंदात ग्लव्हज घालून, मार्क केलेल्या जागेवर, मनात ठरवलेली पोज देत तो फ्रेममध्ये जातो.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Eashan Misra (@mr.kalopsia) on

या ठिकाणी तुम्ही रोज तयारी कशी करता हे जरा आठवून पाहा. तुम्हाला सँडल पायात सरकवायला, घड्याळाचा बेल्ट लावायला, गेला बाजार शर्टची बटणं लावायला किती वेळ लागतो? आता इशान फोटोसाठी ज्या सगळ्या गोष्टी अवघ्या दहा सेकंदात करतो, त्या करताना किती कॉन्सनट्रेशन, पेशन्स आणि प्रॅक्टिस लागत असेल याचा विचार करून पाहा. आपला साधा एक सेल्फी नीट येत नाही म्हणून आपली चिडचिड होते, कित्येकदा तर तो काढत असताना आपलं टायमिंग ही चुकतं. हातात ग्लव्हज, डोक्यावर ते भलंमोठं काचेचं हेल्मेट, अंगातला दहा किलो वजनाचा स्पेससूट हे सगळं सांभाळत, स्वतःचं स्वतःचा फोटो काढणं किती अवघड असेल, फक्त एकदा कल्पना करून पाहा! आता ही गोष्ट खरी, की पहिलाच क्लिक काही परफेक्ट येत नाही. त्यासाठी इशानला कधीकधी तीन-तीन तास प्रयत्न करावे लागतात. एवढं सगळं करूनही त्याच्या हाती लागते ती एक रॉ इमेज. या रॉ इमेजवर पुढे फोटोशॉपमध्ये तो प्रोसेसिंग करतो. असा एक रॉ फोटो म्हणजे त्याची एक कन्सेप्ट.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Eashan Misra (@mr.kalopsia) on

इशान फोटोशॉपमध्ये जेव्हा रॉ फोटोवर काम करायला घेतो, तेव्हा आधी तर हव्या त्या बॅकग्राउंडवर तो कटिंग केलेला फोटो ठेवतो. त्याला हवं ते भवताल तयार करण्यासाठी लेयरवर काम करतो. मग एक नीट इमेज तयार होते. लिहिलंय तेवढं सोपं हे मुळीच नाही. हेल्मेटमध्ये आलेलं इतर वस्तूंचं रिफ्लेक्शन काढून टाकणं, मुळात फोटोत ते येऊच न देणं, एक काल्पनिक जग सॉफ्टवेअरचा वापर करून फोटोत उभारणं हे किती कौशल्याचं काम आहे. ते करण्यासाठी टेक्निकली किती हुशार असायला हवं हे जाणकार नक्कीच समजू शकतील. हेच जाणून ॲडॉबीने इशानचं तोंडभर कौतुक केलंय. इशान ही जी प्रोसेस फॉलो करतो, त्याचं जर एखादा मोठा ब्रँड कौतुक करत असेल इशानच्या आर्टवर्कचा अंतिम परिणाम किती नेटका, आकर्षक व सुरेख असेल!

अंतराळवीराची पृथ्वीवरची दैनंदिनी

इशानच्या आर्टवर्क्सच्या रॉ आणि फायनल इमेजेसमध्ये खूप फरक असतो. प्रत्यक्षात फोटो काढताना जर तो सोफ्यावर हातात पॉपकॉर्न घेऊन ते खात बसला असेल, तर फायनल इमेज थेटरात सिनेमाचा आनंद घेत पॉपकॉर्न खाणाऱ्या अंतरावळवीराची असते. कधी तर तो आपल्याला व्हडिओ गेम खळताना दिसतो. कधी चक्क हा अंतराळवीर ऑम्लेट बनवताना दिसतो. या ऑम्लेट बनवतानाच्या फोटोविषयी इशान म्हणतो "हे विश्व कसं निर्माण झालं, हे तुम्हाला ठाऊक आहे का? कुणीतरी एक अंडं ऑम्लेट बनवण्यासाठी फोडलं होतं. आता सगळेच त्याला बिग बँग म्हणतायत." फोटोवर असणाऱ्या या अशा कॅप्शनमधून त्याचा अवकाशविज्ञानाकडे पाहण्याचा दृष्टिकोण सहज समजतो. अभ्यासही लक्षात येतो.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Eashan Misra (@mr.kalopsia) on

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Eashan Misra (@mr.kalopsia) on

अंतराळवीराच्या वेशात असताना व्यक्तीचे हावभाव मात्र दिसू शकत नाहीत. पण इशानच्या एका फोटोत तो अवकाशातून पृथ्वीवर येणाऱ्या बसची वाट पाहताना दिसतो. तो फोटो पाहात असताना आपल्या ग्रहावरून, आपल्या माणसांतून, आपल्या वातावरणातून, परक्या ग्रहावर कुठल्याशा ध्येयाने पछाडलं जाऊन मिशन फत्ते करण्यासाठी गेलेल्या अंतराळवीरांच्या मनातली आपण परतून आलोच नाही तर ही भीती, धाकधूक आपल्याला सहज जाणवते. मनाच्या कुठल्यातरी कप्प्यात आमच्या पिढीची रोल मॉडेल 'कल्पना चावला' आठवून जाते. परग्रहावरून पृथ्वीवर येणारी बस ही कल्पना वाटत असली, तरी खरंच तशी बस असते का? इशान अंतराळात जाणं म्हणजे जातोय त्या मिशनसाठी जीवाची बाजी लावणं असतं असंच तर सुचवू पाहत नाही ना? हे उगाच वाटून जातं. ईशान त्याच्याही नकळत माणसांना त्या फोटोमध्ये भावनिकरित्या गुंतायला भाग पाडतो.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Eashan Misra (@mr.kalopsia) on

इशान एका अंतराळवीराला बार, मुव्ही थिएटर, किचन अशा ठिकाणी गुंग झालेलं दाखवतानाच तो त्याला पुस्तकांच्या घोळक्यात हरवलेलं दाखवायला मुळीच विसरत नाही. तो अंतराळवीराला लायब्ररीत पुस्तकं शोधताना आवर्जून दाखवतो. कारण जेव्हा इशान आर्टवर्क करत नसतो तेव्हा पुस्तकं वाचण्यात मग्न असतो. इशानला त्याच्यातला 'मिस्टर कॅलोप्सीया भेटला होता त्याच्या दादाच्या डायरीत. हा शब्द त्याच्या अर्थामुळे त्याला फारच आवडला होता. कॅलोप्सीया म्हणजे दृष्टा माणूस!!  जो आपल्या कल्पनेच्या जोरावर अविश्वसनीय गोष्टी करू शकतो. इशान खरोखरच अशाच अविश्वसनीय गोष्टी करतोय. त्याच्या कल्पना विश्वाला तो सत्यात उतरवतोय. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Eashan Misra (@mr.kalopsia) on

अंतराळवीराच्या घरातल्या ऍक्टिव्हिटीजचा विचार करत असताना, बाहेरच्या जगात तो कसा वावरेल? कुठे फिरेल? कसा प्रवास करेल? कुठल्या कारणाने तो घराबाहेर पडेल? या सगळ्याचा विचार करून एक दिवस इशान अंतराळवीराच्या वेशात आपल्या कॅमेरा बॅगसकट तो बंगळुरूच्या किराणा स्टोअर्समध्ये गेला. तिथे त्याने काही फोटो काढले. नंतर असंच रस्त्यावरून जात असताना कुठल्याशा वेल्डिंग वर्कशॉप काम करणाऱ्या माणसांनी त्याच्यासोबत फोटो काढून घेतले.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Eashan Misra (@mr.kalopsia) on

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Eashan Misra (@mr.kalopsia) on

त्याच्या या एकूण अनुभवाविषयी इशान म्हणतो, "माणसांना माझा वावर गोंधळात टाकत नव्हता. सामान्य माणसांना त्यातून आनंद मिळत होता. त्यांना माझ्याविषयी जाणून घ्यायचं होतं." इशानला जेव्हा मी या संपूर्ण घटनाक्रमातला कुठला अनुभव सगळ्यात जास्त आवडला? असं विचारलं तेव्हा तो सांगत होता. मला पाहून एक लहानशा मुलीने मला विचारलं, "आप नासासे आए हो? आप स्पेसमें जाके आए हो?" तिचे हे प्रश्न ऐकून मला छान वाटलं. कारण तिच्या मनात अवकाशविज्ञानाविषयी आकर्षण होतं. माझ्यामुळे कदाचित ते अजून वाढेल. अंतराळवीराला असं आपल्यासमोर पाहून तिला झालेला आनंद शब्दात सांगणं फार अवघड आहे

इशान हे का करतो ?

सामान्य माणसाला त्याचं रोजचं आयुष्य असं वेगळ्या पद्धतीने दाखवताना इशानला आनंद मिळतो. त्याला एकाचवेळी सामान्य माणसाचं मनोरंजनही करायचंय आणि अवकाशविज्ञानाविषयी त्यांच्या मनात आकर्षणही निर्माण करायचंय. असं असलं तरी लोकांना निर्भेळ आनंद देणं हाच त्याचा खरा हेतू. इशान उत्कृष्ठ ऍनिमेशनही करतो, पण अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी इशानला फोटोग्राफी हे माध्यमच प्रभावी वाटतं. "फोटो नेहमीच गोष्ट सांगत असतात. मला अंतराळवीराच्या रोजच्या जगण्याची गोष्ट सांगायची आहे. फोटोतून मी मला हवी ती गोष्ट सांगत असलो तरी फोटोत सामान्य माणसाला वेगळी गोष्ट दिसू शकते. त्या गोष्टीची सुरुवात तो स्वतः ठरवत असतो." असं इशान सांगतो.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Eashan Misra (@mr.kalopsia) on

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Eashan Misra (@mr.kalopsia) on

इशानचे ८७,००० इंस्टाग्राम फॉलोअर्स आहेत. त्यातले केवळ ८% फॉलोअर्स भारतीय आहेत. गेली तीन वर्ष मिस्टर कॅलोप्सीया नावाने इंस्टाग्रामवर तो आपलं काम करतोय. त्याच्या कल्पनेच्या भराऱ्या तर नासाच्याही पुढे जातात. आर्टिमीज मिशनआधीच ईशानने त्याचा मैत्रिणीला त्याच्या या आभासी माध्यमातून चंद्रावर ही पाठवलंय आणि चंद्रावर जाणारी पहिली मुलगी असा मानही तिला मिळवून दिलाय. त्याने त्याच्या जवळच्या मित्रमंडळींसाठी त्यांचे स्पेशल ग्रह डिझाईन केलेत. लॉकडाऊनच्या काळासंबंधीचंही त्याचं आर्टवर्क फार बोलकं आहे. आपण सगळे सध्या आपल्या ग्रहावर आहोत. त्याचा आपण आनंद घेतला पाहिजे असं काहीसं तो त्यातून सुचवू पाहतोय. 

इंजिनिअर होण्याच्या वाटेतून असा वेगळा यूटर्न घेणारा इशान सांगतो, "आपण वेगळे का आहोत? इतरांपेक्षा काय वेगळं आपण करू शकतो? हे दाखवून देणारी एकतरी गोष्ट आयुष्यात असावी. माझ्यासाठी ती इंजिनीअरिंग ही होती. माझ्या इंजिनिअर नसण्यामुळेच आजचा मी वेगळा आहे." इशानच्या लेन्सकथेला इतरांपेक्षा अजून वेगळं ठरवणारी ही अजून एक बाब. ही लेन्सकथा इशान मधल्या मिस्टर कॅलोप्सियाची जास्त आहे. त्याच्या कथेला साय-फाय टच आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन आहे. कल्पकता, तंत्रज्ञान, दोघांचा संगम आहे. येणाऱ्या भविष्याची झलक आहे. म्हणूनच इतर अनेक कथांहून ही मिस्टर कॅलोप्सियाची फोटोशॉपवाली लेन्सकथा एकदम खास आहे. मिस्टर कॅलोप्सियाचं जादुई जग ऑनलाईन सगळ्यांसाठी खुलं आहे. घरबसल्या त्याची सैर करायला विसरू नका आणि लगेचच त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटला भेट द्या.

लेखिका : विशाखा विश्वनाथ
[email protected]

सबस्क्राईब करा

* indicates required