computer

मालकाच्या मृत्युनंतर ९ वर्षे त्याची वाट पाहणारा हचिको...

कुत्रा आणि प्रामाणिकता ह्या दोन शब्दांना वेगवेगळे संबोधणे कदाचित चुकीचेच ठरेल. कुत्र्यांच्या प्रामाणिकपणाचे आणि आपल्या मालकांवरील प्रेमाचे किस्से तुम्ही नक्कीच ऐकले असतील. तर, तुम्ही हचिको ह्या कुत्र्याबद्दल कधी ऐकलंय का? हचिको हा असा कुत्रा होता ज्याने आपल्या मालकाच्या मृत्युनंतरही एक नाही दोन नाही तब्बल ९ वर्ष मालकाची वाट पहिली. होय. 9 वर्षे. तर अश्या ह्या प्रामाणिक कुत्र्याची गोष्ट जाणून घ्यायला तुम्हालाही नक्कीच आवडेल. नाही का? चला तर पाहूयात जगातील सर्वात प्रामाणिक कुत्रा हचिकोबद्दल.

कुठून आला हाचिको??

हाचिको हा अकीता जातीचा कुत्रा होता. अकिता ही जपानच्या कुत्र्यांची एक जात आहे. तेथील डोंगराळ प्रदेशात मुख्यत्वे ही कुत्र्यांची जात आढळून येते.

हाचिको या कुत्र्याचा जन्म १९२३ साली एका शेतामध्ये झाला होता. पुढे टोकियो विद्यापीठातील कृषी विभागात काम करणाऱ्या प्राध्यापकांनी १९२४ साली त्याला दत्तक घेतले होते. त्या प्राध्यापकांचे नाव होते हिडेसाबुरो युएनो.

युएनो आणि हाचीकोचे नाते.

यूएनो दररोज विद्यापीठात ट्रेनने जायचे. रेल्वे स्टेशन घराजवळच होते, म्हणून ते रोज पायी स्टेशनपर्यंत जायचे. जेव्हापासून हाचिको त्यांच्या घरी आला होता तेव्हांपासून हाचिको रोज सकाळी त्यांच्या सोबत स्टेशन पर्यंत जायचा आणि संध्याकाळी त्यांच्या परतण्याच्या वेळी स्टेशनजवळ जाऊन बसायचा. मग ते दोघे मिळून घरी यायचे. स्टेशन जवळील खाद्यपदार्थ विक्रेत्यांना आणि तिकीट कलेक्टरला ही रोजची सवय झाली होती.  पण म्हणतात ना सगळं काही सुरळीत चालू असताना कुठेतरी वाईट घडण्याची सुरुवात झालेली असतेच आणि झालंही तसंच. २१ मे, १९२५ साली मुलांना शिकवत असतानाच यूएनो ह्यांचा cerebral haemorrhage मुळे अचानक मृत्यू झाला. आणि हाचिको ज्या स्टेशनवर त्यांची वाट पाहत असायचा तिथे त्या दिवशी प्राध्यापक आलेच नाहीत.

हाचिकोची निष्ठा.

त्यांच्या मृत्यनंतरही हाचिको रोज संध्याकाळी त्यांची ट्रेन ज्या वेळी स्टेशनवर यायची त्यावेळी स्टेशनवर जायचा. त्यांच्या परतण्याची  तो रोज वाट पाहू लागला. पण एखाद्या माणसाची वाट पाहणं असं नेमकं किती दिवस  चाललं असेल असं तुम्हाला वाटतंय? तर हाचिको पुढचे नऊ वर्षे, नऊ महिने आणि 15 दिवस आपल्या आवडत्या मालकाची वाट पाहत होता. तो रोज तिथे जायचा, आपल्या मालकाच्या परतण्याच्या आशेने रात्रभर तिथे थांबायचा पण त्याचे लाडके प्राध्यापक काही येणार नव्हते आणि हाचिकोही त्यांची वाट पाहायचं थांबवणार नव्हता. 

सुरुवातीला तिथे खाद्यपदार्थांचे स्टॉल असणाऱ्या लोकांना लक्षात आले नाही, की हा एक कुत्रा रोज आपल्या मालकाच्या परतण्याची वाट पाहण्यासाठी तिथे येतोय. पण जेव्हा त्यांना वस्तुस्थिती कळाली तेव्हा त्यांनीही हाचिकोला रोज काहीना काही खाण्यासाठी देण्यास सुरुवात केली.

हाचिकोची प्रसिध्दी.

यूएनो ह्यांच्या एका विद्यार्थ्यांने अकितो ह्या कुत्र्याच्या जातीवर बरेच संशोधन केले होते. हचिकोलाही त्याने बऱ्याच वेळा शिबुया स्टेशनवर पाहिले होते. एक दिवशी त्याने हाचिकोचा पाठलाग केला. तेव्हा त्याला कळले की हाचिको आता यूएनोच्या घरी बागकाम करणाऱ्यांकडे राहत असे. यूएनोच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नीने शहर सोडण्याचा निर्णय घेतला होता. पण हाचिको मात्र त्याच शहरात शेवटपर्यंत राहिला. त्या बागकाम करण्याऱ्या माणसाकडून त्याला हाचिकोची स्टोरी कळाली. १९३२ साली त्याने प्रसिद्ध केलेल्या एका लेखामुळे हाचिकोचे नाव सर्वांच्या नजरेत आले. त्यानंतर बरेच लोक फक्त हाचिकोला पाहण्यासाठी आणि त्याला खायला काहीतरी द्यावे म्हणून तिथे येऊ लागले. आणि पुढे हाचिको आणि त्याच्या निष्ठेबद्दल लोकांमध्ये बराच मोठा आदर निर्माण झाला होता. हाचिको जगप्रसिध्द झाला होता.

पुढे हाचिकोचे काय झाले?

8 मार्च, 1935 रोजी हाचिकोचा मृतदेह शिबुया येथील रस्त्यावर आढळून आला. त्यावेळी तो 11 वर्षाचा होता. डॉक्टरांनी हाचिकोच्या मृत्यूचे कारण Terminal Cancer & Filaria Infection असे सांगितले. 

त्याच्या मृत्यूनंतर हाचिकोच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. त्याची राख टोकियोतील मिनाटो येथील ओयामा स्मशानभूमीत पुरण्यात आली. येथेच त्याचे प्रिय मालक प्रोफेसर युएनो यांच्यावर देखील अंत्यसंस्कार केले होते. मनुष्य आणि प्राणी ह्याच्यामधील जवळीकतेचे बरेच किस्से तुम्ही ऐकले असतील. पण सलग नऊ वर्षे रोज न चुकता वाट पाहणारा हाचिको एकुलता एकच असावा.

शिबुया स्टेशन(जपान), टोकियो युनिव्हर्सिटी, द नॅशनल म्युझियम ऑफ नेचर & सायन्स (यूनो), ओयामा स्मशानभूमी(जपान) तसेच हाचिकोचा जन्म जिथे झाला त्या ओडेट शहर असे एकूण पाच पुतळे त्याच्या आठवणीत बांधले गेले आहेत.

हाचिको आणि प्राध्यापक यांच्यातील प्रेम, मैत्री, ओढ हे आजही लोकांना नक्कीच भावुक करत असतील.

 

लेखिका: स्नेहल बंडगर

सबस्क्राईब करा

* indicates required