computer

मतदान करायचंय, पण बूथ कुठेय?? असा शोधा तुमचा बूथ!!

भाऊ, १८ एप्रिल २०१९ ला दुसऱ्या टप्प्यातलं मतदान होणार आहे. भारतातल्या काही ठराविक जागा या दुसऱ्या टप्प्यात येतात. आपण महाराष्ट्रापुरतं बोलू. महाराष्ट्रात बुलढाणा, अकोला, अमरावती, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर या ठिकाणी मतदान होणार आहे.

आता मतदानाला अजून ३ दिवस आहेत, पण त्यापूर्वी मतदान केंद्र माहित असायला नको का ? त्यासाठीच आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत मतदान केंद्र शोधायचं कसं ते !!

मंडळी, मतदान केंद्र शोधण्यासाठी तुम्हाला घरातून बाहेर पडण्याची गरज नाही. ते काम तुम्ही घरबसल्या पण करू शकता. आजकाल कसं सगळं ऑनलाईन होतं. हे काम पण ऑनलाईन आणि SMS द्वारे होतंय.

कसं ते समजून घेऊया !!

१. National Voters' Service Portal या साईट वर जा. उजव्या कोपऱ्यात 'Booth, AC and PC' लिहिलेलं आढळेल त्यावर क्लिक करा.

२. तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल. आता तुमच्यासमोर २ पर्याय आहेत. एक तर नाव व माहितीद्वारे मतदान केंद्र शोधायचं किंवा मग मतदार ओळखपत्राचा वापर करायचा. तुमच्या सोयीनुसार तुम्ही पर्याय निवडू शकता.

३. तुम्ही जर नाव आणि माहिती भरण्याचा पर्याय निवडत असाल तर मतदार ओळखपत्रावर असलेली माहिती जशीच्यातशी भरणे आवश्यक आहे. माहितीत चूक झाली तर पुढची प्रक्रिया होणार नाही. 

४. दुसऱ्या पर्यायात म्हणजे तुम्ही जर मतदार ओळखपत्र वापरणार असाल तर सुरुवातीलाच दिलेला EPIC No. ज्याला मतदार ओळख क्रमांक म्हणतात तो योग्यरीतीने भरा. शिवाय कोड लक्षपूर्वक लिहायला विसरू नका.

५. एवढं केलं की तुमची सगळी माहिती तुम्हाला झटक्यात दिली जाते. या माहितीत तुमच्या मतदान केंद्राची माहिती पण असते.

तुम्ही SMS द्वारे पण मतदान केंद्र शोधू शकता. यासाठीची प्रक्रिया सोप्पी आहे.

“EPIC” स्पेस आणि तुमचा मतदार क्रमांक लिहून १९५० या क्रमांकावर SMS पाठवायचा. थोड्याच वेळात तुम्हाला मतदान केंद्राची माहिती पाठवली जाते.

चला तर आता मतदान केंद्र शोधायच्या कामाला लागा. तुम्ही कोणत्या भागातून मतदान करणार आहात हे आम्हाला सांगायला विसरू नका !!

 

आणखी वाचा :

मंडळी, या माणसाने दिलं भारतात सगळ्यात पहिलं मत!! वाचा किस्सा पहिल्या मतदानाचा!

सबस्क्राईब करा

* indicates required