ट्रेन-१८ च्या पहिल्याच चाचणीत घडली भारतीयांना लाजवणारी गोष्ट !!

मंडळी, काही लोकांनी ठरवलंय की आपल्याला सुधारायचंच नाही. तेजस एक्स्प्रेसच्या काचा फोडणे व हेडफोन चोरणे, ट्रेनमधल्या चादरी, ब्लँकेट्स, टॉवेल्स, खिडक्या, नळाच्या तोट्या चोरणे अशा पराक्रमाने आधीच भारतीयांवर टीका होत आहे. त्यात आता आणखी भर पडली आहे.
ऑक्टोबरमध्ये एक चांगली बातमी आली होती, की भारतात लवकरच इंजिनाशिवाय ट्रेन धावणार आहे. या ट्रेनचं नाव आहे ट्रेन-१८. ही एक अत्याधुनिक तंत्रज्ञानाने तयार केलेली ट्रेन आहे. शताब्दी एक्स्प्रेसची जागा घेऊन शताब्दीपेक्षा १५ टक्के जास्त वेगाने अंतर कापण्यासाठी ही ट्रेन बनवण्यात आलीय. ट्रेन-१८ च्या प्रत्येक ट्रेनची किंमत ही तब्बल १०० कोटी आहे.
मंडळी, भारताला अभिमान वाटेल अशा या ट्रेन-१८ च्या अगदी चाचणीच्या वेळी तिच्या काचा फोडल्या जातील असा कोणी विचार तरी केला होता का? पण तेच झालंय. आग्रा ते दिल्ली दरम्यान ट्रेन-१८ च्या चाचणीच्या वेळी काही लोकांनी दगडफेक करून ट्रेनच्या काचा फोडल्या आहेत. रेल्वे विभागाला हतबल होऊन लोकांना रेल्वे संपत्तीला नुकसान न पोहोचवण्याची विनंती करावी लागली आहे.
#T18 शरारती तत्व ने ट्रायल के दौरान पत्थर मारकर खिड़की का शीशा तोड़ा। pic.twitter.com/PKHmMSVMl9
— Parimal Kumar (@parimmalksinha) December 20, 2018
राष्ट्रीय संपत्तीला नुकसान पोहोचवू नये यासाठी विनंती करावी लागते हीच मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे. मग तेजस एक्सप्रेसच्या वेळी पडलेला प्रश्न पुन्हा एकदा समोर येतो –
आपण अशा प्रगत गाड्यांनी प्रवास करण्याच्या मानसिकतेचे आहोत का? नवीन गाड्यांच्या काचा तोडणे, हेडफोन्सची चोरी, कचरा पसरवणे यावरून आपली मानसिकता अजूनही मालगाडीचीच आहे असं नाही का वाटत?
मंडळी, या प्रश्नाला आज तरी उत्तर सापडलेलं नाही.