computer

तब्बल ३२०० किलो वांग्याचं भरीत? पाहा रेकॉर्ड केलंय कोणत्या मराठमोळ्या वाघानं...

मंडळी, सलग 56 तास स्वयंपाक आणि तीन हजार किलो खिचडी तयार करणारे मराठमोळे शेफ विष्णू मनोहर आठवतायत का ? आज त्यांनी आणखी एक जबरदस्त रेकॉर्ड केला आहे. यावेळी त्यांनी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसाठी तब्बल ३२०० किलो जळगावी वांग्याचं भरीत तयार केलंय. आज पहाटेपासूनच विष्णू मनोहर आपल्या फौजेसाहित भरीत तयार करण्याचं काम करत होते.   

३२०० किलो विश्वविक्रमी भरीत तयार करण्यासाठी पहाटे ५ वाजे पासून विष्णू मनोहर आणि त्यांची ५ जणांची टीम तसेच जळगावच्या ६० महिला, ४० पुरुष, २० सुपरवायजर आणि दोन मुख्य निरीक्षक अश्या १२२ जणांची फीज काम करत होती.

मंडळी, ३२०० किलो भरीत म्हणजे किती आणि काय काय साहित्य लागलं असेल, असा प्रश्न पडला ना ? चला तर पाहूया ३२०० किलो जळगावी भरीत तयार करण्यासाठी लागलेलं साहित्य.

वांगे -३२०० किलो (बामणोद येथून)

शेंगदाणे - २० किलो

जिरे - ५ किलो

मिरची - १०० किलो

शेंगदाणे तेल १२० किलो

कोथिंबीर १०० किलो

लसूण - ५० किलो

मीठ - २५ किलो

हे झालं भरीत तयार करण्यासाठी लागणारं साहित्य. याखेरीज भरीत शिजवण्यासाठी १० बाय १० फुटाची ५५० किलो वजनी कढई (नागपुरातून), लोखंडी चूल (कोल्हापुरातून), ८ ट्रॅक्टर काड्या आणि तब्बल ५ मण सरपण सज्ज करण्यात आलं होतं.  

मंडळी, पहाटेपासून सुरु असलेल्या या प्रचंड मेहनतीचं फळ अखेर मिळालं आहे. याकामासाठी लागलेलं साहित्य संपूर्ण महाराष्ट्रातून आलेलं असल्याने हा संपूर्ण महाराष्ट्रानेच केलेला विक्रम आहे असं म्हणायला हरकत नाही. आज पहिल्यांदाच महाराष्ट्राचं अस्सल जळगावी भरीत गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये कायमचं नोंदवलं गेलंय ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.

विष्णू मनोहर आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं बोभाटातर्फे अभिनंदन !!

सबस्क्राईब करा

* indicates required