computer

बेटावर तलाव, तलावात ज्वालामुखी, ज्वालामुखीत तलाव, तलावात बेट...डोकं चक्राऊन सोडणारं हे ठिकाण आहे कुठे ?

मंडळी, मात्र्योश्का नावाची  रशियन बाहुली मिळते.  देल्ही बेल्ली सिनेमात बघितलीत ना? हो तीच.   यात एका बाहुलीच्या पोटात दुसरी बाहुली, तिच्या पोटात तिसरी आणि असं होत शेवटी अगदी बोटाएवढ्या आकाराची बाहुली बाहेर निघते. फिलिपाईन्समधलं एक  बेटसुद्धा असंच आहे.

चला तर हे ठिकाण समजून घेऊया.

तर, फिलिपाईन्समध्ये एक बेट आहे. त्याचं नाव लुझॉन. हे लुझॉन बेट फिलिपाईन्सच्या सर्वात जास्त लोकसंख्येच्या बेटांपैकी एक आहे. या बेटावर एक तलाव आहे ज्याचं नाव आहे ‘लेक ताल’ (ताल तलाव). या तलावात ‘ताल वॉल्केनो’ नावाचा एक ज्वालामुखी आहे.

ताल वॉल्केनो हा आजही जिवंत असलेला ज्वालामुखी आहे. त्याच्या मुखाजवळ असलेल्या प्रचंड मोठ्या खड्ड्यात अनेक वर्षांपासून पाणी साचत आलंय आणि आता त्याचं रुपांतर एका तलावात झालेलं आहे. हा तलाव जगातल्या सर्वात मोठ्या क्रेटर लेकपैंकी एक मानला जातो.

तर, या तलावाच्या मधोमध आहे एक बेट. या बेटाचं नाव आहे ‘वूल्कन पॉईंट’. हे अगदी लहानसं बेट आहे.

मंडळी, हा संपूर्ण परिसर नैसर्गिक सौंदर्याने ओतप्रोत भरलेला आहे, पण हे ठिकाण जेवढं चक्राऊन सोडणारं आहे तेवढंच ते ‘डेंजर’ पण आहे.

सुरुवातीलाच सांगितल्या प्रमाणे ‘ताल वॉल्केनो’ हा जिवंत ज्वालामुखी आहे. त्याचा आजवर ३० वेळा उद्रेक झाला आहे. जवळजवळ ५००० लोकांचा यात जीव गेला होता. मागे झालेल्या एका उद्रेकाच्यावेळी ज्वालामुखीच्या मुखाचा भाग कोसळला. त्यानंतर तिथे एक मोठा खड्डाच तयार झालेला आहे. ‘वूल्कन पॉईंट’ याच तलावात आहे.

काही झालं तरी ही जागा लोकांना आकर्षित करणारी आहे. ‘वूल्कन पॉईंट’ची एक झलक बघण्यासाठी अनेक लोक रोज ‘ताल वॉल्केनो’वर चढाई करतात.

तर मंडळी, कसं वाटलं हे अद्भुत ठिकाण ? पुढच्या सुट्ट्यांमध्ये तुम्ही ‘वूल्कन पॉईंट’ बघायला जाणार का ?