computer

मास्क घालूनही चेहरा दिसेल? पाहा या फोटोग्राफरची आयडिया!!

सध्याच्या कोरोनाकाळात मास्क वापरणे कितीही आवश्यक असले तरी अनेकांना मास्क वापरणे जीवावर येत आहे. त्यामागचं एक मोठं कारण म्हणजे मास्क घातल्यावर जवळच्या लोकांना ओळखणंही अवघड होऊन बसलंय. रोजरोज तोच मास्क काय घालायचा हे ही कारण, विशेषत: स्रीवर्गासाठी महत्त्वाचं आहेच. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोकांना मास्कमुळे आपली ओळख हरवली जातेय की काय असं वाटत आहे.

पण आपला देश तर मुळातच जुगाडू लोकांचा आहे. मग आताही देशभरात क्रिएटिविटीला पूर आला नसता तर नवलच. अशातच केरळमधल्या एका माणसाने एक वेगळीच डोकॅलिटी लढवली आहे. काय आहे ती भन्नाट आयडिया चला पाहूया.

केरळमध्ये बिनेश पॉल नावाचा एक ३८ वर्षीय फोटोग्राफर आहे. त्याने चक्क माणसाचा अर्धा चेहरा छापलेला असेल असा मास्क तयार केला आहे. या मास्कमुळे मास्क घालूनही समोरची व्यक्ती कोण आहे हे सहजपणे ओळखता येईल.

केरळातल्या कोटायममध्ये एक छोटा फोटो स्टुडिओ चालवत असलेला बिनेश अवघ्या साठ रुपयांना हे मास्क विकत आहे. बिनेशने म्हटले आहे की लोकांना एअरपोर्ट, परीक्षा, एटीएम किंवा अशा अनेक ठिकाणी फेशियल ओळखीसाठी मास्क काढावे लागायचे. पण आता या मास्कमुळे लोकांची ही अडचण दूर होऊ शकते. ही भन्नाट आयडिया त्याला कशी सुचली? याबद्दल बोलताना तो म्हणतो की, "अनेक हिरो, सुपरहिरो, कार्टून्स यांचे फोटो मास्कवर छापलेले असतात. पण ज्यांनी मास्क घातला आहे त्यांचाच फोटो छापला तर? अशी एक कल्पना मनात आली".

या आयडियावर त्याने काम केले आणि असे मास्क बनवून टाकले. हा मास्क बनवून घेण्याची प्रक्रिया अगदी सोपी आहे. एका चांगल्या कॅमेऱ्यातून स्वतःचा फोटो काढून बिनेशला पाठवायचा. हा फोटो प्रिंट करून बिनेश तो मास्कपेपरवर ट्रान्सफर करतो.

आजवर बिनेशने ३,००० मास्क विकले आहेत आणि अजून ५,००० ऑर्डर्स त्याला मिळाल्या आहेत. सध्या फक्त दुहेरी आवरणाचे मास्क तो बनवत असला तरी पुढे जाऊन तिहेरी आवरणाचे आणि N-95 मास्क बनविण्याचा त्याचा प्रयत्न असेल असं बिनेशचं म्हणणं आहे.

 

आणखी वाचा :

मास्क कसा लावावा, कसा काढावा? मास्क बद्दल सर्व महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या !!

सबस्क्राईब करा

* indicates required