computer

शाहूंचं करवीर, अंबाबाईचे ठाणे, कोल्हापुरी चप्पल आणि तांबड्या-पांढऱ्यासाठी प्रसिद्ध कोल्हापूर जिल्ह्यात आणखी काय प्रसिद्ध आहे हे जाणून घ्या!!

शाहू महाराजांचे कोल्हापूर, साडे तीन पीठांपैकी संपूर्ण पीठ असलेल्या अंबाबाईचे कोल्हापूर, पैलवानांचे कोल्हापूर एक ना अनेक रूपे या कोल्हापूर जिल्ह्याची आहे. अशा या कोल्हापूर जिल्ह्याची माहिती आज आपण वाचणार आहोत.

कोल्हापूर जिल्ह्याला शाहू महाराजांच्या कार्याचा प्रचंड मोठा वारसा आहे. कोल्हापूर आज महाराष्ट्रात अनेक अंगांनी विकसित जिल्हा म्हणून समजला जातो. शाहू महाराज आणि नंतर झालेल्या अनेक महान लोकांनी कोल्हापूरच्या सामाजिक आणि शैक्षणिक विकासाला चालना दिली.

कोल्हापूर कलेच्या बाबतीत अनुकरणीय जिल्हा आहे. 'राजा हरिश्चंद्र' हा भारतातील सर्वात पहिला सिनेमा याच कोल्हापुरात तयार झाला होता. कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठात राज्य आणि देशात महत्वाचे योगदान देणारे धुरीण घडले आहेत.

कोल्हापूरचा माणूस मनाने प्रेमळ असतो हे महाराष्ट्र जाणून आहे. कोल्हापुरी साज हा शब्द अनेकांनी ऐकला असेल. हा दागिन्यांमधला एक अत्यंत देखणा प्रकार याच मातीतून प्रसिद्ध झाला आहे. तसेच कोल्हापुरी चप्पल ही जगभर प्रसिद्ध आहे. बऱ्याच ठिकाणी ती आजही हातांनी बांधली जाते. माणूस कोल्हापूरला गेला आणि कोल्हापुरी चप्पल घेऊन आला नाही असे कधी होत नाही. कोल्हापूरचा मसाला ही अजून एक विशेष गोष्ट!! तर तांबडा पांढरा रस्सा म्हणजे कोल्हापूर हे समीकरण पूर्ण महाराष्ट्र ओळखून आहे. कोल्हापूरची मिसळही राज्यात प्रसिध्द आहे.

आता कोल्हापूरच्या भौगोलिक बाजूबद्दल थोडे जाणून घेऊ. सह्याद्री पर्वताची मुख्य रांग ही कोल्हापूरच्या पश्चिम भागात दक्षिणोत्तर गेली आहे. तर तिचाच एक फाटा उत्तरेच्या बाजूने पूर्व दिशेला गेला आहे. जिल्ह्यात प्रसिद्ध असलेले घाट जसे आंबोली, फोंडा, आंबा हे कोकणात उतरण्याच्या वाटा म्हणून ओळखल्या जातात.

जिल्ह्यातील प्रमुख नदी म्हणजे कृष्णा. तसेच कृष्णेच्या उपनद्या पंचगंगा, दुधगंगा, वारणा, घटप्रभा, हिरण्यकेशी या सुद्धा महत्वाच्या नद्या जिल्ह्यातून वाहतात. यापैकी पंचगंगा नदीचे खोरे संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात येते, तर इतर नद्यांचा काही भाग जिल्ह्यात येतो. कुंभी, कासारी, तुळशी, भोगावती आणि गुप्त समजली जाणारी सरस्वती या ५ नद्या मिळून पंचगंगा तयार झाली आहे.

कोल्हापूर खनिजांच्या बाबतीत संपन्न आहे. येथील भुदरगड तालुक्यात जिप्सम सापडतो. पन्हाळा, आजरा, शाहूवाडी येथे बॉक्साइटचे साठे सापडतात. तर बेसॉल्ट खडक जिल्हाभर आढळतो. तसेच राधानगरी या तालुक्यात गवा अभयारण्य आहे. येथे अनेक प्राणी दिसतात.

कोल्हापूर येथील पन्हाळा किल्ला स्वराज्याचा वारसा आजही जिवंत करतो. नैसर्गिक सौंदर्य आणि कमालीची शांतता यामुळे हा जिल्हा वेगळा ठरतो. समुद्रसपाटीपासून हा किल्ला ३१२७ फूट उंचीवर आहे.

कोल्हापूर येथील नविन राजवाडा पाहण्यासाठी अनेकांचे कुतूहल असते. १८८४ साली हा राजवाडा बांधण्यात आला. राजवाड्यात असलेले संग्रहालय अनेक जुन्या गोष्टींचा उलगडा करत असते. येथील तोफा तसेच इतर वस्तू बघितल्यातर भव्यतेची जाणीव होते.

कोल्हापूर जिल्ह्याची ही माहिती तुम्हाला आवडली असल्यास आपल्या मित्रांना जरूर शेयर करा.

उदय पाटील

सबस्क्राईब करा

* indicates required