computer

PMJJBY आणि PMSBY योजनांबद्दल फिरणारी बातमी किती खरी किती खोटी? सत्य जाणून घ्या !!

सध्या कोविड संकटामुळे वॉट्सअप्पवर अनेक मेसेज फिरत असतात. त्यातले काही मदतीचे असतात पण काही चुकीचे किंवा अर्धवट माहिती सांगणारे असतात. असाच एक नवीन मेसेज फिरतोय. ज्यामध्ये पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY) आणि पंतप्रधान सुरक्षा विमा योजना (PMSBY) पंतप्रधानांच्या दोन योजनेंतर्गत मिळणार्‍या फायद्याबदल सांगण्यात आले आहे. एखाद्याचा कोविडने मृत्यू झाल्यास किती रूपयाचा दावा करता येईल याची माहिती आहे. पण सत्य काय आहे? याबद्दल नुकतेच ट्विट करून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. चला सविस्तर पाहुयात.

फॉरवर्ड पोस्टमध्ये असं लिहिलय की, “कोविड -१९ किंवा कोणत्याही कारणास्तव एखाद्या जवळच्या नातेवाईक / मित्र मंडळातील एखाद्याचा मृत्यू झाला असेल तर, आर्थिक वर्षाच्या ०१-०४ ते ३१-०३ पर्यंत खाते पासबुक एन्ट्री करून घ्या. पासबुकमध्ये रु.१२ / - किंवा रू. ३३० / - रुपयांची एन्ट्री मार्क करून त्या बँकेत जा आणि विम्यासाठी २ लाख रुपयांचा दावा करा."

परंतु हा मेसेज अर्धसत्य आहे. 

२०१५ मध्ये सरकारने बचत बँक खाती असलेल्या नागरिकांसाठी अगदी खिशाला परवडेल एवढ्या प्रिमियमवर सुरक्षा देण्यासाठी जन धन - जन सुरक्षा योजना आणली होती. या उपक्रमांतर्गत प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY) आणि प्रधान मंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBY) या योजना सुरू केल्या होत्या.

PMJJBY आणि PMSBY योजनेअंतर्गत कॉव्हिडशी संबंधित मृत्यूसाठी याचा फायदा होऊ शकतो. १८ ते ७० वर्षे वयोगटातील अपघाती मृत्यूसाठी किंवा कायमस्वरुपी अपंगत्वासाठी २ लाख रुपये विमा संरक्षण मिळते. परंतु सध्याच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कोविड मृत्यू अपघाती मानले जात नाही. तसेच हक्क सांगणार्‍याकडे बँक खाते नसल्यास किंवा ते १८ - ५५ वयोगटातील नसल्यास या योजनेचा फायदा मिळत नाही. कोविडचे मृत व्यक्ती ५५ वर्षांपेक्षा जास्त असल्यास या योजनेचा लाभ घेण्यास पात्र ठरत नाही. या योजनेअंतर्गत नुकसान भरपाईसाठी दावा करणाऱ्या व्यक्तींनी मृत्यूच्या ३० दिवसांच्या आत संबंधित बँकेच्या ज्या शाखेत तुमचे खाते आहे त्याच शाखेत दावा करणे आवश्यक आहे.

सध्याच्या कोविडच्या दुसर्‍या लाटेमुळे सगळेजण कोविड संकटाशी झुंज देत आहेत. अशा वेळी सोशल मिडीयाचा वापर चांगल्या आणि सत्य गोष्टींचा प्रसार करण्यास वापरला तर अधिक सोपे होईल.

 

लेखिका: शीतल दरंदळे

सबस्क्राईब करा

* indicates required